गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. अबु धाबीच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सने विजयासाठी दिलेल्या १४९ धावांचं लक्ष्य मुंबई इंडियन्सने २ गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी सलामीच्या जोडीसाठी ९४ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली. परंतू यष्टीरक्षक डी-कॉक हा मुंबईच्या विजयाचा खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरला.

अवश्य वाचा – IPL 2020 : तुझी-माझी जोडी जमली रे ! हिटमॅन-डी कॉकच्या भागीदारीमुळे KKR बेजार

डी-कॉकने KKR च्या गोलंदाजांचा समाचार घेत अबु धाबीच्या मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. ४४ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने डी-कॉकने नाबाद ७८ धावांची खेळी केली. २०१९ पासून क्विंटन डी-कॉकचं मुंबई इंडियन्सकडून खेळतानाचं हे सातवं अर्धशतक ठरलं आहे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने २०१९ पासून ४-४ अर्धशतकं झळकावली आहेत.

रोहित शर्मा शिवम मवीच्या गोलंदाजीवर ३५ धावा काढून माघारी परतला. यानंतर सूर्यकुमार यादवही वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर स्विपचा फटका खेळताना त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. त्यामुळे KKR चा संघ अखेरच्या षटकांमध्ये पुनरागमन करतो की काय असं वाटत होतं. मात्र डी-कॉकने हार्दिक पांड्याच्या साथीने संघाचा डाव सावरत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.