काही दिवस औषधे घेतल्यानंतर आणि  मलम लावल्यानंतर कंबरदुखी बरी झाली पाहिजे अशी बहुतेक रुग्णांची इच्छा असते. पण औषधांबरोबर कंबरेचे व्यायाम करणे आवश्यक आहे. हे व्यायाम मात्र अस्थिरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावेत. खूप कंबर दुखत असताना व्यायाम करू नये. ‘उपचारापेक्षा प्रतिबंध बरा’ या उक्तीनुसार कंबरदुखी नसतानाच व्यायाम चालू करणे हे इष्ट.
कंबरदुखीत कोणते व्यायाम करावेत आणि कोणते करू नयेत याचे नियम जाणून घ्यावेत. सवय नसताना वेडीवाकडी योगासने करू नयेत. जाणकार प्रशिक्षकांकडूनच आसनं शिकावीत. रुग्णाला हार्निया झाला असेल किंवा नुकतीच हार्नियाची शस्त्रक्रिया झाली असेल तर व्यायाम करू नयेत. त्याचबरोबर अर्धागवायूचा झटका, हृदय विकार या आजारांमध्ये व्यायाम करू नये. ताप आला असतानाही व्यायाम टाळावा. कंबरेचे व्यायाम गरम पाण्याच्या अंघोळीनंतर सावकाश आणि अंगाला झटके न देता करावेत. सांगितलेले व्यायाम अगोदर नीट समजून घेतल्याशिवाय करू नयेत. स्वत:च बदल करून ‘बघू या काय होते’ असे करू नये. डॉक्टरांव्यतिरिक्त इतरांनी अगदी चांगल्या मनाने जरी व्यायामात बदल करायचे सल्ले दिले तरी डॉक्टरांना विचारल्याशिवाय ते अंमलात आणू नयेत. कंबरेचे व्यायाम प्रथम चालू केल्यानंतर काही दिवस पोट व पाठीचे स्नायू जास्त दुखू शकतात. पण काही दिवसानंतर हे कमी होते. जर हा त्रास व कंबरदुखी खूपच वाढली तर अर्थातच लगेच व्यायाम बंद करून डॉक्टरांना दाखवावे.
सकाळी गरम पाण्याच्या अंघोळीनंतर व्यायाम केले तर चांगलेच पण हट्ट नाही. मतितार्थ असा, की व्यायाम केव्हाही करा पण करा! अनेकदा रुग्ण व्यायाम सोडून बाकीच्या सर्व गोष्टीमध्ये चिकित्सक असतात. व्यायामासाठी कपडे कुठले घालू, पायमोजे घालू की नको, पंखा लावायचा की नाही, घाम आला पाहिजे की नाही इ. या प्रश्नांची उत्तरे अगदी सोपी आहेत. आपणास जे आवडतील ते कपडे घालावेत, अर्थातच सूट- बूट घालून व्यायाम करणे जरा कठीण जाईल! उकडत असेल तर पंखा लावावा. व्यायाम केला की घाम आपोआप येतोच! घाम येणे शरीराचे तापमान कमी करण्यासाठी असते. या गोष्टींवर फार विचार व त्रास करून घेऊ नये.  मुख्य म्हणजे नियमितपणे व्यायाम करत रहावे.
जेवणा अगोदर व्यायाम करणे हे चांगले. जेवणानंतर कमीत- कमी २ तासानंतर व्यायाम करावा. पहिले काही दिवस ते आठवडे लोक अगदी नित्यनियमाने घडय़ाळ लावून वेळेवर व्यायाम करतात. जरा बरे वाटायला लागले की व्यायामात हलगर्जीपणा यायला लागतो. व्यायामात व्यत्यय आणणारी कारणे सुचू लागतात!  अशा व्यक्तींच्या जोडीदारांनी त्यांना व्यायाम चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे.
घरी करता येतील असे काही कंबरेचे व्यायाम खालीलप्रमाणे-
१) सिट अप्स / अब्डॉमिनल क्रंच  
सिट अप्स करताना पाठीखाली २-२ उशा ठेवाव्यात. उशा ठेवल्यामुळे ३० ते ४५ अंशांचा कोन मिळतो आणि सिट अप्स करणे सोपे जाते. एका वेळी १० ते १२ वेळा असे या व्यायामाचे २ ते ३ सेट करावेत. अब्डॉमिनल्सची ताकद वाढेल तशा उशा कमी कराव्यात. हा व्यायाम करताना मान सरळ ठेवावी. मान वाकवून व्यायाम करू नये. हात पोटावर किंवा मानेमागे ठेवावेत. पाय मात्र गुडघ्यात वाकवून ठेवावेत. पाय सरळ ठेवून सिट अप्स करू नयेत. कंबरदुखीसाठी हा सर्वात महत्त्वाचा व्यायाम आहे.
२) पेल्व्हिक लेफ्ट
पाठीवर झोपून कंबर ३ ते ४ इंच वर उचलावी. एक ते दहा आकडे म्हणेपर्यंत याच स्थितीत राहावे. हा व्यायाम करताना पाय गुडघ्यात वाकवावेत. कंबर ३ ते ४ इंचांपेक्षा जास्त उचलू नये. तसे केल्यास त्रास होऊ शकतो. कंबर किती वेळ वर धरून ठेवता येते यातच हा व्यायाम आहे. किती वेळा कंबर वर- खाली करता येते हे महत्त्वाचे नाही. हा व्यायाम सिट अप्सपेक्षा सोपा आहे. काही रुग्ण हा व्यायाम जास्त आणि सिट अप्स कमी करून आपण व्यायाम केला असे जाहीर करून टाकतात! हे स्वत:चीच दिशाभूल करण्यासारखे आहे.
३) दोन्ही गुडघे छातीकडे
दोन्ही हातांनी दोन्ही गुडघे पकडून छातीकडे ओढा. चार ते पाच सेकंद धरून ठेवा. नंतर गुडघे खाली घेऊन सावकाश श्वास घ्या. असे ५ वेळा करा.
४) पाय ताठ करून वर उचलणे
पाठीवर झोपा. पाय सरळ व गुडघे ताठ ठेवा. दोन्ही पायांमध्ये दोन इंचांचे अंतर ठेवा. पाय जमिनीपासून साधारणत: पाच इंच वर उचला आणि दहा सेकंद तरी धरून ठेवा. या वेळी पाठीचा खालचा भाग स्थिर करण्यासाठी ओटीपोटाचे स्नायू  ताठर करा. असे दहा वेळा करा.