News Flash

जसे जगायला हवे होते तसे!

मग अचानक अनेक वर्षांनी अशी कुणीतरी व्यक्ती समोर येते, जिने आपले संपूर्ण आयुष्य चोरलेले असते.

सिद्धार्थ महाडिक. पुण्यातल्या साध्या मध्यमवर्गीय घरातून आलेला हुशार आणि धाडसी मुलगा.

आपल्या मनामध्ये ‘जसे जगायला हवे’ अशी आयुष्याची कल्पना होती तसे आयुष्य समोर कुणीतरी जगत आहे, ही भावना फार रोमांचकारी असते. प्रत्येक व्यक्तीची लहानाचे मोठे होताना आपापली स्वप्ने असतात. आपण कोण आहोत आणि आपण काय करणार आहोत, याबद्दलची स्वप्ने. ती नेहमी पूर्ण होतातच असे नाही. कारण आपल्या समाजात आपल्याला काय करायचे आहे, याचा निर्णय अप्रत्यक्षपणे आपले कुटुंब आणि समाज घेत असतो. लहान मुलांना त्यांचा कल ओळखून संपूर्ण वेळ त्यांचे आवडीचे काम करू द्यायला फार कमी लोक धजावतात. खेळाडू, कलाकार, गायक, वादक हे आपल्याला शेजारच्यांच्या घरी असलेले आवडतात. अशा परिस्थितीत बहुसंख्य माणसे आपल्या आवडीच्या कामाचा जो विचार करत असतात, तो विचार आणि ती स्वप्ने ते कधी विसरून गेले आणि सरधोपट मार्गाला लागून मान खाली घालून जगत राहिले, हे त्यांना लक्षातही येत नाही.

मग अचानक अनेक वर्षांनी अशी कुणीतरी व्यक्ती समोर येते, जिने आपले संपूर्ण आयुष्य चोरलेले असते. आपले आयुष्य जगण्याची कल्पना चोरलेली असते. चोरलेली असते म्हणजे आपल्याकडून हिसकावून नेलेली नसते. प्रत्येक कल्पना आणि प्रत्येक स्वप्न हे कुठेतरी एका जागी ठेवलेले असते. आपल्याला कष्ट करून तिथपर्यंत जाऊन ते उचलून आणायचे असते. पण अनेक कारणांमुळे आपण तिथे जात नाही. ती व्यक्ती तिथे पोहोचलेली असते आणि उंच झाडावरून मधाचे पोळे हस्तगत केल्यासारखे तिने आपल्या स्वप्नातील काम आत्मसात करून आपल्या स्वप्नातले आयुष्य जगायला सुरुवात केलेली असते. नुकतीच अशी व्यक्ती माझ्यासमोर आली तेव्हा  माझ्या चेहऱ्यावर हसू उमलले. मला आतमध्ये जाणवले, की ही ती व्यक्ती आहे. जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा माझ्या मनाला वाटलेले थ्रिल मी शब्दांत व्यक्त करू शकेन कीनाही, हे मला माहीत नाही. मला मनातून फार आनंद झाला होता. सावकाशपणे आम्ही एकमेकांना वारंवार भेटून गप्पा मारत राहिलो. एकमेकांची ओळख करून घेत राहिलो. तो अतिशय बुद्धिमान आणि आपल्या कामावर प्रचंड प्रेम करणारा तिशीतला मुलगा आहे. इंजिनीअर होऊन मग तो काहीतरी वेगळे म्हणून करायला ऑस्ट्रेलियाला गेला आणि तिथे राहून, शिकून उत्तम शेफ बनून परत आला. त्याला त्याच्या आयुष्याचा सूर आणि म्हणणे तिथे सापडले; जे त्याने भारतात राहून घेतलेल्या शिक्षणात नव्हते. तो परत आला आणि त्याने आधी एका अतिशय छोटय़ा जागेत उत्तम आणि रुचकर पाश्चिमात्य पदार्थ देणारे रेस्टॉरंट सुरू केले. शहराच्या त्या भागात याआधी मिळत नसलेले अनेक चांगले आणि देखणे पदार्थ करून, सतत नवे आणि आकर्षक प्रयोग करून त्याने ख्याती मिळवली. त्याच्या नावीन्यपूर्ण दृष्टिकोनाने त्याच्या रेस्टॉरंटसमोरील लोकांची रांग कधीच कमी झाली नाही. जागा कमीच पडत राहिली. मग त्याने जवळच्या दुसऱ्या एका मोठय़ा जागेत ते रेस्टॉरंट हलवले. प्रचंड मेहनत घेऊन त्याने त्याच्या व्यवसायाचे अस्तित्वात असलेले खोटे नियम लांब फेकून दिले. जेवायला येणाऱ्या लोकांच्या आवडीनिवडीला फार न घाबरता त्याने जेवणाच्या रंग-रूपात आणि चवीत सातत्याने बदल करत ठेवून, मोठय़ा धाडसाने लोकांना ओळखीच्या चवीपेक्षा वेगळे काहीतरी पाहायला आणि अनुभवायला शिकवले. आणि आता मोठी म्हणून त्याने जी जागा घेतली आहे तीसुद्धा कमी पडू लागली आहे. या मुलाचे नाव- सिद्धार्थ महाडिक. पुण्यातल्या साध्या मध्यमवर्गीय घरातून आलेला हुशार आणि धाडसी मुलगा. त्याने जर काही महत्त्वाचे केले तर ते हे, की ऑस्ट्रेलियाहून शिकून परत आल्यावर त्याने कोणाही मोठय़ा हॉटेलच्या स्वयंपाकघरात शेफ म्हणून नोकरी पत्करली नाही. मी त्याला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तो एका ब्रेडच्या प्रकारावर काहीतरी प्रयोग करत होता आणि त्याला त्या दिवशी काहीतरी चांगले हाती लागले होते. त्याच्या छोटय़ा रेस्टॉरंटच्या बाहेरच्या कट्टय़ावर बसून आम्ही दोघांनी तो ब्रेड खात गप्पा मारल्या. गप्पा मारल्या म्हणजे तो त्या ब्रेडबद्दल न थकता बोलत होता आणि मी ते ऐकून घेत बसलो होतो. त्याक्षणी मला लक्षात आले की, या माणसाने माझ्या आधी जाऊन माझे मधाचे पोळे उचलून आणले आहे. आणि आम्ही दोघे भेटलो याचे मला फार बरे वाटले.

