दुबईत खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला १७५ धावांवर रोखण्याच चेन्नईचे गोलंदाज यशस्वी झाले. नाणेफेक जिंकत कर्णधार महेंद्रसिंह धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ जोडीने पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी करत दिल्लीला चांगली सुरुवात करुन दिली. ही जोडी दिल्लीला मोठी धावसंख्या उभारुन देणार असं वाटत असतानाच पियुष चावलाने आपल्या फिरकीच्या जाळ्यात दिल्लीच्या ‘गब्बर’ला अडकवलं.

यापाठोपाठ अर्धशतकवीर पृथ्वी शॉ देखील चावलाच्या गोलंदाजीवर यष्टीचीत होऊन माघारी परतला. या दोन बळींच्या जोरावर पियुष चावलाने दिग्गज गोलंदाजांच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. आयपीएलमध्ये दिल्लीविरुद्द सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चावला आता संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी आहे. चावलाच्या नावावर २२ बळी जमा आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्याच संघातील अनुभवी खेळाडू हरभजन सिंहचा विक्रम मोडण्यासाठी चावलाला ३ बळींची आवश्यकता आहे. धवन आणि शॉ माघारी परतल्यानंतर दिल्लीच्या धावगतीला चेन्नईच्या गोलंदाजांनी अंकुश लावला. एका क्षणाला मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत असताना दिल्लीचा संघ फक्त १७५ धावांपर्यंत मजल मारु शकला.