News Flash

आयपीएलची लस!

अखेर शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता तमाम क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा संपणार आहे.

भारतातील सहा शहरांमध्ये ९ एप्रिल ते ३० मेदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही आठ संघ सहभागी होणार आहेत.

ऋषीकेश बामणे – response.lokprabha@expressindia.com

अखेर शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता तमाम क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा संपणार आहे. करोनाने जगभरात घातलेल्या धुमाकुळाने आर्थिक, मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा खचलेल्या क्रीडारसिकांना आयपीएलची लस दिलासा देण्याचे कार्य करणार असे चित्र आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु यांच्यातील लढतीने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या हंगामाला शुक्रवारपासून प्रारंभ होणार असून मनोरंजनाच्या या पर्वणीकडे चाहत्यांचे खास लक्ष लागले आहे.

भारतातील सहा शहरांमध्ये ९ एप्रिल ते ३० मेदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही आठ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेपूर्वीच काही खेळाडू तसेच कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्यामुळे आयोजनावर अनेकांनी प्रश्नचिन्हही उपस्थित केले. परंतु ‘आयपीएल’ नियोजनानुसारच खेळवण्यात येईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले. त्या पाश्र्वभूमीवरच आठही संघांची बलस्थाने आणि कमकुवत बाजूंचा आढावा.

मुंबई इंडियन्स

कर्णधार : रोहित शर्मा

सर्वोत्तम कामगिरी : विजेतेपद (२०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२०)

मुख्य आकर्षण : अर्जुन तेंडुलकर

जेतेपदाच्या हॅट्ट्रिकची सुवर्णसंधी

‘आयपीएल’मधील सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सची ख्याती आहे. सलग दोन वर्षे जेतेपदाचा चषक उंचावणाऱ्या मुंबईला यंदा जेतेपदाची हॅट्ट्रिक साकारण्याची सुवर्णसंधी आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून कुशल खेळाडूंचा शोध घेऊन त्यांच्या कारकीर्दीला योग्य दिशा दाखवण्याचे कार्य करणाऱ्या मुंबईने जसप्रीत बुमरा, हार्दिक-कृणाल पंडय़ा, इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि राहुल चहर यांच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे या वेळी कोणत्या बिगरआंतरराष्ट्रीय खेळाडूला मुंबई पैलू पाडणार, हे पाहणे रंजक ठरेल. डावखुरा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर या हंगामात मुंबईकडून पदार्पण करण्याची दाट शक्यता आहे. त्याशिवाय किरॉन पोलार्ड, ट्रेंट बोल्ट, अ‍ॅडम मिल्ने, ख्रिस लीन असे अनुभवी विदेशी खेळाडू ताफ्यात असल्याने मुंबईचा अश्वमेध रोखण्यासाठी अन्य संघांना कठोर परिश्रम करावे लागतील. परंतु मुंबईचे बहुतांश सामने चेन्नई आणि दिल्ली येथील फिरकीपटूंना पोषक खेळपट्टीवर होणार असल्याने या विभागात मुंबई किंचित कमी पडू शकते.

चेन्नई सुपर किंग्ज

कर्णधार : महेंद्रसिंह धोनी

सर्वोत्तम कामगिरी : विजेतेपद (२०१०, २०११, २०१८)

मुख्य आकर्षण : चेतेश्वर पुजारा

लौकिकानुसार कामगिरीचे ध्येय

‘आयपीएल’ ही अशी स्पर्धा आहे, जेथे अन्य सात संघ अंतिम फेरीत महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळण्यासाठी आपापसांत झुंजतात. परंतु १३ हंगामांत सर्वाधिक आठ वेळा अंतिम लढत खेळणाऱ्या चेन्नईला गतवर्षी प्रथमच बाद फेरीही गाठता आली नाही. त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा आपल्या लौकिकाप्रमाणे खेळण्याचे ध्येय चेन्नईसमोर असेल. तिशीपल्याडच्या खेळाडूंवर अधिक भरवसा दर्शवणाऱ्या चेन्नईने यंदा कसोटी विशेषज्ञ चेतेश्वर पुजाराला संघात स्थान दिल्याने त्याच्या कामगिरीवर चाहत्यांचे खास लक्ष असेल. महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडकडून चेन्नईला फार अपेक्षा आहेत. सुरेश रैनाच्या पुनरागमनाने चेन्नईची फलंदाजी अधिक बळकट झाली असून रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, मोईन  अली, सॅम करन आणि कृष्णप्पा गौतम अशा प्रतिभावान अष्टपैलूंचा त्यांच्याकडे भरणा आहे. त्यामुळे आता धोनी पुन्हा एकदा आपल्या कल्पक नेतृत्वाच्या बळावर संघाला जेतेपदाची दिशा दाखवणार का, हे पाहणे औस्युक्याचे ठरणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स

कर्णधार : ऋषभ पंत

सर्वोत्तम कामगिरी :

उपविजेतेपद (२०२०)

मुख्य आकर्षण : पृथ्वी शॉ

यंदा जेतेपदाची कमाई?

