आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपला पहिला सामना खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सचे पहिल्याच सामन्यात दणकेबाज खेळी करत चेन्नई सुपरकिंग्जला चांगलाच घाम फोडला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय पुरता फसला. युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनने स्टिव्ह स्मिथच्या साथीने शतकी भागीदारी करत चेन्नईच्या गोलंदाजांची पिसं काढली. संजू सॅमसनने ३२ चेंडूत १ चौकार आणि ९ षटकारांच्या सहाय्याने ७४ धावा केल्या.

या अर्धशतकी खेळीदरम्यान संजू सॅमसनने एबी डिव्हीलियर्स, आंद्रे रसेल, गिलख्रिस्ट, ब्रँडन मॅक्युलम यासारख्या दिग्गज फलंदाजांच्या पंगतीत स्थान मिळवलं. एका डावात ९ किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारण्याची संजू सॅमसनची ही दुसरी वेळ ठरली. आयपीएलमध्ये आतापर्यंत ख्रिस गेलने सर्वाधिक वेळा म्हणजेच ६ वेळा अशी कामगिरी केली आहे.

राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथनेही संजूला चांगली साथ दिली. अखेरपर्यंत मैदानात तळ ठोकून स्मिथने ४७ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ६९ धावा केल्या. अखेरच्या फळीत जोफ्रा आर्चरनेही ८ चेंडूत ४ षटकार खेचत नाबाद २७ धावांची खेळी करत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून देण्यात मदत केली.