कर्णधार रोहित शर्माने जबाबदारीला आक्रमकतेची जोड दिली व मुंबईला पुन्हा विजयपथावर आणले. त्याने केलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने चेन्नई सुपरकिंग्जला आठ गडी व दोन चेंडू राखून हरवत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेतील आव्हान राखले. सात सामन्यांमध्ये त्यांचा हा दुसरा विजय आहे.

मुंबईला विजयासाठी १७० धावांचे माफक लक्ष्य होते. शर्मा (नाबाद ५६), सूर्यकुमार यादव (४४) व एविन लेविस (४७) यांनी केलेल्या शैलीदार खेळामुळे त्यांना महत्त्वपूर्ण विजय मिळवता आला. त्याआधी चेन्नईने २० षटकांत ५ बाद १६९ धावा रचल्या. त्यामध्ये सुरेश रैनाबरोबरच अंबाती रायडू (४६) व कर्णधार महेंद्रसिंग धोनी (२६) यांचाही वाटा होता.

लागोपाठ पराभव स्वीकारणाऱ्या मुंबईच्या कामगिरीबाबत उत्सुकता होती. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. येथील पहिल्या सामन्यातील शतकवीर शेन वॉटसनची विकेट लवकर गमावल्यानंतर रैना व रायडू यांनी मुंबईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. अनेक वेळा गोलंदाजीत बदल होऊनही त्याचे दडपण न घेता त्यांनी चौफेर फटकेबाजी करीत सात षटकांत ७१ धावांची भागीदारी रचली. रायुम्डु याने दोन चौकार व चार षटकारांसह ४६ धावा केल्या. रैनाने त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या साथीत ५.५ षटकांत ४६ धावा जमविल्या. सुरुवातीला धोनीने संथ खेळ केला. मात्र नंतर त्यानेही काही सुरेख फटके मारले.  धोनीने तीन चौकार व एक षटकारासह २६ धावा केल्या. तथापि तो बाद झाल्यानंतर चेन्नईने आणखी दोन विकेट्स हकनाक गमावल्या. त्यामुळेच त्यांना दोनशे धावांपर्यंत मजल गाठता आली नाही. एका बाजूने तडाखेबाज खेळ करीत रैनाने नाबाद ७५ धावा टोलविल्या. त्यामध्ये सहा चौकार व चार षटकारांचा समावेश होता.

मुंबईच्या सूर्यकुमार यादव व एविन लेविस यांनी आश्वासक खेळ करीत षटकांमागे सात धावांचा वेग ठेवला व ६९ धावांचा पाया रचला. यादवने पाच चौकार व एक षटकारासह ४४ धावा केल्या. यादवच्या जागी आलेल्या शर्माने सुरुवातीच्या सावध खेळानंतर चौदाव्या षटकांत वॉटसनला दोन षटकार खेचले. लेविसनेही आत्मविश्वासाने फलंदाजी करीत एक बाजू लावून धरीत ४७ धावा केल्या. त्यामध्ये त्याने तीन चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. लेविस बाद झाल्यानंतर शर्माने हार्दिक पंडय़ाच्या साथीत विजय खेचून आणला.

संक्षिप्त धावफलक –

चेन्नई सुपरकिंग्ज- २० षटकांत ५ बाद १६९ ( सुरेश रैना नाबाद ७५, अंबाती रायडू ४६, महेंद्रसिंग धोनी २६; कृणाल पंडय़ा २/३२, मिचेल मॅकक्लॅघन २/२६) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १९.४ षटकांत २ बाद १७० (रोहित शर्मा नाबाद ५६, एविन लेविस ४७, सूर्यकुमार यादव ४४; हरभजन सिंग १/२०)

आयपीएलमधील महत्वाच्या अपडेटस
सलामीवीर शेन वॅटसन १२ धावांवर बाद, कुणाल पांडयाच्या गोलंदाजीवर झेलबाद

पहिल्या पावर प्लेमध्ये चेन्नईच्या ६ षटकात एक बाद ५१ धावा

दुसऱ्या विकेटसाठी २६ चेंडूत ५० धावांची भागीदारी

अंबाती रायडू ४६ धावांवर बाद

चेन्नईच्या १२.२ षटकात १०० धावा.

१५ षटकात चेन्नईच्या दोन बाद ११७ धावा

कर्णधार महेंद्रसिंह धोनी २६ धावांवर बाद, मिचेल मॅक्लेघनच्या गोलंदाजीवर लिविसकडे दिला झेल.

ब्राव्हो शून्यावर बाद, मॅक्लेघनच्या गोलंदाजीवर मार्केंडेकडे दिला झेल.

सुरेश रैनाचे शानदार अर्धशतक

मुंबईला विजयासाठी १७० धावांचे लक्ष्य

मुंबई इंडियन्सची दमदार सुरुवात, बिनबाद ६५ धावा

पावरप्लेमध्ये सहा षटकात ५० धावा

सूर्यकुमार यादव नाबाद ४२, लुईस नाबाद १७

सूर्यकुमार यादवला ४४ धावांवर हरभजन सिंगने केले बाद

मुंबईच्या १२ षटकात १ बाद ९३ धावा