ख्रिस गेल नावाचे तूफान सोमवारी पंजाबमध्ये घोंघावणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ विजयी आवेशातच मोहालीत आला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब हा संघ आश्चर्यकारक निकाल देण्यासाठी विशेष ओळखला जातो. पण सध्या किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान टिकणे मुश्कील झाले आहे. आयपीएलच्या सहाव्या पर्वातील ‘प्ले-ऑफ’चे चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि पुणे वॉरियर्स संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. पंजाबच्या खात्यावर १० सामन्यांतील चार विजयांसह आठ गुण जमा आहेत. त्यामुळे बाद फेरीचे स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी पंजाबला उर्वरित सर्व सामने जिंकण्याची आवश्यकता आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात स्फोटक फलंदाज ख्रिस गेल, कप्तान विराट कोहली मौजूद आहेत. परंतु पंजाबचा संघ नियमित कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्टशिवाय पुन्हा खेळण्याची शक्यता आहे. कागदावर तरी बंगळुरू सरस दिसतोय. ११ सामन्यांतील सात विजयांसह त्यांच्या खात्यावर दुसऱ्या क्रमांकाचे १४ गुण जमा आहेत.
२३ एप्रिल या दिवशी बंगळुरूने आयपीएलमधील २६३ ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. गेलने पुणे वॉरियर्सच्या गोलंदाजीची अक्षरश: पिसे काढली. त्याने ६६ चेंडूंत विक्रमी १७५ धावा केल्या. या गेललाच वेसण घालण्याचे पंजाबच्या गोलंदाजांसमोर प्रमुख आव्हान असेल.
पुण्यावर १३० धावांनी मिळविलेल्या या दणदणीत विजयानंतर बंगळुरूचा संघ दोन सलग सामने हरला होता. पण त्यानंतर पुण्यात पुणे वॉरियर्सला पुन्हा हरवून बंगळुरूचा संघ विजयी अविर्भावात वावरत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या घरच्या मैदानावरील सर्व सामने जिंकले आहेत.
गेलच्या खात्यावर आता पाचशेहून अधिक धावा जमा आहेत. कोहली, ए बी डी’व्हिलियर्स यांच्याकडे गोलंदाजांवर वर्चस्व गाजविण्याची क्षमता आहे. बंगळुरूचा गोलंदाजीचा मारासुद्धा युवा आणि अनुभवी आहे. वेगवान गोलंदाज विनय कुमार आणि आर. पी. सिंग टिच्चून गोलंदाजी करीत आहे. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आणि मुरली कार्तिक फिरकीची धुरा वाहात आहेत.
दुसरीकडे पंजाबचा संघ मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून १५ धावांनी पराभूत झाला. त्याआधी पंजाबने मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करला होता. खराब कामगिरी करणाऱ्या गिलख्रिस्टऐवजी डेव्हिड हसीकडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
फलंदाजीच्या विभागात ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शवर पंजाबची मदार असेल. मनदीप सिंग आणि डेव्हिड मिलर चांगले फॉर्मात आहेत. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अझर मेहमूद प्रतिस्पर्धी संघासाठी कधीही धोकादायक ठरू शकतो. वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार, फिरकी गोलंदाज पियुष चावला पंजाबकडे आहेत. याशिवाय परविंदर अवानासुद्धा त्यांच्याकडे आहे.
सामना : किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
स्थळ : पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली
वेळ : रात्री ८ वाजल्यापासून