02 March 2021

News Flash

मी भारताचे प्रतिनिधित्व करतो हे मुंबईकर प्रेक्षक विसरतात

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूविरुद्धच्या धावचीतचे अपील करणारा रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीची मुंबईकर प्रेक्षकांनी हुर्यो उडवली. या प्रकारामुळे संतापलेल्या कोहलीने मुंबईकर प्रेक्षकांवर टीका केली आहे.

| April 29, 2013 01:56 am

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूविरुद्धच्या धावचीतचे अपील करणारा रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीची मुंबईकर प्रेक्षकांनी हुर्यो उडवली. या प्रकारामुळे संतापलेल्या कोहलीने मुंबईकर प्रेक्षकांवर टीका केली आहे. मी भारतासाठी खेळतो हे आयपीएलचे प्रेक्षक विसरून जातात. त्यांच्या या वागण्यामुळे खेळाडूंमध्ये दुही निर्माण होऊ शकते, असा इशाराही कोहलीने दिला आहे.
मुंबई इंडियन्सचा खेळाडू अंबाती रायुडू वादग्रस्त पद्धतीने धावचीत झाला. धाव पूर्ण करत असताना रायुडू आणि बंगळुरूचा गोलंदाज विनय कुमार यांची टक्कर झाली. रायुडूची बॅट जमिनीलगत असल्याचे दिसत होते. मात्र टक्कर होते वेळी बॅट हवेतच राहिल्याचे स्पष्ट झाले. याच वेळी विराट कोहलीच्या थेट धावफेकीने यष्टय़ांचा निशाणा अचूक साधला. विनय कुमारशी झालेल्या टकरीमुळे रायुडूला क्रीजमध्ये परतणे शक्य झाले नव्हते. मात्र थेट धावफेकीनंतर कोहलीने अपील केले आणि रायुडूला बाद देण्यात आले. खिलाडूवृत्ती दाखवून कोहलीला अपील मागे घेता आले असते. मात्र त्याने तसे केले नाही. हा प्रकार पाहून मुंबईच्या प्रेक्षकांनी कोहलीची हुर्यो उडवली. प्रेक्षकांनी कोहलीला खलनायक बनवत खोटारडा असल्याची शेरेबाजी केली. हा प्रकार कोहली फलंदाजीला आल्यानंतर तसेच सामनावीर पुरस्कारांच्या वितरणा वेळीही सुरू होता.  

‘‘प्रेक्षकांच्या बाबतीत बोलायचे तर काही खेळाडूंच्या बाबतीत असे प्रकार झाले आहेत. आयपीएलदरम्यान प्रेक्षक एवढे आक्रमक का होतात मला समजत नाही. आयपीएल जगातली एकमेव स्पर्धा नाही. ही मंडळी हे विसरतात की, ज्या खेळाडूची तुम्ही हुर्यो उडवताय, तो भारताचे प्रतिनिधित्व करतो. यामुळे खेळाडूंमध्ये फूट पडू शकते. जेव्हा पुढच्या वेळेला याच मैदानावर मी भारतासाठी खेळायला उतरेन, तेव्हा ते माझ्याच नावाचा पुकारा करणार आहेत, पण हे वागणे योग्य नव्हे. बंगळुरूला कुठल्याही संघाच्या खेळाडूला कसा पाठिंबा मिळतो हे मुंबईकर प्रेक्षकांनी अनुभवावे,’’ असा सल्लाही कोहलीने दिला आहे.
‘‘मुंबईत प्रेक्षकांना काय होतं कळत नाही. प्रेक्षक तुमची हुर्यो उडवतात तेव्हा वाईट वाटते. बंगळुरूमध्ये प्रत्येक भारतीय खेळाडूला पाठिंबा मिळतो. चांगल्या खेळाचा सन्मान करावा. मुंबईकर प्रेक्षक आयपीएलमधील अन्य संघांचा एवढा दुस्वास का करतात ते कळत नाही. आयपीएल ही काही जगातली एकमेव स्पर्धा नाही. धावचीतबद्दल प्रेक्षकांनी क्रिकेटच्या नियमांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. गोलंदाजाने जाणीवपूर्वक फलंदाजाच्या धावण्याच्या मार्गात अडथळा आणला असता तर पंचांनी फलंदाजाला खेळपट्टीवरच थांबण्याची सूचना केली असती, पण तसे घडलेच नव्हते. पंचांनी त्यांचे काम केले. विनय कुमारने रायुडूला पाहिले नाही आणि रायुडूनेही विनयला पाहिले नाही आणि म्हणून त्यांची टक्कर झाली. यात वावगे असे काहीच नाही. क्रिकेटच्या नियमांबाबत एवढी तरी जागरूकता असणे आवश्यक आहे,’’ असे कोहलीने पुढे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2013 1:56 am

Web Title: why audience forget that i am representing of india
टॅग : Ipl,Sports
Next Stories
1 सनरायजर्सचा सूर्यास्त!
2 मुंबईचे ‘स्मिथ’हास्य!
3 पराभवाचा बदला घेण्यासाठी कोलकाता नाइट रायडर्स सज्ज
Just Now!
X