हैदराबादविरूद्धच्या सामन्यात कोलकाताच्या संघाने सुपर ओव्हरच्या माध्यमातून विजय मिळवला. कोलकाताने २० षटकांत १६३ धावांचा पल्ला गाठला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये IPL 2020चा पहिलाच सामना खेळणाऱ्या लॉकी फर्ग्युसनने केवळ २ धावा देत २ बळी घेऊन हैदराबादचा डाव संपवला. तर इयॉन मॉर्गन-दिनेश कार्तिक जोडीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. फर्ग्युसनने मूळ सामन्यातही १५ धावांत ३ बळी टिपले.
That’s that from Match 35.@KKRiders win in the Super Over against #SRH.#Dream11IPL pic.twitter.com/KooTSzHDyH
— IndianPremierLeague (@IPL) October 18, 2020
१६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर केन विल्यमसन आणि बेअरस्टो यांनी अर्धशतकी भागीदारी केली. विल्यमसन २९ धावांवर बाद झाला. क्रमवारीत वर आलेला प्रियम गर्गदेखील ४ धावावर माघारी गेला. जॉनी बेअरस्टोने चांगली सुरूवात केली होती. पण तो ३६ धावा काढून बाद झाला. मधल्या फळीतील मनिष पांडे (६) आणि विजय शंकरने (७) संघाची निराशा केली. नवख्या अब्दुल समदने १५ चेंडूत २३ धावा करत हैदराबादसाठी विजयाच्या आशा जागवल्या. त्यानंतर शेवटच्या षटकात कर्णधार डेव्हिड वॉर्नरने तीन चौकार ठोकले पण सामना बरोबरीत सुटला. वॉर्नरने ५ चौकारांसह नाबाद ४७ धावा केल्या. IPL 2020चा पहिलाच सामना खेळणाऱ्या फर्ग्युसनने १५ धावांत ३ बळी टिपले.
नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाताच्या संघाकडून राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल या दोघांनी तडाखेबाज सुरूवात केली. त्रिपाठी २३ धावांवर बाद झाल्यावर शुबमन गिल आणि नितीश राणाने फटकेबाजी केली. गिल ५ चौकारांसह ३६ धावांवर तर नितीश राणा ३ चौकार व एका षटकारासह २९ धावांवर माघारी परतला. धोकादायक आंद्रे रसल ९ धावात बाद झाला. त्यानंतर संघाचे आजी-माजी कर्णधार इयॉन मॉर्गन (३४) आणि दिनेश कार्तिक (नाबाद २९) यांनी ३० चेंडूत या दोघांनी ५८ धावांची भागीदारी केली.