प्रामुख्याने युवा खेळाडूंसह संघबांधणी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला २०१९मध्ये ‘क्वालिफायर-२’मध्ये पराभव पत्करावा लागला. तर गतवर्षी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यातच कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे यंदाच्या संपूर्ण हंगामाला मुकणार असल्याने स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच दिल्लीच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र कारकीर्दीतील सर्वोच्च शिखरावर असलेल्या ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली हा संघ या वेळी जेतेपदाचा वेध घेऊ शकतो. दिल्लीचे सुरुवातीचे सामने मुंबईत होणार असल्याने विजय हजारे करंडक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या मुंबईकर पृथ्वी शॉकडून त्यांना फार अपेक्षा आहेत. त्याशिवाय शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, अजिंक्य रहाणे यांच्या अनुभवाचाही दिल्लीला लाभ होईल. कॅगिसो रबाडा आणि आनरिख नॉर्किए ही दक्षिण आफ्रिकन वेगवान गोलंदाजांची जोडी दिल्लीची ताकद असून त्यांना रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल या फॉर्मात असलेल्या भारतीय फिरकीपटूंची साथ लाभेल.

‘आयपीएल’चे आतापर्यंतचे विजेते

वर्ष संघ

२००८ राजस्थान रॉयल्स

२००९ डेक्कन चार्जर्स

२०१० चेन्नई सुपर किंग्ज

२०११ चेन्नई सुपर किंग्ज

२०१२ कोलकाता नाइट रायडर्स

२०१३ मुंबई इंडियन्स

२०१४ कोलकाता नाइट रायडर्स

२०१५ मुंबई इंडियन्स

२०१६ सनरायजर्स हैदराबाद

२०१७ मुंबई इंडियन्स

२०१८ चेन्नई सुपर किंग्ज

२०१९ मुंबई इंडियन्स

२०२० मुंबई इंडियन्स

कोलकाता नाइट रायडर्स

कर्णधार : ईऑन मॉर्गन

सर्वोत्तम कामगिरी : विजेतेपद (२०१२, २०१४)

मुख्य आकर्षण : प्रसिध कृष्णा

सांघिक कामगिरीवर भिस्त!

ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सला गतवर्षी बाद फेरीने थोडक्यात हुलकावणी दिली. तमिळनाडूला मुश्ताक अली स्पर्धेत जेतेपद मिळवून देणाऱ्या दिनेश कार्तिकचा अनुभव कोलकातासाठी लाभदायक ठरेल. भारताकडून काही आठवडय़ांपूर्वीच पदार्पण केलेल्या प्रसिध कृष्णावर कोलकाताच्या गोलंदाजीची मदार आहे. त्याला पॅट कमिन्स आणि लॉकी फग्र्युसन यांची साथ लाभेल. परंतु गेल्या हंगामात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या अष्टपैलू आंद्रे रसेलकडून कोलकाताला या वेळी चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. दोन वर्षांनंतर ‘आयपीएल’मध्ये परतणारा अष्टपैलू शाकिब अल हसन आणि अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग फिरकीपटूंना पोषक खेळपट्टीवर कोलकातासाठी मोलाची भूमिका बजावू शकतात.

पंजाब किंग्ज

कर्णधार : के. एल. राहुल

सर्वोत्तम कामगिरी : उपविजेतेपद (२०१४)

मुख्य आकर्षण : शाहरुख खान

यंदा नशीब पालटणार?

आठ संघांपैकी अनिल कुंबळेच्या रूपात एकमेव भारतीय मुख्य प्रशिक्षक असणारा संघ म्हणजे पंजाब किंग्ज. संघाच्या नावात आणि जर्सीत बदल केलेल्या पंजाबचे यंदा भाग्यही पालटणार का, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. कर्णधार राहुलसह, ख्रिस गेल, निकोलस पूरन असे धडाकेबाज फलंदाज पंजाबकडे असून ट्वेन्टी-२० प्रकारातील सर्वोत्तम फलंदाज मानल्या जाणाऱ्या डेव्हिड मलानच्या समावेशामुळे त्यांची फलंदाजी अधिक बळकट झाली आहे. विजय हजारे आणि मुश्ताक अली स्पर्धेत तुफान फटकेबाजी करणारा तमिळनाडूचा शाहरुख खान आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकतो. गोलंदाजीत मोहम्मद शमीवर अतिरिक्त दडपण येऊ नये यासाठी रवी बिश्नोई, झाय रिचर्डसन यांना कामगिरी उंचवावी लागणार आहे. अन्यथा गतवर्षीप्रमाणे या वेळीही तळाच्या चार संघांमध्येच पंजाबचे नाव दिसून येईल.

