इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

जैव-सुरक्षित वातावरण आणि प्रेक्षकांविना सामन्यांमुळे इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) क्रिकेटपटूंच्या तीव्रतेत कोणताही बदल होणार नाही. आता परिस्थितीचा स्वीकार करीत ते मानसिकदृष्टय़ा सज्ज झाले आहेत, असे मत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे.

‘आयपीएल’च्या १३व्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून प्रारंभ होत असून, बेंगळूरुचा संघ २१ ऑगस्टलाच संयुक्त अरब अमिरातीमध्ये दाखल झाला आहे. गेले दोन आठवडे बेंगळूरुचा सराव सुरू असून, यात संघांतर्गत सराव सामन्यांचाही समावेश आहे. सद्य:स्थितीबाबत भाष्य करताना कोहली म्हणाला, ‘‘प्रामाणिकपणे सांगायचे तर आम्ही सभोवतालच्या परिस्थितीमुळे अधिक स्वीकारायला लागलो आहोत. पहिल्या दिवसापासूनच स्वीकृती हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे मी अनुभवले आहे. जैव-सुरक्षित वातावरणात आम्ही आता पूर्णत: निवांत आहोत.’’

‘आयपीएल’ प्रथमच प्रेक्षकांविना होणार आहेत, याबाबत कोहली म्हणाला, ‘‘ही काळाची गरज आहे. अमिरातीत येण्यापूर्वी हे आश्चर्यकारक वाटत होते, हे मी नाकारणार नाही; परंतु गेल्या काही दिवसांतील सराव सत्रे आणि सराव सामन्यांतून आमची मानसिकता विकसित झाली आहे. प्रेक्षक हा खेळाचा प्रमुख घटक असला, तरी आपण खेळायला का सुरुवात केली, हे समजून घ्यायला हवे.’’

इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना ३६ तासांचे विलगीकरण

नवी दिल्ली : ‘आयपीएल’साठी अमिरातीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, जोफ्रा आर्चर, जोस बटलर यांच्यासह २१ क्रिकेटपटूंना दिलासा मिळाला आहे. सामन्यापूर्वी सहा दिवसांऐवजी फक्त ३६ तासांच्या विलगीकरणाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. ‘आयपीएल’चे विलगीकरण शिथिल करण्यासंदर्भात ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीने अमिरातीमधील प्रशासनाशी केलेली बोलणी यशस्वी ठरली आहेत.

कोहलीचे अग्रस्थान कायम

दुबई : ‘आयसीसी’ एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने अग्रस्थान कायम राखले आहे. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर (एकूण १९६ धावा) इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोने अव्वल दहा फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. कोहली (८७१ गुण) पहिल्या आणि उपकर्णधार रोहित शर्मा (८५५ गुण) दुसऱ्या स्थानावर आहे. ग्लेन मॅक्सवेलने शतक साकारत पाच स्थानांनी सुधारणा करीत २६वे स्थान मिळवले आहे.

कोविडयोद्धय़ांसाठी बेंगळूरूची खास जर्सी

‘आयपीएल’च्या संपूर्ण हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा संघ कोविडयोद्धय़ांच्या सन्मानार्थ ‘माय कोविड हिरोज’ हे वाक्ये लिहिलेली जर्सी परिधान करणार आहे, अशी माहिती कर्णधार विराट कोहलीने दिली. याचप्रमाणे बेंगळूरुच्या पहिल्या सामन्यात क्रिकेटपटू परिधान करणाऱ्या जर्सीचा लिलाव केला जाणार असून, यातून मिळणारी रक्कम सामाजिक संघटनेला दिली जाणार आहे.

मलिंगाची उणीव तीव्रतेने भासेल -रोहित

‘आयपीएल’च्या यंदाच्या हंगामात श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या अनुभवाची आम्हाला तीव्रतेने उणीव भासणार आहे, असे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले. ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक १७० बळी खात्यावर असणाऱ्या ३७ वर्षीय मलिंगाने वैयक्तिक कारणास्तव स्पध्रेतून माघार घेतली आहे. जेम्स पॅटिन्सन, धवल कुलकर्णी आणि मोहसिन खान अशी वेगवान गोलंदाजांची फळी मुंबईकडे आहे. परंतु ते मलिंगाची जागा घेऊ शकणार नाहीत, असे रोहितने सांगितले. ‘‘मागील हंगामाप्रमाणेच मी यंदाही सलामीला फलंदाजीला उतरणार आहे,’’ असे रोहितने सांगितले.