संधीचं सोन कसं करावं याचं उत्तम उदाहरण आज इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या हंगामातील तिसऱ्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसनच्या रुपाने पाहायला मिळालं.  जोस बटलरच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन राजस्थानचा यष्टीरक्षक म्हणून संधी देण्यात आली आणि राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथचा विश्वास संजूने सार्थ ठरवला. पहिल्या डावात फलंदाजी करताना संजूने विक्रमी अर्धशतकी खेळी केली. अवघ्या ३२ चेंडूंमध्ये  ७४ धावांची खेळी करत संजूने ९ षटकार लगावले. त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना दोन जणांना यष्टीचीत करण्याबरोबरच संजूने केदार जाधवचा भन्नाट झेल घेत आपण केवळ फंलंदाजीच नाही तर चांगले क्षेत्ररणही करु शकतो हे दाखवून दिलं.

नक्की वाचा >> IPL 2020 : निव्वळ योगायोग की…?; जोफ्रा आर्चरची पाच वर्षांपूर्वीची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली

संजूने यष्ट्यांमध्ये भन्नाट क्षेत्ररक्षण करताना राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर आठव्या षटकाच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूंवर आधी सॅम करन आणि नंतर ऋतुराज गायकवाडला एकापाठोपाठ एक यष्टीचीत केलं. त्यानंतर टॉम करण गोलंदाजी करत असलेल्या १३ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर संजूने केदार जाधवला माघारी पाठवले. मोठा फटका मारण्याच्या नादात केदारने हवेत बॅट फिरवली. मात्र बॅटची कड घेऊन उडालेला चेंडू संजूने उंच उडी घेत एका हाताने पकडला. केदार जाधवलाही आपण झेल बाद झाल्याचे लगेच समजले नाही आणि तोही थोडा गोंधळल्यासारखा दिसला. केदार जाधव बाद झाल्याने चेन्नईचा अर्धा संघ तंबूत परतला आणि त्याची फाफ डु प्लेसिस सोबतची पार्टनरशीपही तुटली. चेन्नईच्या विजयाच्या आशा धुसर होत असतानाच १९ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर संजूने फाफ डु प्लेसिसचाही झेल घेतला.

यापूर्वी फलंदाजी करताना सामन्याच्या तिसऱ्या षटकामध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल माघारी परतल्यानंतर संजू मैदानात आला. जोस बटरलच्या अनुपस्थितीत संजूला संघात स्थान देण्यात आल्याने तिसऱ्या क्रमांकावर तो फलंदाजीसाठी आला. त्यानंतर पुढील आठ षटकांमध्ये संजू आणि स्टीव्ह स्मिथने तुफान फलंदाजी करत १०० धावांची पार्टनरशीप केली. संजूने अवघ्या १९ चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केलं. संजूने चेन्नईच्या फिरकी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रविंद्र जाडेजा आणि पियुष चावला यांच्या दोन षटकांमध्ये संजूने एकूण चार षटकार लगावले. आपल्या ७४ धावांच्या खेळीमध्ये संजूने ५४ धावा ९ षटकारांच्या मदतीने केल्या. ३२ चेंडूतील ७४ धावांपैकी ५८ धावा संजूने षटकार आणि चौकाराच्या माध्यमातून काढल्या.

नक्की वाचा >> IPL 2020 : चेन्नई विरुद्ध राजस्थान समान्यात चर्चा दिल्लीच्या ऋषभ पंतची; जाणून घ्या काय आहे कारण?

संजूने आपल्या या खेळामुळे चेन्नई विरुद्ध सर्वात जलद अर्धशतक झळकवणाऱ्यांच्या यादीमध्ये विक्रमाची बरोबर केली आहे. संजूने १९ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवले. याआधी चेन्नईविरुद्ध २०१९ साली मोहालीमध्ये के. एल. राहुलने १९ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवलं होतं. आज संजूने डेव्हिड वॉर्नरला या यादीमध्ये मागे टाकलं. वॉर्नरने २०१५ साली हैदराबादमध्ये खेळताना २० चेंडूत चेन्नईविरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं.