कर्णधार रोहित शर्मासह किरॉन पोलार्डला ‘आयपीएल’च्या सुरुवातीच्या टप्प्यात गवसलेला सूर संघासाठी मोलाचा आहे, असे मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक झहीर खानने सांगितले.

‘‘पोलार्ड कॅरेबियन प्रीमियर लीगपासूनच सर्वोत्तम कामगिरी करत आहे. पोलार्डची कामगिरी अशीच सुरू राहिली तर आमच्या संघासाठी ते फायद्याचेच आहे. पोलार्ड स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात चांगला खेळतो तेव्हा ते आमच्यासाठी चांगले लक्षण असते,’’ असे झहीरने सांगितले.

‘आयपीएल’मध्ये पाच हजार धावांचा टप्पा पार केलेल्या रोहितचेही झहीरने कौतुक केले. ‘‘रोहितने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीत इशान किशनसह केलेली ६२ धावांची भागीदारी विजयात मोलाची ठरली. रोहितला गवसलेला सूर महत्त्वाचा आहे. फलंदाजांप्रमाणे गोलंदाजही उपयुक्त योगदान देत असल्याने सांघिक कामगिरी उंचावलेली आहे,’’ असे झहीरने सांगितले.