पाठीला आणि ओटीपोटाला व्यायाम देण्यासाठी ‘सिट अप’ काढणे फायदेशीर ठरते. या व्यायामामुळे पाठीचे स्नायू हळूहळू मजबूत होतात.
गुडघे उभे दुमडून पाठीवर झोपा. दोन्ही हात घडी घालून छातीवर किंवा आरामशीरपणे पोटावर राहू द्या. (छायाचित्र १ पहा.) पाठीचा वरचा भाग झोपलेल्या अवस्थेतच ताठ राहू द्या. पाठ आणि मान ताठ ठेवून आपल्या समोरच्या भिंतीकडे पाहत जमेल तितकी वर उचला. मान पुढे वाकवू नका, तसेच हनुवटी गळ्याला टेकवू नका. (छायाचित्र २ पहा.) शक्य तितके वर उठून झाले की हळूहळू मूळ स्थितीत या.
* हा व्यायाम शरीराला अजिबात झटके न देता आणि सावकाश करा.
* पाय सरळ ठेवून सिट अप्स करू नका, तसेच हात मानेच्या मागे ठेवूनही हा व्यायाम करू नका. त्यामुळे मान विनाकारण पुढच्या बाजूस झुकवली जाते.
* सिट अप्स करताना तुम्हाला पाठदुखीचा त्रास नसणे आवश्यक आहे. पाठदुखी असताना हा व्यायाम केल्यास त्रास वाढण्याची शक्यता आहे.
* हार्नियाचा त्रास असलेल्यांनी सिट अप करू नयेत.
‘पेल्व्हिक लिफ्ट’
पाठीवर झोपून पाय गुडघ्यात दुमडा. दोन्ही हात मानेखाली ठेवा. (छायाचित्र ३ पहा.) आता ओटीपोट हळूहळू वरच्या दिशेने जमिनीपासून सुमारे एक ते दीड इंच उंचीपर्यंत वर उचला. (याहून जास्त वर उचलण्याचा प्रयत्न नको.) मनातल्या मनात दहा आकडे मोजून होईपर्यंत याच स्थितीत रहा. हळूहळू मूळ स्थितीत या.
* या व्यायामानेही पाठीच्या स्नायूंना फायदा होतो.  
* हा व्यायाम किती वेळा केला यापेक्षा ओटीपोट किती वेळ वर उचलून धरले हे महत्वाचे आहे. ओटीपोट वर उचलून धरण्याचा कालावधी सरावाने थोडा वाढवता येईल.