रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवत दिल्ली कॅपिटल्सवर ५७ धावांनी मात करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. इशान किशन आणि हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकांमध्ये केलेली फटकेबाजी आणि ट्रेंट बोल्ट-जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे दिल्लीची उडालेली दाणादाण हे पहिल्या सामन्याचं वैशिष्ट्य ठरलं. जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ४ षटकांत १ षटकं निर्धाव टाकत अवघ्या १४ धावा देत बुमराहने ४ बळी घेतले. या कामगिरीसाठी बुमराहला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

सामना संपल्यानंतर जसप्रीत बुमराहने आपल्या कामगिरीविषयी भाष्य केलं. “मला विकेट मिळाली नाही आणि संघाने स्पर्धा जिंकली तरीही मला तितकाच आनंद होईल. मला संघाने एक काम दिलेलं असतं आणि ते व्यवस्थित पूर्ण करण्याचं काम मी करतो. कर्णधाराला जेव्हा कधीही माझी गरज असते तेव्हा मी गोलंदाजीसाठी तयार असतो. मी कधीही निकालाची चिंता करत नाही.” बुमराहने सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना माहिती दिली.

अवश्य वाचा – IPL 2020 : रोहितला लवकर गमावूनही मुंबईच्या फलंदाजांचा ‘पॉवरप्ले’मध्ये राडा

सुरुवातीच्या षटकांपासून यॉर्कर चेंडू टाकणं अत्यंत गरजेचं असतं. सुरुवातीच्या षटकांपासून यॉर्कच चेंडूंचा मारा करण्याकडे माझा कल असतो. बोल्टसोबत माझी चांगली मैत्री झाली आहे. आम्ही अनेकदा एकमेकांमध्ये बऱ्याचदा छोट्या-मोठ्या गोष्टींवर चर्चा करत असतो. ट्रेंट बोल्टनेही जसप्रीत बुमराहला उत्तम साथ देत दोन बळी घेतले. तेराव्या हंगामात शुक्रवारी बंगळुरु आणि हैदराबाद यांच्यात एलिमिनेटर सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेता संघ दिल्लीसोबत दुसरा एलिमिनेटर सामना खेळेल, यामधील विजेता संघ अंतिम फेरीत मुंबईसोबत दोन हात करणार आहे.