IPLच्या गेल्या १२ हंगामात अतिशय समतोल असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला यंदाच्या हंगामात धक्कादायकरित्या सलग दोन पराभवांना सामोरं जावं लागलं. सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईलवर शेवटच्या षटकात विजय मिळवला. पण त्यानंतर राजस्थान आणि दिल्ली या तुलनेने दुबळ्या संघांनी चेन्नई पराभवाची धूळ चाखण्यास भाग पाडले. दोन्ही संघांनी प्रथम फलंदाजी करत चेन्नईला विजयासाठी मोठं आव्हान दिलं. राजस्थानविरूद्ध धोनीने शेवटच्या फटकेबाजी केली पण दिल्लीविरूद्धच्या सामन्यात त्याला ते शक्य झालं नाही. चेन्नईच्या सलग दोन लाजिरवाण्या पराभवांनंतर ट्विटरवर #ComeBackMrIPL हा हॅशटॅग ट्रेंड झाला.

राजस्थान आणि दिल्ली या दोन्ही सामन्यात चेन्नईला काही खेळाडूंची कमी जाणवली. स्पर्धेतून माघार घेतलेले सुरेश रैना, हरभजन सिंग आणि संघाबाहेर असलेला ड्वेन ब्राव्हो या तीन खेळाडूंची उणीव चेन्नईला प्रकर्षान जाणवली. प्रथम गोलंदाजी करताना मधल्या षटकांमध्ये चेन्नईच्या गोलंदाजांना बळी मिळवता आले नाहीत. तर शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजीला लगाम लावता आला नाही. तसेच मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना अपेक्षित फटकेबाजी करणं चेन्नईच्या फलंदाजांना जमलं नाही. त्यामुळे चेन्नईला सलग दोन पराभवांना सामोरं जावं लागलं. या प्रकारानंतर #ComeBackMrIPL हा हॅशटॅग ट्रेंड झाला. काहींनी सुरेश रैनाला तर काहींनी ड्वेन ब्राव्होला संघात परत येण्याची विनंती केली.

असा रंगला सामना…

चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम दिल्लीला फलंदाजी आमंत्रण दिलं. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दिल्लीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची दमदार सलामी दिली. शिखरने ३५ तर पृथ्वी शॉने ६४ धावांची खेळी केली. त्यानंतर ऋषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी भागीदारी केली. अय्यर माघारी परतल्यानंतर स्टॉयनीस-पंत जोडीने दिल्लीला १७५ धावांपर्यंत मजल मारुन दिली.

या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा डाव गडगडला. वॉटसन माघारी परतल्यावर पाठोपाठ मुरली विजय, ऋतुराज गायकवाडही बाद झाले. केदार जाधव आणि फाफ डु-प्लेसिस यांनी भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. हे दोघे बाद झाल्यावर धोनी आणि जाडेजा यांच्याही फटकेबाजीचा प्रयत्न फसला आणि चेन्नईला ४४ धावांनी पराभूत व्हावे लागले.