भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी आयपीएलमधील रणजी खेळाडूंच्या फलंदाजीवर जोरदार टीका केली आहे. यंदाच्या हंगामात आयपीएलमध्ये चेंडू उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर रणजीतले दादा फलंदाज अपयशी ठरल्याचं गावसकर म्हणाले आहेत. टाइम्स ऑफ इंडियासाठी लिहीलेल्या स्तंभलेखात गावसकर यांनी आपले विचार मांडले आहेत.

अवश्य वाचा – पोलार्ड नेहमीच आमचा तारणहार, रोहित शर्माने केलं कौतुक

“यंदाच्या हंगामात बीसीसीआयने आयपीएलच्या सामन्यांसाठी ज्या खेळपट्ट्या बनवल्या आहेत, त्यासाठी त्यांचं कौतुक करायलाच हवं. पहिल्या चेंडूपासून खेळपट्टीत उसळी असल्याचं आपण आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये पाहिलं आहे. पारंपारिक खेळपट्ट्यांप्रमाणे यंदाच्या आयपीएलमध्ये चेंडू फारसे वळत नाहीयेत. याच खेळपट्ट्यांनी रणजी क्रिकेटमधल्या काही प्रमुख खेळाडूंचं पितळ उघडं पाडलं आहे.” गावसकर यांनी नाव न घेता रणजी करंडक विजेते मुंबई व अन्य संघातील खेळाडूंना आपल्या टीकेचं लक्ष्य बनवलं आहे.

उसळी घेणाऱ्या चेंडूवर रणजी क्रिकेटमधले काही महारथी फलंदाज अक्षरशः चाचपडताना दिसले. यातील काही खेळाडूंना तर गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय संघाचे संभाव्य दावेदार म्हणून पाहिलं जातं होतं. मात्र आयपीएलच्या एका हंगामाने त्यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. वर्षाअखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे, तिकडच्या खेळपट्टयांवर चेंडू अधिक उसळी घेतो, अशा परिस्थितीत भारतीय फलंदाजांना आपल्या शैलीत लवकरात लवकर बदल करण्याची गरज असल्याचंही गावसकर म्हणाले.

अवश्य वाचा – हार्दिक पांड्या आणि के एल राहुलने केली जर्सीची अदलाबदल, चाहत्यांकडून कौतुक