सर्व प्रकारच्या हिंसाचाराला विरोध करतानाच आपण प्रेमाच्या, मैत्रीच्या मात्र विरोधात नाही, उलट बाजूनेच आहोत, हे आवर्जून सांगावे लागते. कौटुंबिक हिंसापीडित स्त्रियांसाठी गावपातळीवर आधारगट तयार केलेल्या एका संस्थेच्या प्रमुखांनी सांगितले, ‘मुली खूप नटायला-मुरडायला लागल्या की आमचा आधारगट त्यांच्यावर लक्ष ठेवतो.’ यावर ‘आधारगटाचे काम मुलींवर ‘लक्ष’ ठेवण्या’चे नसून पीडित स्त्रियांना आधार देण्याचे आहे. अन्यथा आधारगट या दुसऱ्या जातपंचायती बनतील’ हे संस्थाप्रमुखांना सांगावे लागले. मुलींचे शोषण होऊ नये म्हणून त्यांना काळजी घेण्यास सांगणे आणि ‘लक्ष ठेवणे’ यातील फरक संस्थाप्रमुखांनी अजाणतेपणातून लक्षात घेतला नव्हता!

पितृसत्ताक-जातीची उतरंड असलेला समाज मुलींवर ‘लक्ष’ ठेवतच असतो. कारण ‘योनिशुचिता’ हा व्यवस्था टिकवण्याच्या दृष्टीने कळीचा मुद्दा असतो. अशा समाजात मुलीने प्रेमात पडणे (विशेषत: ‘पर’ जाती-धर्मातील मुलाच्या), स्वत:चा जोडीदार स्वत: निवडणे, हे ‘अनैतिक’ ठरवले जाऊन त्याची लाज वाटते तर हुंडा देणे-घेणे, थाटामाटात लग्न आणि त्यात भल्याबुऱ्या मार्गाने मिळवलेल्या संपत्तीचे प्रदर्शन, हा ‘संस्कृती’चा (!) भाग मानून मिरवला जातो. लग्न हा बहुतेक वेळेला शुद्ध आर्थिक व्यवहार ठरतो. देण्याघेण्यावरून लग्न मोडल्याची, हुंडय़ामुळे छळ वा हुंडाबळीची अनेक उदाहरणे आहेत. यात काही वावगे आहे, असा प्रश्न आपल्याला का पडत नाही?

