अर्धशिशी म्हणजे काय?
ताप हा जसा विविध कारणांमुळे येऊ शकतो, त्याचप्रमाणे डोकेदुखी ही शरीरातील बदलांची निदर्शक आहे. सर्दी, ताप, ताण, अपुरी झोप, विशिष्ट खाद्यपदार्थ.. अनेक कारणांनी डोके दुखण्यास सुरुवात होते. पित्त हे डोकेदुखीमागचे सर्वात मुख्य कारण असले तरी प्रत्येक डोकेदुखी पित्तामुळेच होते असे नाही. डोक्याच्या एकाच भागात घणाचे घाव पडत असल्याप्रमाणे त्रास देणारी अर्धशिशी हादेखील सर्वसामान्य आजार आहे. अर्धशिशीची सुरुवात होण्यामागे बरीच कारणे असली तरी वाढते तापमान हेदेखील एक प्रमुख कारण आहे. दुपारच्या वेळेस बाहेर काम करणारयांना या काळात डोकेदुखीचा त्रास वाढतो.
अर्धशिशीमुळे काहीवेळा असह्य होऊन उलटय़ा सुरू होतात. अर्धशिशीमुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत नसली तरी उलटय़ांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे काही वेळा अत्यवस्थता जाणवते. त्यातच पित्तामुळे होत असलेल्या डोकेदुखीशी गल्लत होत असल्याने उपचारही वेगळे घेतले जातात व मूळ दुखणे कायम राहते.
स्त्रिया आणि अर्धशिशी : अर्धशिशीचा त्रास स्त्री व पुरुष या दोघांनाही होऊ शकतो. मात्र पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये हा त्रास अधिक आढळतो. साधारणपणे पुरुषांच्या दुप्पट संख्येने स्त्रियांमध्ये अर्धशिशीचा त्रास होत असल्याचे दिसते. हा आजार पौगंडावस्थेपासून सुरू होतो. मासिक पाळी दरम्यान शरीरातील हार्मोन्समध्ये होत असलेले बदल या डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरतात. मासिक पाळी सुरू होण्याआधी किंवा पाळीदरम्यान अर्धशिशीचा त्रास जाणवतो. पुढे मासिक पाळी येण्याचे बंद झाले की प्रौढ स्त्रियांमध्ये हा त्रास आपोआप कमी होतो.
जागृती : अर्धशिशीचा त्रास होत असल्याची जाणीव अनेकांना नसते. काहींना हा त्रास पंधरवड्यातून किंवा दोन-चार महिन्यातून एखाद वेळेला होत असल्याने त्याची तीव्रताही फार जाणवत नाही. बहुतांशवेळा ही डोकेदुखी पित्तामुळे झाल्याचे अनेकांना वाटते. मात्र आठवड्यातून दोन -चार दिवस सतत डोकेदुखी होत राहिली तर मात्र डॉक्टरकडे पावले वळतात व हा अर्धशिशीचा त्रास असल्याचे लक्षात येते.
प्रतिबंधात्मक उपाय – अर्धशिशी नेमकी कशी होते याची सबळ कारणे नाहीत. मात्र अर्धशिशीचा त्रास सतत होणार्यांना नेमक्या कोणत्या कारणानंतर हा त्रास जाणवू लागला याची कल्पना असते. खूप वेळ उन्हात राहिले, आंबट पदार्थ खाल्ले, थंड पाण्याने आंघोळ केली, ताण आला, झोप अपुरी राहिली, जेवण- झोपेच्या वेळा बदलल्या की डोकेदुखीला सुरुवात होते.
उपचार- अर्धशिशीवर उपचार करण्यासाठी तीन महिने औषधे घ्यावी लागतात. काही जणांना सहा महिन्यांपर्यंत औषधे दिली जातात. या औषधांचा परिणाम साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत होतो. या औषधांना अर्धशिशी पूर्ण बरी झाली नाही तरी या डोकेदुखीची वारंवारता व तीव्रता दोन्ही कमी होण्यास मदत होते. डोकेदुखी कमी करण्याचीही औषधे आहेत. अर्धशिशीचा त्रास जाणवू लागताच या गोळ्या घेतल्या तर थोडी मदत होते मात्र डोकेदुखी वरच्या पातळीवर पोहोचली की कोणताही उपाय चालत नाही.
– डॉ. राहुल चकोर, विभागप्रमुख,
मेंदूविकारशास्त्र विभाग,
नायर रुग्णालय
प्राध्यापक व विभागप्रमुख,
मेंदूविकारशास्त्र विभाग,
बा. य. ल. नायर महानगरपालिका रुग्णालय, मुंबई
संग्रहित लेख, दिनांक 21st Mar 2015 रोजी प्रकाशित
उन्हाळा आला, डोकेदुखी वाढली!
ताप हा जसा विविध कारणांमुळे येऊ शकतो, त्याचप्रमाणे डोकेदुखी ही शरीरातील बदलांची निदर्शक आहे. सर्दी, ताप, ताण, अपुरी झोप, विशिष्ट खाद्यपदार्थ.. अनेक कारणांनी डोके दुखण्यास सुरुवात होते.

First published on: 21-03-2015 at 02:38 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summer cause a headache