१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होते आहे. सर्व संघ या हंगामासाठी कसून सराव करत आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघानेही सरावाला सुरुवात केली आहे. श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीने गेल्या हंगामात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे यंदा या संघाकडून अनेकांना अपेक्षा आहेत. २० सप्टेंबरला दिल्लीचा संघ पंजाबविरुद्ध या हंगामातला पहिला सामना खेळणार आहे. हंगामाला सुरुवात होण्याआधी कर्णधार श्रेयस अय्यरने एका मुलाखतीत दिग्गज क्रिकेटपटू रिकी पॉन्टींग आणि सौरव गांगुली यांच्याबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केलं.

“गेल्या वर्षीच्या IPLमध्ये मी खूपच निश्चिंत होतो. मला मार्गदर्शन करण्यासाठी सौरव गांगुली आणि रिकी पॉन्टींग हे दोन दिग्गज क्रिकेटर होते. त्यांनीच माझं काम खूप सोपं केलं. यंदा टीम इंडियाकडून खेळताना माझ्या कामगिरीत सातत्य राखण्यात मी यशस्वी झालो. त्यामुळे माझा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. IPLमध्ये दिल्लीसारख्या उत्तम संघाचे नेतृत् करण्यासाठी मला त्याचा नक्कीच उपयोग होईल. माझ्या कामगिरीमुळे मला खात्री आहे की IPLमध्ये मी नक्कीच गोलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकेन”, असे टीओआयशी बोलताना श्रेयस म्हणाला.

“आयपीएलच्या आतापर्यंतच्या १२ हंगामांमध्ये एकही सामना न गमावता विजेतेपद मिळवण्याची किमया कोणत्याही संघाला साधता आलेली नाही. २००८ साली राजस्थान रॉयल्स संघाने फक्त ३ पराभव पदरी पाडत विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे आतापर्यंत कोणालाही न जमलेली कामगिरी करुन दाखवायची आहे. करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदा प्रत्येक संघातील खेळाडूंवर निर्बंध घालण्यात आले आहेत. Bio Secure Bubble सोडण्यास खेळाडूंना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व संघातील खेळाडूंना यंदा नियमांच्या चौकटीत राहून सराव करावा लागत आहे. पण तरीही आमच्या संघाने अशी कामगिरी करावी यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील असू”, असेही श्रेयस अय्यर म्हणाला.