राजस्थान रॉयल्स

कर्णधार : संजू सॅमसन

सर्वोत्तम कामगिरी : विजेतेपद (२००८)

मुख्य आकर्षण : ख्रिस मॉरिस

एका तपानंतर विजयी हल्लाबोल?

कोणाच्याही खिजगणतीत नसलेल्या राजस्थान रॉयल्सने २००८ मध्ये ‘आयपीएल’च्या पहिल्या हंगामाचे जेतेपद मिळवले. परंतु त्यानंतर गेली १२ वर्षे या संघाची गाडी रुळावरून घसरलेलीच पाहायला मिळते. त्यामुळे यंदा प्रथमच नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारणारा संजू सॅमसन काय कमाल करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसकडून राजस्थानला अष्टपैलू योगदानाची अपेक्षा आहे. जायबंदी जोफ्रा आर्चर सुरुवातीच्या काही लढतींना मुकणार असल्याने राजस्थानपुढील आव्हानांत वाढ झाली आहे. बेन स्टोक्स, जोस बटलर या इंग्लिश जोडीवर राजस्थानची प्रामुख्याने भिस्त असून राहुल तेवतिया, यशस्वी जैस्वाल, रियान पराग अशा बिगरआंतरराष्ट्रीय खेळाडूंमुळे त्यांना या वेळी बाद फेरी गाठण्याची आशा आहे. मात्र त्यासाठी संघातील खेळाडूंनी लौकिकाला साजेशी कामगिरी करणे गरजेचे आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु

कर्णधार : विराट कोहली

सर्वोत्तम कामगिरी : उपविजेतेपद (२००९, २०११, २०१६)

मुख्य आकर्षण : देवदत्त पडिक्कल

गोलंदाज भवितव्य ठरवणार

विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स अशा मातब्बर फलंदाजांचा संघात समावेश असूनही मोक्याच्या क्षणी कच खाल्ल्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला अद्याप एकदाही ‘आयपीएल’ स्पर्धा जिंकता आलेली नाही. मात्र या वेळी गोलंदाजांची फळीही सक्षम असल्याने बेंगळूरुला पहिल्यावहिल्या जेतेपदाचा वेध घेण्याची संधी आहे. स्थानिक स्पर्धेत सातत्याने धावा करणारा देवदत्त पडिक्कल बेंगळूरुसाठी हुकमी अस्त्र असेल. त्याशिवाय केरळचा मोहम्मद अझरुद्दीनसुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे. गतवर्षी एकही षटकार लगावू न शकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलकडून बेंगळूरुला मधल्या फळीत चौकार-षटकारांच्या आतषबाजीची अपेक्षा आहे. मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेद्र चहल यांच्यासह न्यूझीलंडचा कायले जेमिसन या गोलंदाजांची कामगिरी बेंगळूरुचे स्पर्धेतील भवितव्य ठरवेल.

सनरायजर्स हैदराबाद

कर्णधार : डेव्हिड वॉर्नर

सर्वोत्तम कामगिरी : विजेतेपद (२००९, २०१६)

मुख्य आकर्षण : जेसन रॉय

विदेशी चौकडीपासून सावधान

गेल्या पाच हंगामांत सलग बाद फेरी गाठणारा एकमेव संघ म्हणजे सनरायजर्स हैदराबाद. डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विल्यम्सन अशा नामांकित फलंदाजांनी सजलेल्या आघाडीच्या फळीत आता जेसन रॉयची भर पडल्यामुळे हैदराबादचा संघ धोकादायक ठरू शकतो. भुवनेश्वर कुमार, थंगरासू नटराजन ही भारतीय वेगवान गोलंदाजांची जोडीही लयीत असल्यामुळे हैदराबादच्या चमूत आनंदाचे वातावरण आहे. मधली फळी भक्कम करण्यासाठी अनुभवी केदार जाधवला संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे मनीष पांडे, प्रियम गर्ग, अब्दुल समद यांच्यावरील ताण कमी झाला आहे. अफगाणिस्तानच्या फिरकी त्रिकुटांपैकी रशीद खान कोणत्याही क्षणी सामन्याचे रूप पालटू शकतो. त्यामुळे हैदराबादने या वेळी तिसऱ्यांदा जेतेपदाचा चषक उंचावल्यास कोणालाही आश्चर्य वाटणार नाही.

सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 2:07 pm

Web Title: ipl 2021important players information vardhapandin vishesh anniversary special dd 70
टॅग : IPL 2021
Next Stories
1 IPL 2021 : धोनी ब्रिगेड ‘फास्ट ट्रॅक’वर! ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ जलदगती गोलंदाज ताफ्यात दाखल!
2 ‘आयपीएल’ : १४वे पर्व
3 IPL वर करोनाचं संकट: ४ खेळाडूंसहीत ब्रॉडकास्टींग टीम Positive; मुंबईतील २५ कर्मचाऱ्यांना लागण
Just Now!
X