राजस्थान रॉयल्सने शारजाच्या मैदानात षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करत आयपीएलच्या इतिहासातली सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. पंजाबने विजयासाठी दिलेलं २२४ धावांचं आव्हान राजस्थानने ४ गडी राखून पूर्ण केलं. अष्टपैलू राहुल तेवतिया राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. शेल्डन कोट्रेलने टाकलेल्या १८ व्या षटकात तेवतियाने ५ षटकार खेचत सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटलं. एका क्षणाला पंजाब सामन्यात बाजी मारेल असं वाटत असतानाच तेवतियाने फटकेबाजी करत सामना राजस्थानच्या बाजूने झुकवला.

पंजाबच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत तेवतियाने ३१ चेंडूत ७ षटकारांनिशी ५३ धावा केल्या. आयपीएलच्या एका डावात एकही चौकार न लगावता सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तेवतियाने नितीश राणा आणि संजू सॅमसनशी बरोबरी केली आहे. यादरम्यान त्याने मिलर, रसेल, धोनी या दिग्गज फलंदाजांनाही मागे टाकलं.

तेवतियाने केलेल्या फटकेबाजी राजस्थानसाठी महत्वाची ठरली. अशक्यप्राय आव्हान समोर असताना, खेळपट्टीवर स्थिरवलेले फलंदाज माघारी परतले असतानाही तेवतियाने संयम राखत ५ षटकार खेचले आणि सामन्याचं चित्र पालटलं. भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीकडून आयपीएलच्या तेराव्या हंगामात चाहते अशाच प्रकारच्या खेळीची अपेक्षा करत होते. परंतू धोनी गेल्या दोन्ही सामन्यात उशीरा फलंदाजीला आल्यामुळे त्याने आपल्या चाहत्यांनी नाराजी ओढवून घेतली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमी धोनीला जे जमलं नाही ते तेवतियाने राजस्थानकडून करुन दाखवलं असं म्हणतं त्याची स्तुती करत आहेत.