IPL 2020 मध्ये कोलकाता आणि दिल्ली यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निर्णय घेतला. दिल्लीचा संघ या हंगामात तुफान फॉर्मात आहे. सध्या घडीला दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि या संघाचं प्ले-ऑफ्सचं तिकीट जवळपास नक्की आहे. या संघाला हंगामाच्या सुरूवातीपासून खेळाडूंच्या दुखापतींना सामोरं जावं लागलं. रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, अमित मिश्रा आणि ऋषभ पंत या खेळाडूंना दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावे लागले. त्यापैकी अश्विन आणि पंत तंदुरूस्त होऊन पुन्हा संघात परतले.

ऋषभ पंत संघात नसताना दिल्लीकडे भारतीय यष्टीरक्षक नसल्याने त्यांना अलेक्स कॅरीला संघात स्थान द्यावं लागलं. तसंच परदेशी शिमरॉन हेटमायरला काढून अजिंक्य रहाणेला संघात समाविष्ट करण्यात आलं. पण पंत संघात परतल्यामुळे त्याच्यासोबत हेटमायरही संघात आला आणि कॅरी, रहाणे संघाबाहेर गेले. पण कोलकाता विरूद्धच्या सामन्यात मात्र एका मुंबईकराने दुसऱ्या मुंबईकराची जागा घेतली. स्पर्धेच्या सुरूवातीला चांगली कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉ ला संघाबाहेर ठेवण्यात आलं आणि त्याच्या जागी सलामीवीर म्हणून अजिंक्य रहाणेला संघात स्थान मिळालं.

याचसोबत दिल्लीच्या संघाने दुखापतीतून सावरलेल्या नॉर्येला संघात स्थान दिलं आणि सॅम्सला संघाबाहेर केलं. तसेच कोलकाताच्या संघातही बदल करण्यात आले. गोलंदाजीच्या शैलीवरून प्रश्न उपस्थित झालेला सुनील नरिन संघात परतला. त्याने टॉम बॅन्टनटी जागा घेतली. तर कुलदीप यादवच्या जागी कमलेश नागरकोटीचं संघात पुनरामगन झालं.