* निवृत्तीनंतरचे आयुष्य १६ वर्षे सुखासमाधानाने व निरामयतेने जगत असतानाच अचानक वयाच्या ७६ व्या वर्षी देशपांडे काकांना वारंवार व थांबून थांबून लघवी होऊ लागली. मूत्रप्रवृत्तीच्या वेळी तीव्र वेदनाही होऊ लागल्या. वैद्यकीय तपासणीत रक्तातील पी.एस.ए.चे प्रमाण वाढल्याचे व सोनोग्राफीत प्रोस्टेट ग्रंथीत गाठ असल्याचे आढळले व बायॉप्सी केल्यावर प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर या निदानावर शिक्कामोर्तबही झाले. या प्रकारचा कॅन्सर हाडांमध्ये पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉक्टरांनी बोन स्कॅन केला असता पाठीच्या मणक्यांत कॅन्सर पसरला असल्याचेही निदान झाले. लगेचच दोन्ही पुरुष बीजाण्ड (टेस्टीज) काढून टाकण्याचे शस्त्रकर्म केल्यावर देशपांडे काकांचे पी.एस.ए.चे प्रमाणही लक्षणीयरीत्या कमी झाले. आता गरज होती पी.एस.ए.चे प्रमाण व हाडांत पसरलेला कॅन्सर नियंत्रणात ठेवण्याची. काकांनी त्यासाठी आमच्या प्रकल्पात आयुर्वेदीय चिकित्सेची कास धरली व गेली ११ वर्षे चांगली जीवनशैली ठेवून कॅन्सरवर नियंत्रण मिळविले.
साधारणत: वयाच्या साठीनंतर बऱ्याचशा पुरुषांत प्रोस्टेट ग्रंथी आकाराने वाढू लागते व त्यामुळे मूत्रप्रवृत्ती वारंवार व थांबून थांबून होणे, मूत्रप्रवृत्तीच्या वेळी वेदना होणे, मूत्रप्रवर्तनाचे प्रमाण विशेषत: रात्री वाढणे, मूत्रप्रवृत्ती झाल्यानंतरही समाधान न होणे, ओटीपोट दुखणे किंवा फुगणे व क्वचित प्रसंगी मूत्रातून रक्तप्रवृत्ती होणे ही लक्षणे दिसू लागतात. मात्र यापकी बहुतांशी पुरुषांत प्रोस्टेट ग्रंथीची वाढ बिनाईन किंवा नॉन मॅलिग्नण्ट (कॅन्सर नसलेली) अशी असून त्याला वैद्यकीय भाषेत बी.पी.एच.(बिनाईन प्रोस्टेट हायपरट्रॉफी) असे म्हणतात. वैद्यकीय संख्याशास्त्रानुसार साधारणत: सहापकी एका वृद्ध पुरुषास प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर होतो.
प्रोस्टेट ग्रंथी हा पुरुषांमध्ये प्रजनन व मूत्रवह संस्थेचा घटक अवयव असून तो किंचित लंब गोलाकार असते. दोन खंडांत विभागलेली ही ग्रंथी मूत्राशयाच्या (बस्ति) तळभागाला व्यापून असते व या ग्रंथीच्या मध्यातून बस्तिमधून येणारे मूत्र मूत्रमार्गाने शिश्नावाटे निस्सारित केले जाते. या ग्रंथीचे महत्त्वाचे कार्य म्हणजे पुरुष बीजाण्डामध्ये (टेस्टीज) निर्माण होणाऱ्या शुक्राणूंना (स्पर्मस्) ओलावा देणे व त्यांचे पोषण करणे. शुक्रधातूमधील स्रवणारा जलीय भाग हा प्रोस्टेट ग्रंथीतून पाझरला जातो. याशिवाय मूत्राचे प्रवर्तन नियंत्रित करणे हेही या ग्रंथीचे दुय्यम कार्य आहे.
आयुर्वेदानुसार शुक्रधातू हा रस रक्तादी ७ धातूंपकी शेवटचा धातू असून प्रजनन करणे हे त्याचे प्रमुख कार्य आहे. गोड चवीचा (मधुर रस), शीत, सौम्य, पोषण करणारा आहार व औषधे सशक्त शुक्रधातूच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात. याउलट हिरवी मिरची, गरम मसाल्याचे पदार्थ, पावभाजी – रगडा पॅटिससारखे जळजळीत पदार्थ, वेफर्स-लोणच्यासारखे खारट पदार्थ, चिंच-व्हिनेगारसारखे अतिशय आंबट पदार्थ, चिकन – मद्य यांसारखे उष्ण पदार्थ शुक्रधातूचा व पर्यायाने शुक्राणूंचा ऱ्हास करण्यास हेतुभूत ठरतात. तसेच बॉयलरसारख्या अतिउष्णतेच्या संपर्कात काम करणे, क्रोध-चिंता-मानसिक ताण, रात्री जागण्याची व दिवसा झोपण्याची सवय, अतिव्यायाम किंवा अजिबात व्यायाम न करणे या गोष्टीही शुक्रधातूची विकृती करण्यास हेतुभूत ठरतात. कार्यव्यग्र असल्याने किंवा सवय म्हणून मूत्रसंवेदना निर्माण झाल्यावर लगेचच प्रवर्तन न करणे, अतिमथुन यामुळेही शुक्रधातू दूषित होतो. पर्यायाने हीच सर्व कारणे प्रोस्टेट ग्रंथीच्या कॅन्सरसारख्या विकारांसही कारणीभूत ठरतात. याशिवाय आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार आनुवंशिकता हे प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर होण्यास महत्त्वाचे कारण आहे. ज्या पुरुषांत वडील किंवा भाऊ यांना प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर असतो, त्यांच्यात वार्धक्यात किंवा काही वेळा पन्नाशीतही या कॅन्सरची शक्यता दुणावते.
