ट्वेन्टी-२० क्रिकेट म्हणजे फलंदाजांचा खेळ ही रुढ संकल्पना मोडून काढत अनुभवी गोलंदाज झहीर खानने भेदक गोलंदाजीचा अप्रतिम नमुना सादर करत दिल्लीला बलाढय़ चेन्नईविरुद्ध अनपेक्षित सहा विकेट्सने विजय मिळवून दिला. बाद फेरीत प्रवेशाचे दिल्लीचे स्वप्न जवळपास मावळले आहे. मात्र तरीही जिद्दीने खेळ करत दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या चेन्नईला अवघ्या ११९ धावांत रोखले. प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्लीची सुरुवातही अडखळत झाली, मात्र अर्धशतकवीर श्रेयस अय्यर आणि युवराज सिंग जोडीने दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भरवशाच्या जेपी डय़ुमिनीला त्रिफळाचीत करत इश्वर पांडेने दिल्लीला अडचणीत आणले. मात्र यानंतर श्रेयस अय्यर आणि युवराज सिंग जोडीने कोणतेही दडपण न घेता चौकारांची लयलूट केली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी करत दिल्लीचा विजय सुकर केला. पवन नेगीने युवराजला बाद करत ही जोडी फोडली. युवराजने २८ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह ३२ धावा केल्या. नेगीने अ‍ॅल्बी मॉर्केललाही बाद केले. मात्र श्रेयसने ४९ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह नाबाद ७० धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी दिल्लीच्या भेदक गोलंदाजीसमोर चेन्नईला केवळ ११९ धावांचीच मजल मारता आली. पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्ये चेन्नईला फक्त १६ धावा करता आल्या. आयपीएलच्या आठही हंगामात पॉवरप्लेच्या षटकांमधली चेन्नईची ही नीचांकी धावसंख्या आहे. प्रत्येक चेंडूवर चाचपडणाऱ्या ब्रेंडन मॅक्क्युलमला (११) झहीर खानने जेपी डय़ुमिनीकडे झेल देण्यास भाग पाडले. ट्वेन्टी-२० सामन्यात कसोटीप्रमाणे नांगर टाकून खेळणाऱ्या ड्वेन स्मिथला (१८) अ‍ॅल्बी मॉर्केलने पायचीत केले. यंदाच्या हंगामात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेला सुरेश रैना (११) यासामन्यातही झटपट बाद झाला.  फॅफ डू प्लेसिस आणि महेंद्रसिंग धोनी यांनी चौथ्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी करत डाव सावरला. संथ आणि धीम्या खेळपट्टीवर या जोडीला धावांसाठी संघर्ष करावा लागला. चौकार आणि षटकारांऐवजी या जोडीने एकेरी, दुहेरी धावांवरच भर ठेवला. अ‍ॅल्बी मॉर्केलचा उजव्या यष्टीबाहेरचा चेंडू खेळण्याचा डू प्लेसिसचा प्रयत्न फसला. त्याने २९ धावांची खेळी केली. अष्टपैलू ड्वेन ब्राव्होला गुरिंदर संधूने ८ धावांवर माघारी धाडले. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात असलेला धोनी झहीरच्या गोलंदाजीवर नदीमकडे झेल देऊन बाद झाला. त्याने २७ धावा केल्या. दिल्लीतर्फे झहीर खानने चार षटकांत एक निर्धाव षटकासह फक्त नऊ धावा देत दोन बळी घेतले. मॉर्केलने २१ धावांत २ बळी घेत झहीरला चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्स : २० षटकांत ६ बाद ११९ (फॅफ डू प्लेसिस २९, महेंद्रसिंग धोनी २७, झहीर खान २/९, अ‍ॅल्बी मॉर्केल २/२१) पराभूत वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : १६.४ षटकांत ४ बाद १२० (श्रेयस अय्यर ७०, युवराज सिंग ३२, इश्वर पांडे २/२७)
सामनावीर : झहीर खान.