‘समजदार जोडीदार’ प्रकल्पांतर्गत बीड जिल्ह्यत शालेय विद्यार्थ्यांबरोबर आम्ही बोलत होतो. ‘मुली ओझं का वाटतात?’ असा प्रश्न विचारल्यावर सहावीतल्या मुलीने क्षणार्धात ‘हुंडा द्यावा लागतो म्हणून’ असे उत्तर दिले! छोटय़ा मुलीला जे समजते, ते समाज म्हणून आपल्याला का समजत नाही? हे बदलावे, असे आपल्याला का वाटत नाही? अशा परिस्थितीत प्रेमविवाह, त्यातही आंतरजातीय-धर्मीय प्रेमविवाह करणारे जातिव्यवस्थेला आणि पितृसत्तेलाही आव्हान देत असतात, त्यामुळे त्यांना मदत करणे, हे सामाजिक कार्यकर्त्यांचे महत्त्वाचे काम आहे. याच दृष्टिकोनातून ‘मासूम’मधील सहकारी जयश्री नलगे आणि मी अनेक जोडप्यांना मदत केली. अनेक संस्था-संघटना अशी मदत करत असतात. अशी मदत घेऊ इच्छिणाऱ्या तरुण मुली-मुलांच्या संख्येत वाढ होत आहे, याचा एकीकडे आनंद वाटतो तर दुसरीकडे समाज म्हणून अजूनही आपली कर्मठ मानसिकता कायम आहे, याचे दु:खही होते. अशा घटनांमध्ये मुलींना डांबून ठेवणे, मारहाण करणे आणि प्रसंगी ठारही मारणे, हे ‘इभ्रती’साठी केले जाणारे प्रकार बघितले की मन विषण्ण होते. काही वेळा, मुलांनाही त्यांच्या घरच्यांकडून मारहाण होते. आंतरजातीय प्रेम केल्याने ‘हुंडा बुडाला’ म्हणून घरच्यांनी फटके दिल्याचा अनुभव एका मुलाने सांगितला होता! अर्थात त्या जोडप्याचे लग्न आम्ही लावलेच! मुलाला मुलीच्या घरच्यांकडूनही मारहाण होण्याचा धोका असतो. विशेषत: मुलगा ‘खालच्या’ मानलेल्या जातीतील असेल तर तो अधिकच वाढतो. एकीकडे ‘वरच्या’ मानलेल्या जातीतील स्त्रियांवर काटेकोर बंधने आणि त्याच वेळी ‘खालच्या’ मानल्या गेलेल्या जातीतील स्त्रिया मात्र ‘वरच्या’ मानल्या गेलेल्या जातीतील पुरुषांना उपलब्ध, याबद्दल अनेक अभ्यासकांनी कडवे सत्य मांडले आहेच. ‘बाई, वाडय़ावर या’ म्हणणारा पुरुष ‘वरच्या’ तर संबंधित बाई ‘खालच्या’ जातीची असते. वाडय़ाचा मालक असलेल्या पुरुषाची लग्नाची बायको बाई म्हणून शोषित तर ‘वाडय़ावर’ बोलावली गेलेली स्त्री ही बाई आणि ‘खालच्या’ जातीची म्हणून दुहेरी शोषित असते. ‘वाडय़ावर या’ म्हणाल्याने कुटुंबाची ‘इभ्रत’ जात नाही, मात्र मुलींनी स्वत:चा जोडीदार स्वत: निवडला की जाते, हा विरोधाभास लक्षात घेणे आवश्यक आहे.

यामुळे प्रेमविवाहांना मदत ही जोखीमच असते. प्रेमी युगुलांवर आणि त्यांना मदत करू इच्छिणाऱ्या आम्हा कार्यकर्त्यांवर प्रचंड ताण असतो. ‘घरच्यांनी आपल्याला शिकायला बाहेरगावी पाठवले आणि आपण प्रेमात पडून त्यांची फसवणूक करत आहोत’ असे एका मुलीला वाटत होते. अशी भावना अनेक युवांच्या मनात असते. अशा वेळी ‘तुम्ही प्रेम केलं आहे, गुन्हा नाही’ असे सांगून त्यांना आश्वस्त करावे लागते. कायद्याच्या दृष्टीने प्रेम हा गुन्हा नसला तरी समाजाच्या दृष्टीने मात्र तो आहे. त्यामुळेच मुलीचे शिक्षण पूर्ण व्हायच्या आतच लग्न ठरवले जाते. प्रेमिकांची वये बहुतेक वेळी पंचविशीच्या आगेमागे असल्याचे दिसते. बऱ्याचदा ते आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी व्हायचे असतात. पण प्रेमात मात्र पडलेले असतात. दोघे विचारपूर्वक लग्न करत आहेत की भावनेच्या आहारी जाऊन, मुलीवर दबाव नाही ना, त्यांना कोणाकडून आणि किती प्रमाणात धोका होऊ शकतो, याबाबत जोडप्यांशी चर्चा करतो आणि त्यांना मार्ग निवडायला सांगतो. त्याबरोबरच दोघांची, विशेषत: मुलीचे करिअर-स्वप्ने, आर्थिक नियोजन यांसारख्या मुद्दय़ांचा विचार त्यांनी केला आहे, याची खात्री करावी लागते. शक्यतो विशेष विवाह कायद्यानुसार लग्न व्हावे, असा आमचा प्रयत्न असतो, पण काही वेळा धार्मिक पद्धतीने लग्न लावावे लागते. त्यातील ‘कन्यादान’ आणि इतर विधीही खटकतात, पण तातडीने लग्न लावायचे असल्याने इलाज नसतो. मुलीचा ‘मामा’ बनून असे कन्यादान करताना व्यवस्थेकडूनच आपण ‘मामा’ बनवले जात आहोत, हे लक्षात घेऊन, विधी करतानाच ‘दोघेही समानतेच्या मूल्याचे आचरण करा’ असे जाणीवपूर्वक सांगतो. दोघांचे धर्म वेगळे असतील आणि धार्मिक पद्धतीने लग्न करायचे असेल तर कोणती कार्यनीती आखायची यावर खल करावा लागतो. स्वेच्छेने धर्मातर करणे हा व्यक्तीचा हक्क तर आहेच, पण मुलीच ते करायला चटकन का तयार होतात, यामागची ‘संरचना’ आम्हा कार्यकर्त्यांना दिसत राहते. एका मुलीला ‘समर्पण’ भावनेतून धर्मातर करायचे होते. तिच्याशी दीर्घ चर्चा केल्यावर दोघांनी आपापले धर्म कायम ठेवून लग्न करायला हरकत नाही, या निष्कर्षांवर ती आली. त्या हिंदू-मुस्लीम जोडप्याने त्यावर आणखी चर्चा करून ‘आम्हाला मुलगा झाला तर समीर आणि मुलगी झाली तर सारा अशी त्यांची नावं ठेवू, कारण ही नावं दोन्ही धर्मात आहेत’ असे सांगितल्यावर आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही!

