आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपलं आव्हान कायम राखण्यासाठी विजय गरजेचा असलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्लीविरुद्ध सामन्यात १९४ धावांपर्यंत मजल मारली आहे. नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुबमन गिल, राहुल त्रिपाठी आणि दिनेश कार्तिक हे खेळाडू झटपट माघारी परतल्यानंतर नितीश राणाने सुनिल नारायणच्या साथीने शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी ११५ धावांची खेळी केली. या भागीदारीदरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपलं अर्धशतक पूर्ण केलं. नितीश राणाने आपलं अर्धशतक पूर्ण केल्यानंतर सुरिंदर नाव असलेली जर्सी हातात घेऊन आकाशाकडे डोळे करत नमस्कार केला. नितीश राणाने नेमकं असं का केलं याबद्दल अनेकांना प्रश्न पडला होता. याचं उत्तर मिळालं आहे. नितीश राणाचे सासरे सुरिंदर मारवाह यांचं काही दिवसांपूर्वी कॅन्सरच्या आजारामुळे निधन झालं. त्यामुळे आपल्या सासऱ्यांना नितीशने दिल्लीविरुद्ध सामन्यातलं अर्धशतक समर्पित करत नमस्कार केला. १६ फेब्रुवारी २०१९ रोजी नितीश राणा आणि सची मारवाह यांचा विवाहसोहळा संपन्न झाला होता.

नितीश राणाने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेताना ५३ चेंडूत १३ चौकार आणि एका षटकारासह ८१ धावा केल्या. सुनिल नारायणनेही त्याला ६४ धावांची खेळी करत उत्तम साथ दिली.