सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्सवर विजय मिळवल्यावर दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत करण्यासाठी गतविजेता कोलकाता नाइट रायडर्सचा संघ सज्ज झाला आहे. बंगळुरूचा हा मोसमातील पहिलाच सामना असून ते विजयानिशी या स्पर्धेची सुरुवात करतात का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
मुंबईविरुद्धच्या लढतीमध्ये मॉर्नी मॉर्केलने भेदक मारा केला होता, तर कर्णधार गौतम गंभीरने अर्धशतक झळकावले होते. सूर्यकुमार यादवने अखेपर्यंत झुंज देत संघाला विजय मिळवून दिला होता. संघातील युसूफ पठाणसारख्या फलंदाजाला अजूनही सूर गवसलेला नाही तर फिरकीपटू सुनील नरिनलाही आपली छाप पाडता आलेली नाही.
कर्णधार विराट कोहली, ए बी डी’व्हिलियर्स आणि ख्रिस गेल असे एकामागून एक तडफदार फलंदाज बंगळुरूकडे आहेत. या तिघांपैकी एकानेही मोठी खेळी साकारली तर बंगळुरूचा विजय निश्चित समजला जाऊ शकतो. संघात दिनेश कार्तिक आणि विजय झोलसारखे गुणवान फलंदाजही आहेत. वरुण आरोन आणि अशोक दिंडा यांच्यावर वेगवान गोलंदाजीची मदार असेल. त्याचबरोबर डॅरेन सॅमीसारखा अष्टपैलू खेळाडूही संघात आहे. इक्बाल अब्दुल्ला आणि युझवेंद्र चहल या युवा फिरकीपटूंची कामगिरी लक्षणीय ठरू शकते.

प्रतिस्पर्धी संघ
कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), अझर मेहमूद, जोहान बोथा, केसी करियप्पा, पीयूष चावला, पॅट कमिन्स, आदित्य गहरवाल, ब्रॅड हॉग, शेल्डॉन जॅक्सन, कुलदीप यादव, मॉर्ने मॉर्केल, सुनील नरिन, सुमीत नरवाल, मनीष पांडे, युसूफ पठाण, वीर प्रताप सिंग, वैभव रावळ, आंद्रे रसेल, शकीब अल हसन, रायन टेन डुस्काटा, रॉबिन उथप्पा, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, ख्रिस लिन, जेम्स नीशाम.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), ख्रिस गेल, ए बी डी’व्हिलियर्स, वरुण आरोन, सीन अबॉट, अबू नेचिम, सुब्रमण्यम बद्रिनाथ, शिशिर बावणे, मनविंदर बिस्ला, युझवेंद्र चहल, अशोक दिंडा, इक्बाल अब्दुल्ला, दिनेश कार्तिक, सर्फराझ खान, निक मॅडिसन, मनदीप सिंग, अ‍ॅडम मिलने, हर्षल पटेल, रिले रोसू, डॅरेन सॅमी, संदीप वॉरियर, जलाज सक्सेना, मिचेल स्टार्क, योगेश ताकवले, डेव्हिड वाइज, विजय झोल.
सामन्याची वेळ : रात्री ८.०० वा. पासून.
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स वाहिनीवर.