प्रोस्टेट कॅन्सरचे निदान निश्चित करण्यासाठी गुदमार्गातून बोटाने पौरुष ग्रंथीचे परीक्षण करणे (डी.आर.ई.- डिजीटल रेक्टल एक्झ्ॉमिनेशन), सोनोग्राफी, सी.टी. स्कॅन, बायॉप्सी, पी.एस.ए., बोन स्कॅन यापकी योग्य त्या तपासण्या केल्या जातात. आधुनिक वैद्यकशास्त्रात यासाठी बायलॅटरल ऑíकडेक्टोमी म्हणजे दोन्ही पुरुष बीजाण्डाचे निर्हरण हे शस्त्रकर्म, हार्मोनल चिकित्सा, रेडिओथेरॅपी व केमोथेरॅपी यांचा अवलंब केला जातो. प्रोस्टेट ग्रंथीच्या कॅन्सरचा प्रसर स्थानिक झाला असल्यास तो अधिक धोकादायक नसून हे रुग्ण अनेक वर्षे व्याधिरहित आयुष्य जगू शकतात. मात्र या काळात त्यांना मूत्रप्रवृत्तीसंबंधी उद्भवणारी लक्षणे दैनंदिन जीवनात अडथळे आणतात, तसेच कॅन्सर अस्थींमध्ये व उदरपोकळीत पसरण्याचीही संभावना असते. त्यामुळे आधुनिक चिकित्सेबरोबरच आयुर्वेदिक चिकित्सेचा अवलंब केल्यास रुग्णांची जीवनशैली सुधारण्यास नक्कीच लाभ होतो.
यात पुनर्नवा, गोक्षुर (गोखरू), वरुण (वायवरणा), दशमूळ, अश्वगंधा, इक्षुमूळ (उसाचे मूळ) या वनस्पती तसेच चंद्रप्रभा वटी, गोक्षुरादी गुग्गुळ, गोक्षुरादी घृत, वसंतकुसुमाकर अशी शुक्रधातूची शुद्धी व पोषण करणारी शमन व रसायन औषधे वैद्यकीय सल्ल्याने देणे लाभदायी ठरते. तसेच वैद्यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण शरीरास मसाज करणे (स्नेहन), औषधी काढय़ांनी शेक देणे (मसाज / स्वेदन), औषधी काढय़ांचा अवगाह स्वेद (टब बाथ), बस्ति (औषधांनी सिद्ध तेल व काढय़ाचे एनिमा), उत्तरबस्ति (मूत्रमार्गाने दिले जाणारे बस्ति), नस्य (नाकात औषधी तेल किंवा तूप सोडणे), शिरोधारा हे पंचकर्म व आनुषंगिक उपक्रमही शरीरशुद्धीसाठी व स्थानशुद्धीसाठी उपयुक्त ठरतात. आहारात दूध, तूप, लोणी, गोड ताजे ताक, साठे साळीचा तांदूळ व त्याचे पदार्थ, मूग-मसूर, दूधी-पडवळ-दोडका-घोसाळे-भेंडी-सुरण- कोहळा अशा तर्पण करणाऱ्या भाज्या, आंबा-चिकू- द्राक्ष-डािळब-किलगड-चिबूड-शहाळे अशी फळे, मुगाचे-रव्याचे- नाचणीचे-राजगिऱ्याचे लाडू, पेठा, केशर वेलचीयुक्त श्रीखंड, मोरावळा, गुलकंद, नाचणीचे सत्व, गव्हाचे सत्व, शेवयांची खीर, तांदळाची खीर, िशगाडय़ाची खीर, आरारुटची पेज अशा गोड व बृंहण करणाऱ्या खिरी, भाजी- आमटीत चवीसाठी धणे-जिरे-कोथिंबीर, चंदन- वाळ्याचे पाणी यांचा समावेश चिकित्सेस निश्चितच साहाय्यभूत ठरतो.