27 February 2021

News Flash

IPL 2020 : RCB चे पहिले पाढे पंचावन्न, दिल्लीच्या वेगवान माऱ्यासमोर शरणागती

बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहलीची एकाकी झुंज

फोटो सौजन्य - Saikat Das / Sportzpics for BCCI

राजस्थान रॉयल्सवर मात करुन स्पर्धेत दिमाखदार पुनरागमन करणाऱ्या RCB संघाची अवस्था, पुन्हा एकदा पहिले पाढे पंचावन्न झाली आहे. दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने RCB वर ५९ धावांनी मात केली. दिल्लीने विजयासाठी दिलेल्या १९७ धावांचं आव्हान बंगळुरुला पेलवलं नाही. कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता RCB च्या इतर सर्व फलंदाजांनी दिल्लीच्या माऱ्यासमोर शरणागती पत्करली. बंगळुरुचा संघ १३७ धावांपर्यंतच मजल मारु शकला.

बंगळुरुच्या संघाची सुरुवातच खराब झाली. देवदत पडीकल, फिंच आणि डिव्हीलियर्स हे तीन बिनीचे शिलेदार झटपट माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहलीने मोईन अलीच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही फलंदाजांमध्ये एक महत्वाची भागीदारीही झाली. परंतू अक्षर पटेलने मोईन अलीला बाद करत ही जोडी फोडली. एकीकडे इतर सर्व फलंदाज बाद होत असताना विराट कोहलीने एक बाजू लावून धरत झुंज सुरु ठेवली होती. परंतू कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर तो ही माघारी परतला विराट कोहलीने ४३ धावांची खेळी केली. यानंतर मैदानावर आलेला एकही फलंदाज दिल्लीच्या माऱ्याचा सामना करु शकला नाही. दिल्लीकडून कगिसो रबाडाने ४, अक्षर पटेल आणि नॉर्ट्जेने प्रत्येकी २ तर आश्विनने १ बळी घेतला.

त्याआधी, सलामीला पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची फटकेबाजी आणि मधल्या फळीत स्टॉयनिस-पंतने संयमी फलंदाजी करत सावरलेला डाव या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने RCB विरुद्ध सामन्यात १९६ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकत विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतू वॉशिंग्टन सुंदरचा अपवाद वगळात RCB चे गोलंदाज सामन्यात सातत्य दाखवू शकले नाही. दिल्लीकडून पृथ्वी शॉने ४२, शिखर धवने ३२ धावा केल्या. तर मधल्या फळीत स्टॉयनिस आणि पंत जोडीने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचं पारडं जड राखण्यास मदत केली.

नाणेफेक जिंकून RCB चा कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन जोडीने फटकेबाजी करत दिल्लीला चांगली सुरुवात करुन दिली. विशेषकरुन पृथ्वी शॉने बंगळुरुच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये बंगळुरुकडून वॉशिंग्टन सुंदरचा अपवाद वगळता सर्व गोलंदाज अपयशी ठरले. वॉशिंग्टनने ४ षटकांत फक्त २० धावा दिल्या. धवन आणि शॉ जोडी मैदानावर स्थिरावून मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत असतानाच मोहम्मद सिराजने पृथ्वी शॉला माघारी धाडत RCB ला पहिलं यश मिळवून दिलं. पृथ्वीने ४२ धावा केल्या.

यानंतर ठराविक अंतराने शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनाही माघारी धाडण्यात RCB चे गोलंदाज यशस्वी झाले. उदानाने धवनला तर मोईन अलीने कर्णधार अय्यरला माघारी धाडलं. मोक्याच्या क्षणी दिल्लीचे दोन फलंदाज माघारी परतल्यामुळे काही क्षणांसाठी दिल्लीचा संघ बॅकफूटवर गेला. परंतू अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतने अखेरच्या षटकांमध्ये महत्वपूर्ण भागीदारी करत दिल्लीला पुन्हा सामन्यात कमबॅक करण्यात मदत केली. विशेषकरुन स्टॉयनिसने आक्रमक पवित्रा घेत चौकार-षटकारांतून धावा जमवण्याकडे भर दिला.

त्यातच RCB च्या गोलंदाजांचा स्वैर मारा आणि क्षेत्ररक्षकांची खराब कामगिरी यामुळे दिल्लीच्या फलंदाजांना अखेरच्या षटकांत मदतच झाली. ऋषभ पंत अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात ३७ धावांवर त्रिफळाचीत झाला. परंतू स्टॉयनिसने हेटमायरच्या साथीने आपली फटकेबाजी सुरु ठेवत आपलं अर्धशतक झळकावलं. स्टॉयनिसने नाबाद ५३ धावा केल्या. बंगळुरुकडून मोहम्मद सिराजने २ तर इसुरु उदाना आणि मोईन अली यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 9:19 pm

Web Title: ipl 2020 delhi capitals beat rcb by 59 runs leads the point table psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : वॉशिंग्टनची ‘सुंदर’ गोलंदाजी, सचिननेही केलं कौतुक
2 IPL 2020 : तुमच्यासाठी हीच जागा योग्य ! माजी खेळाडूने सुनावले पंजाबला खडे बोल
3 IPL 2020 Video: धोनी गुरूजींनी घेतली राहुलची शिकवणी
Just Now!
X