आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत विजयासाठी झगडणाऱ्या सनरायजर्स हैदराबादला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी चेन्नई सुपर किंग्जशी सामना करावा लागणार आहे. हैदराबादच्या खात्यावर ७ सामन्यांतील ३ विजयांसह ६ गुण जमा आहेत. या पाश्र्वभूमीवर आपले आव्हान टिकवून बाद फेरीचे स्वप्न शाबूत राखण्यासाठी हैदराबादला चेन्नईविरुद्धचा विजय महत्त्वाचा असेल. हैदराबादच्या संघाला घरचे मैदान नेहमीच यशस्वी ठरत आले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात घरच्या मैदानावर पहिलाच सामना खेळणाऱ्या हैदराबादला चेन्नईविरुद्ध विजयाची आशा धरता येऊ शकेल.
चेन्नई सुपर किंग्जने ८ सामन्यांपैकी फक्त २ सामने गमावले आहेत. त्यामुळे १२ गुणांसह ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान आहेत. चेन्नईत ११ एप्रिलला झालेल्या लढतीत चेन्नईने हैदराबादचा ४५ धावांनी पराभव केला होता. त्यामुळे चेन्नईचा संघ आपल्या दर्जाला साजेसा खेळ दाखवत आणखी एका विजयाची भर घालू शकेल.
चेन्नईच्या बलाढय़ चमूत महेंद्रसिंग धोनी, ब्रेंडन मॅक्क्युलम, ड्वेन स्मिथ, सुरेश रैना, फॅफ डय़ू प्लेसिस, ड्वेन ब्राव्हो यांच्यासारखे दिग्गज फलंदाज आहेत. याचप्रमाणे प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वेसण घालू शकणारे आशीष नेहरा, मोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि पवन नेगी यांच्यासारखे गोलंदाज आहेत.
हैदराबादच्या फलंदाजीची मधली फळी ही हैदराबादची चिंतेची बाब आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीने आपली जबाबदारी चोख बजावली आहे. फलंदाज लोकेश राहुल, नमन ओझा, रवी बोपारा, मोझेस हेन्रिक्स आणि स्थानिक खेळाडू हनुमा विहारी यांच्याकडून संघाला चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. याचप्रमाणे ट्रेंट बोल्ट, भुवनेश्वर कुमार, अष्टपैलू हेन्रिक्स, डेल स्टेन आणि इशांत शर्मा यांच्यावर संघाची गोलंदाजीची धुरा आहे.
स्थानिक इंग्लिश हंगामात खेळण्यासाठी आयपीएल स्पध्रेतून माघार घेण्याचा निर्णय केव्हिन पीटरसनने घेतल्यामुळे हैदराबादच्या संघाला एका महत्त्वाच्या फलंदाजाची उणीव भासत आहे.  

*सामन्याची वेळ : रात्री ८ वा. पासून *थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स, सोनी सिक्स.