दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने दोन सुपरओव्हर्स नाट्य पूर्ण करत अखेरीस मुंबई इंडियन्सवर मात केली आहे. निर्धारित वेळेतला सामना बरोबरीत सुटल्यानंतर, पहिली सुपरओव्हर खेळवण्यात आली. ज्यात मुंबईकडून जसप्रीत बुमराहने गोलंदाजी करताना आपल्या लौकिकाला साजेसा मारा करत अवघ्या ५ धावा दिल्या. परंतू रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक या जोडीला हे आव्हान पूर्ण करता आलं नाही. मोहम्मद शमीने टिच्चून मारा करत मुंबईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही आणि पहिली सुपरओव्हरही अनिर्णित राहिली.

अवश्य वाचा – IPL 2020 : नाम तो सुना होगा ! पंजाबच्या ‘सुपर’ विजयात लोकेश राहुल चमकला

यानंतर दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये मुंबईकडून कायरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या हे फलंदाज मैदानावर उतरले. यादरम्यान पोलार्डने फटकेबाजी करत मुंबई पंजाबसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी करेल याची काळजी घेतली. परंतू पंजाबच्या क्षेत्ररक्षकांनी उत्तम खेळ करत पोलार्डचा हा प्रयत्न हाणून पाडला. ख्रिस जॉर्डन टाकत असलेल्या सुपरओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर पोलार्डने मोठा फटका मारला. चेंडू सीमारेषेबाहेर जाणार असं वाटत असतानाच मयांक अग्रवालने उडी मारून चेंडू हवेतूनच आत ढकलला आणि संघासाठी महत्वाच्या धावा वाचवल्या. पाहा मयांकची ही भन्नाट फिल्डींग…

मयांकच्या याच चपळाईमुळे मुंबईचा संघ दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये ११ धावांपर्यंत मजल मारु शकला आणि पंजाबला विजयासाठी १२ धावांचं आव्हान मिळालं. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने दुसरी सुपरओव्हर टाकली. परंतू ख्रिस गेल आणि मयांक अग्रवाल जोडीने फटकेबाजी करुन १२ धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं आणि पंजाबने अखेरीस सामन्यात विजय मिळवला.