असे झाले की एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येऊन पायाखालची जमीन थोडा वेळ सरकल्यासारखी होते. ती गोष्ट म्हणजे- आपल्याला परत मागे जाता येणार नाही. आपल्यापाशी पुन्हा सगळे सुरू करायला फार वेळ उरलेला नाही. आपण काही कळायच्या आत चाळीस वर्षांचे झालो आहोत. कुठे आणि काय करण्यात गेला हा सगळा वेळ, हे कळत नाही. आणि स्वत:ची लाज वाटायला लागते. वेळ आणि काळ या फार भयंकर गोष्टी आहेत. मांजरीप्रमाणे त्या हातातून कधी निसटून गेल्या ते समजत नाही.

सिद्धार्थ त्याचे काम करताना आणि त्याचे रेस्टॉरंट चालवताना घेत असलेले अफाट कष्ट पाहताना मला हे लक्षात येत होते, की स्वयंपाकाची आवड आणि रेस्टॉरंट उघडून ते चालवायचे स्वप्न या संपूर्णपणे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मी अठरा वर्षांचा असल्यापासून मला स्वयंपाकाची आवड होती. स्वत:चे रेस्टॉरंट उघडणे हे मी पाहिलेले चांगले स्वप्न होते. ते इतके प्रबळ होते, की मी माझी पहिली फिल्म त्याच विषयावर केली होती. पण कुठेही मोठय़ा हॉटेल चेनमध्ये नोकरी न करता स्वत:च्या बळावर आपली जागा निर्माण करून ती नेटाने चालवणे यात आवड आणि हौस यापलीकडे अनेक गोष्टी लागतात. हे लक्षात आल्यावर मी शांत झालो. माझ्या लहानपणीच्या स्वप्नात हे कष्ट नव्हते. नुसते स्वयंपाकघर होते. त्याची दुसरी बाजू नव्हती.

प्रत्येकाला कधी न कधी आपले आयुष्य जगत असलेली व्यक्ती भेटते. दरवेळी अशी भेट झालेली जाणवतेच असे नाही. भारतीय समाजात अशी परिस्थिती नसते, की तुम्ही एकदा काहीतरी बनलात की ते सगळे थांबवून तुम्ही दुसरेच काहीतरी बनू शकाल. आयुष्याच्या मध्यावर जेव्हा आपल्याला चांगली अक्कल, जगायचे शहाणपण आणि स्थैर्य आलेले असते, तेव्हा खरे तर सगळे झुगारून देऊन नवीन काहीतरी बनणे शक्य असते. पण जी माणसे कुटुंबव्यवस्थेला बांधली गेलेली असतात त्यांना मुकाटपणे हा विचार बाजूला ठेवून, किंवा विसरून, किंवा हा विचार कधी आपल्या मनात आलाच नव्हता असे मानून तेच काम करत बसावे लागते!

आयटीच्या क्षेत्रात कमी वयात कामाला लागलेली एक मोठी पिढी सध्या वयाच्या पस्तिशी-चाळिशीला आल्यावर काहीतरी पर्याय शोधायला कासावीस झालेली आहे. मी अशा अनेक तरुण मुलांना भेटतो आहे- ज्यांना ते करत आहेत ते काम कितीही पैसे मिळवून देत असले तरी आवडेनासे झाले आहे. पण असे बोलूनही दाखवता येत नाही, हा अजूनच मोठा मनावरचा दगड आहे. एकदा ठरवले की ते आणि तसेच आयुष्य जगायचे, हा कोणता नियम आहे? कोणत्याही वयात नवीन काही शिकून संपूर्ण नव्याने परत परत जगण्याची परवानगी जर आपल्या आजूबाजूचे जग आपल्याला देत नसेल तर आपण अशी संधी कुणाचीही पर्वा न करता खेचून घ्यायला हवी. आपण आयटी तंत्रज्ञ, डॉक्टर किंवा नट झालो असलो तरी आपण आपल्या व्यवसायाला आणि आपल्या तयार झालेल्या त्या अस्तित्वाला फार गांभीर्याने घेण्याची गरज नसते. हुशारीने आणि तत्परतेने वागले तर आपण नव्या गोष्टी शिकून आपली नवी ओळख तयार करू शकतो.. आपल्याला जे मनापासून करायला आवडते ते करत राहू शकतो. कंटाळा आला की सोडून पुन्हा नव्याने पुनर्माडणी करू शकतो. त्यासाठी आपले आयुष्य चोरलेली कुणीतरी व्यक्ती प्रत्येकाला भेटायला हवी. तो क्षण ओळखता यायला हवा. आणि जिने आपले आयुष्य चोरले आहे त्या व्यक्तीशी मैत्री करायची चांगली संधी प्रत्येक माणसाला मिळायला हवी असे मला मनापासून वाटते.

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2017 2:14 am

Web Title: sachin kundalkar article on chef siddharth mahadik
Next Stories
1 पुस्तकांचे वेड (भाग २)
2 पुस्तकांचे वेड (भाग १)
3 परतीचा प्रवास (भाग दोन)
Just Now!
X