सेन्सेक्स २७ हजाराखाली; निर्देशांकात १७५ अंश घसरण

१७५.४० अंश घसरणीसह सेन्सेक्स २६,९०४.११ पर्यंत तर ४६.१० अंश नुकसानासह ८,१४३.६० वर स्थिरावला.

१७५ अंश घसरणीमुळे सेन्सेक्स २७ हजाराखाली उतरला.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या निदर्शक आकडेवारीबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या भांडवली बाजाराचा सप्ताहरंभ घसरणीने झाला. एकाच व्यवहारातील १७५ अंश घसरणीमुळे सेन्सेक्स २७ हजाराखाली उतरला. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेतील रुपयाचे पुन्हा कमकुवत होणेही निफ्टीतील जवळपास अर्ध शतकी आपटीने रुपांतरित झाले. १७५.४० अंश घसरणीसह सेन्सेक्स २६,९०४.११ पर्यंत तर ४६.१० अंश नुकसानासह ८,१४३.६० वर स्थिरावला. दोन्ही प्रमुख निर्देशांकात अध्र्या टक्क्य़ाची घसरण नोंदली गेली.
भांडवली बाजाराने देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या वित्तीय निकालांची चिंताही वाहिली. इन्फोसिसने चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीचे नफ्यातील किरकोळ वाढीचे निष्कर्ष जाहीर करतानाच आगामी महसूल वाढीबाबत संकोच निर्माण केल्याने बाजारात कंपनीच्या समभागांसह एकूणच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांचे मूल्य रोडावले.
सप्टेंबरमधील किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर तसेच ऑगस्टमधील औद्योगिक उत्पादन दर सोमवारी उशिरा जाहीर होणे अपेक्षित होते. या आकडय़ांबाबत चिंता व्यक्त करताना गुंतवणूकदारांनी बाजारात आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी समभाग विक्रीचा सपाटा लावला.
सेन्सेक्समधील ल्युपिन, सिप्ला, सन फार्मा, टीसीएस, डॉ. रेड्डीज यांचे समभाग मूल्य मोठय़ा फरकाने घसरले. तर काळ्या पैशाच्या चर्चेने सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाचा समभाग ३ टक्क्य़ांनी घसरला. गेल्या आठवडय़ातील घसरणही पोलाद क्षेत्रातील समभागांनी सोमवारी भरून काढताना मूल्य तेजी नोंदविली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sensex closes 175 points down