IPL 2020 स्पर्धेला काहीच दिवस शिल्लक असून आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण गेला आठवडा हा चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी खूपच वेदनादायी गेला. CSKच्या एकूण ताफ्यातील १२ सहाय्यक कर्मचारी आणि २ खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे चेन्नई संघाचे २८ ऑगस्टपासून सुरू होणारे प्रशिक्षण शिबीर लांबणीवर पडले. संघाला आणखी एका आठवड्याच्या क्वारंटाइनला सामोरं जावं लागलं. पण आता CSK संघासाठी आणि चाहत्यांसाठी चांगली बातमी मिळाली आहे.
दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या दोन क्रिकेटपटूंसह आणखी १२ सहाय्यक कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सोमवारी आणि गुरूवारी कर्णधार धोनीसह संपूर्ण संघाची, सहाय्यक सदस्यांची पुन्हा नव्याने चाचणी करण्यात आली. त्यात कोणताही नवा अहवाल पॉझिटिव्ह न आल्याने आजपासून (शुक्रवार) CSKचा संघ सराव सत्राला सुरूवात करणार असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. करोनाग्रस्त दोन खेळाडू वगळता इतर सर्व खेळाडूंना सराव सत्रात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.
“CSK संघातील खेळाडूंचे सराव सत्र आजपासून सुरू होणार आहे. पहिला करोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले खेळाडू व कर्मचारी वगळता इतर सर्व जण दुसऱ्या आणि तिसऱ्या करोना चाचणीत निगेटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे सराव सत्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाग्रस्त खेळाडू आणि कर्मचाऱ्यांचा विलगीकरण कालावधी (२ आठवडे) पूर्ण झाला की मग त्यांची पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे. तोवर ते विलगीकरण कक्षातच राहणार आहेत”, असे CSKचे मुख्य कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथन यांनी पीटीआयला सांगितलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 4, 2020 11:34 am