IPL 2020ला काहीच दिवस शिल्लक असून स्पर्धेला आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण गेले दोन आठवडे चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी खूपच वेदनादायी गेले. CSKच्या एकूण ताफ्यातील १२ सहाय्यक कर्मचारी आणि २ खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे चेन्नई संघाचे २८ ऑगस्टपासून सुरू होणारे प्रशिक्षण शिबीर लांबणीवर पडले होते. दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या दोन क्रिकेटपटूंनाही करोना झाला होता, पण दीपक चहरने करोनावर मात केली आणि अखेर तो CSKच्या सराव सत्रात सहभागी झाला. परंतु ऋतुराज गायकवाड मात्र अद्याप क्वारंटाइन आहे.

तब्बल १४ जण करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर साऱ्यांचे पुढील चाचणीकडे लक्ष होते. पण ३ सप्टेंबरला झालेल्या चाचणीत साऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. तरीदेखील BCCIच्या नियमानुसार, अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूला १४ दिवस सक्तीने क्वारंटाइन केलं जातं. त्यानुसार दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड दोघांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. दीपक चहर क्वारंटाइन कालावधी संपवून CSKच्या ताफ्यात सामील झाला. पण गायकवाड मात्र अद्यार १४ दिवसांच्या क्वारंटाइनमध्येच आहे.

करोनावर मात केल्यानंतर दीपक चहरने ट्विट करून आपल्या तंदुरूस्तीची माहिती दिली. “तुम्ही माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना आणि प्रेमासाठी खूप खूप आभार. मी आता तंदुरूस्त आहे. स्वत:ला अधिक तंदुरूस्त ठेवण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. लवकरच मी मैदानावर क्रिकेट खेळताना दिसेन. माझ्यावर असेच प्रेम करत राहा”, असं ट्विट त्याने केलं होतं.

दरम्यान, ५ सप्टेंबरपासून CSKच्या प्रशिक्षण शिबिरांना सुरूवात झाली. दीपक चहरही प्रशिक्षण शिबिरात दाखल झाला, आता केवळ ऋतुराज गायकवाडला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. १२ सप्टेंबरपासून तोदेखील प्रशिक्षण शिबिरात येण्यास सज्ज असेल.