आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात अनेक फिरकीपटूंनी आपली चमक दाखवली आहे. १९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामालाही सुरुवात होते आहे. यंदाची स्पर्धा युएईत खेळवली जात असल्यामुळे प्रत्येक संघातील फिरकीपटूंवर महत्वाची जबाबदारी असणार आहे. रविचंद्रन आश्विन, अमित मिश्रा, पियुष चावला, राशिद खान, इम्रान ताहीर, हरभजन सिंह यासारखी अनेक नावं गेल्या काही हंगामापासून आयपीएल खेळत आहेत. मात्र या सर्वांमध्ये सर्वोत्तम फिरकीपटू कोण?? भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्राने याचं उत्तर दिलं आहे.

“या प्रश्नाचं उत्तर देणं खरंच खूप कठीण आहे. हरभजन असो, अमित मिश्रा असो किंवा राशिद खान प्रत्येक खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे. आश्विन हा देखील अनेक हंगाम खेळत आहे, त्यामुळे त्याची कामगिरीही चांगली होत आहे. हरभजन-अमित मिश्रा यासारखे गोलंदाजही आपल्या अनुभवाच्या जोरावर सामना फिरवतात. त्यामुळे ३ खेळाडूंची निवड करायची झाली तर हरभजन, आश्विन आणि अमित मिश्रा हे माझे पर्याय असतील. परंतू गेल्या काही हंगामांचा विचार करायला गेलं तर राशिद खान हा सर्वोत्तम कामगिरी करतोय आणि तो सर्वांना मागे टाकून पुढे गेला आहे.” आकाश चोप्रा आपल्या फेसबूक पेजवर चाहत्यांनी दिलेल्या प्रश्नांना उत्तर देत होता.

जगभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, यंदाची आयपीएल स्पर्धा होणार की नाही यावरुन काही महिन्यांपूर्वी बरीच चर्चा रंगली. परंतू स्पर्धा रद्द झाल्यास ४ हजार कोटींचं नुकसान टाळ्यासाठी बीसीसीआयने यंदाची स्पर्धा युएईत खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : गोलंदाजांच्या यॉर्कर चॅलेंजमध्ये विराट कोहलीचं फूल टू धतिंग