‘करो या मरो’ सामन्यात कशी फलंदाजी करावी, याचा उत्तम वस्तुपाठ शेन वॉटसनने आपल्या सनसनाटी शतकाच्या जोरावर दाखवून दिला. वॉटसनने नाबाद शतक झळकावत कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजीची पिसे काढली. त्याच्या या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने २० षटकांमध्ये ६ फलंदाज गमावत १९९ धावांचा डोंगर उभारला.
वॉटसन आणि अजिंक्य रहाणे यांनी पहिल्या षटकापासूनच कोलकात्या फलंदाजांवर आसूड ओढायला सुरुवात केली. या दोघांनी कोलकात्या गोलंदाजांची पिसे काढत ४.३ षटकांमध्येच संघाला अर्धशतकी मजल गाठून दिली. अर्धशतक झळकावल्यावर या जोडीने अधिक आक्रमक आणि नजाकतभरे फटके मारत प्रेक्षकांनी फलंदाजीची लज्जतदार मेजवानी दिली. ही जोडी आता बलाढय़ धावसंख्या उभारून देणार असे वाटत असतानाच अजिंक्य धावबाद झाला, अजिंक्यने २२ चेंडूंत ३ चौकार आणि दोन षटकार लगावत ३७ धावा केल्या. या जोडीने सात षटकांमध्ये ८० धावांची दणदणीत सलामी दिली. अजिंक्य बाद झाल्यावर वॉटसनने सारी सूत्रे हातात घेतली, पण त्याला अन्य फलंदाजांकडून चांगली साथ मिळाली नाही. एकामागून एक फलंदाज बाद होत असताना वॉटसनने धावगती कायम राखली. ३१ व्या चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने ९.२ षटकांमध्ये शतक पूर्ण केले. अर्धशतकानंतरही फटकेबाजी कायम ठेवत त्याने कोलकाताची गोलंदाजी बोथट केली.
१९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूंवर त्याने शतक झळकावले. वॉटसनने ५९ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद १०४ धावांची दणकेबाज खेळी साकारत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. रसेलने ४ षटकांमध्ये ३२ धावा देत तीन फलंदाजांना माघारी धाडले.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ६ बाद १९९ ( शेन वॉटसन नाबाद १०४, अजिंक्य रहाणे ३७; आंद्रे रसेल ३/३२) वि. कोलकाता नाइट रायडर्स.
धावफलक अपूर्ण