News Flash

कोथिंबीर आणि पुदिना

आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच गरज लागणारी गोष्ट म्हणजे हिरवे मसाले.

आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच गरज लागणारी गोष्ट म्हणजे हिरवे मसाले. स्वयंपाक स्वादिष्ट बनवण्यासाठी कोथिंबीर व पुदिना हे मसाले हमखास हवे असतातच. हे आणि इतर काही हिरवे मसाले घरच्या घरी सहजच वाढवता येतात; आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांची रोपे आपणांस नर्सरीतून विकत आणण्याचीही गरज नसते. आपल्या स्वयंपाकासाठी आपण बाजारातून जे हिरवे मसाले आणतो, त्यांतीलच काही आपण लागवडीसाठी वापरू शकतो. हे मसाले घरच्या घरी वाढवण्याचा एक मोठा फायदा म्हणजे ते आपल्यास हवे तेव्हा व ताजे असेच मिळवता येतात. बाजारातून आणून फ्रिजमध्ये ठेवलेले मसाले आपला स्वाद काही प्रमाणात तरी गमावून बसतात. त्या उलट आपणच वाढवलेले मसाले वापरण्यात फक्त गंमतच नसते तर त्यांचा नसíगक स्वादही आपण अनुभवू शकतो.
कोथिंबीर : कोथिंबिरीची लागवड करण्यासाठी आपल्या घरातीलच विकत आणलेले धणे वापरता येतात. बऱ्याच जणांची अशी समजूत असते की लागवडीपूर्वी धणे हलकेच चुरडून घ्यावेत. धण्याच्या एका दाण्यात दोन शकले असतात आणि प्रत्येक शकलात एक बी असते. चुरडताना काही वेळा बीला इजा होऊ शकते. म्हणून धणे न चुरडणेच योग्य. धण्याचे ताजे बी हिरवट असून ते सुवासिक असते. काळसर व बिनवासाचे धणे लागवडीस वापरू नयेत. पसरट व उथळ कुंडीत थोडी माती भरून त्यावर विरळ असे धणे पसरावेत; त्यांवर साधारण पाऊण इंच जाड मातीचा थर द्यावा. पहिल्या दिवशी भरपूर पाणी देऊन कुंडी भरपूर उन्हाच्या जागी ठेवावी. बी उगवण्यास साधारण ८ ते १० दिवस लागतात. बी पेरल्यानंतर साधारण ३५ ते ४० दिवसांत कोथिंबीर तयार होते. आपणास हवी तेवढी कोथिंबीर काढून ती वापरत जावी. अशा तऱ्हेने काही दिवसांच्या अंतराने २ ते ३ कुंडय़ांत लागवड करत राहिल्यास आपल्यास वर्षभर ताजी कोथिंबीर मिळत राहते.
पुदिना : पुदिनाची लागवडसुद्धा आपल्यास बाजारातून आणलेल्या पुदिन्यापासून करता येते. विकत आणलेली पुदिन्याची जुडी मोकळी करून घ्यावी. त्यांतील रसरशीत, जाडसर व लाल रंगाच्या खोडांच्या काडय़ा लागवडीस उपयुक्त ठरतात. आशा काडय़ा निवडून त्यांची खालची टोके चेंबटलेली असल्यास ती कात्रीने किंवा धारदार चाकूने कापून टाकावीत. हे काप शक्यतो पेराच्या खालच्या बाजूस फक्त पाव इंचावर द्यावेत. खालच्या साधारण तीन पेरांवरील पाने खुडून टाकावीत. पुदिन्याचीही लागवड पसरट व उथळ कुंडीत करावी. कुंडीत खता-मातीचे मिश्रण भरून त्यात पुदिन्याच्या काडय़ांची खालची, पाने काढलेली पेरे मातीत गाडावीत. मातीत लावताना काडय़ा कुंडीतल्या मातीला समांतर अशा लावाव्यात. कारण पुदिना ही सरपटत वाढणारी वनस्पती आहे. काडय़ांची वाढ सुरू होताच त्यांची वाढणारी टोके खुडून टाकावीत. असे केल्याने प्रत्येक काडीला अनेक फुटवे येऊन कुंडीत पुदिन्याची भरगच्च वाढ होते. पुदिना एकदा भरपूर वाढला की त्याचे काही फुटवे आपण कापून मसाल्यासाठी वापरू शकतो.
अशा प्रकारे झुलत्या कुंडय़ांत कोथिंबीर किंवा पुदिन्याची लागवड करून त्या कुंडय़ा स्वयंपाकघराच्या खिडकीत टांगल्यास शोभिवंत तर दिसतीलच, पण हवे तेव्हा आपल्यास ते मसाले ताजे मिळू शकतील.
नंदन कलबाग
response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 1:30 am

Web Title: coriander and mint
Next Stories
1 आलामांडा
2 युफोर्बिया मिली
3 कृष्णकमळ
Just Now!
X