सलग दोन पराभवांनंतर अव्वल स्थान गमावणारा राजस्थान रॉयल्सचा संघ विजयाच्या वाटेवर परतण्यासाठी प्रयत्नशील असेल. राजस्थान आपल्या घरच्याच मैदानात शनिवारी सनरायजर्सशी दोन हात करायला सज्ज असून गतवैभव पुन्हा मिळवण्याचेच त्यांचे ध्येय असेल.
घरच्या मैदानात राजस्थानने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. गेल्या दोन सामन्यांमध्ये चेन्नई आणि बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला असला तरी घरच्या मैदानात खेळताना त्यांचा आत्मविश्वास खचलेला नक्कीच नसेल. दुसरीकडे सनरायजर्सचा संघ तिसऱ्या स्थानावर असून हा सामना जिंकून अव्वल क्रमांकाच्या दिशेने कूच करण्याचे त्यांचे प्रयत्न असतील.
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या शेन वॉटसनने हंगामातील पहिले शतक झळकावले असून फलंदाजीबरोबरच गोलंदाजीमध्येही तो चांगल्या फॉर्मात आला आहे. वॉटसनबरोबरच कर्णधार राहुल द्रविड आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर राजस्थानच्या फलंदाजीची मदार असेल, तर ब्रॅड हॉज, स्टुअर्ट बिन्नी आणि दिशांत याज्ञिक यांच्यांकडूनही संघाला उपयुक्त खेळींची अपेक्षा असेल.
गोलंदाजीमध्ये जेम्स फाऊल्कनर आणि सिद्धार्थ त्रिवेदी सातत्याने चांगली गोलंदाजी करत आहेत, तर अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या फिरकीपटूंकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. एस. श्रीशांतला अजूनही सूर गवसलेला नाही.
 शिखर धवन संघात आल्यामुळे हैदराबादच्या फलंदाजीला चांगला आकार आला आहे. त्यामुळे हैदराबादची फलंदाजीची ताकद अधिक बळकट झाली आहे. कारण कर्णधार कॅमेरून व्हाइट, पार्थिव पटेल यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरी होताना दिसत नाही. सनरायजर्सचा संघ हा गोलंदाजीसाठी ओळखला जात असला तरी चेन्नईविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने त्यांची ससेहोलपट केली होती. डेल स्टेन, डॅरेन सॅमी आणि इशांत शर्मा या वेगवान त्रिकुटाला पुन्हा फॉर्मात यावे लागेल. अमित मिश्रा संघासाठी सातत्याने भेदक गोलंदाजी करताना दिसतो. करन शर्मा या युवा ‘लेग-स्पिनर’ने चेन्नईविरुद्धच्या सामन्याच अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केला होता. त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा उंचावल्या असतील.
सामन्याची वेळ : दु. ४ वा.पासून