अबु धाबीच्या मैदानावर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने KKR वर ८ गडी राखून मात करत धडाकेबाज विजयाची नोंद केली आहे. विजयासाठी अवश्यक असलेल्या ८५ धावांचं आव्हान RCB च्या संघाने सहज पूर्ण केलं. पहिल्यांदा फलंदाजी करताना KKR चा डाव RCB च्या माऱ्यासमोर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भेदक मारा करत KKR ची दाणादाण उडवली. RCB ने विजायासाठीचं आव्हान १४ व्या षटकात पूर्ण केलं.

अवश्य वाचा – BLOG : दुखापती आणि चुकीचे निर्णय KKR ला महागात पडणार का??

KKR चा कर्णधार मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतू RCB च्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत कोलकात्याची आघाडीची फळी कापून काढली. विशेषकरुन मोहम्मह सिराजने प्रभावी मारा करत एकाच षटकात राहुल त्रिपाठी आणि नितीश राणा यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केलं. यातही सिराजने नितीश राणाचा उडवलेला त्रिफळा हा निव्वळ पाहण्यासारखा होता. तुम्ही पाहिलात का तो व्हिडीओ??…

८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना RCB च्या फलंदाजांनी आश्वासक सुरुवात केली. फिंच आणि देवदत पडीकल यांनी पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागादारी केली. फलंदाजीत निराशाजनक कामगिरी केलेल्या KKR च्या संघाने गोलंदाजीतही फारशी चमक दाखवली नाही. मागच्या सामन्यात गोलंदाजीत चमक दाखवलेल्या लॉकी फर्ग्युसनला पॉवरप्ले नंतर गोलंदाजीची संधी दिली. फर्ग्युसनने संधी मिळताच फिंचला माघारी धाडत RCB ला पहिला धक्का दिला. देवदत पडीकलही चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर विराट कोहली आणि गुरकिरत मान यांनी अधिक जोखीम न घेता पडझड होणार नाही याची काळजी घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

अवश्य वाचा – IPL 2020 : RCB विरुद्ध मानहानीकारक पराभवानंतर फलंदाजांवर भडकला ब्रँडन मॅक्युलम