मुले प्रेमात पडल्यावर पालकांना ते सांगायला घाबरतात, कारण मोठी माणसे आणि मुले यांचे नाते अनेकदा असमान असते. हे नाते समानतेवर, प्रेमावर आधारित आणि हिंसेपासून मुक्त असावे, शाळेत आणि घरातही सकारात्मक पद्धतीने शिस्त रुजवली जावी म्हणून पुण्यातील काही संस्था-संघटना व व्यक्ती गेल्या अकरा वर्षांपासून ‘अ-भय अभियान’ राबवत आहेत. मुळात ‘बालकांचे हक्क’ हा आपल्याकडचा आणखी एक गंभीर मुद्दा आहे. ‘प्रचीती’ या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संघटनेबरोबर काम करताना बालकांच्या प्रश्नांची ओळख झाली आणि त्यातील व्यामिश्रता लक्षात येऊ लागली. पुढे ‘मासूम’मध्ये पारनेर तालुक्यातील आदिवासी मुलांच्या शिक्षणाच्या मुद्दय़ावर काम करताना स्वातंत्र्याला सत्तर वर्षे होऊनही आपल्याला देश-समाज म्हणून किती मोठा पल्ला गाठायचा आहे, याची जाणीव होत राहिली. आदिवासी, ग्रामीण, शहरी, दलित, गरीब, अनाथ, एचआयव्ही बाधित, विकलांग अशा विविध स्तरांमधील मुले आणि या सर्वच स्तरांमधील मुलींचे प्रश्न, यातील एकेका मुद्दय़ावर काम केले तरी कमीच आहे! कोणत्याही सामाजिक समस्येवर कार्यकर्ते काही पथदर्शक काम करतीलच. पण त्याचे सार्वत्रिकीकरण करणे ही राज्यसंस्थेची आणि समाजाची जबाबदारी आहे आणि आपल्याकडची याबाबतची उदासीनता खिन्न करणारी आणि संतापजनकही आहे.

‘शिस्त असलीच पाहिजे, पण ती मार देऊन, अपमान करून आणि धाकातून रुजू शकते का?’, ‘त्याचे मुलांवर काय परिणाम होतील?’ असे मूलभूत प्रश्न ‘अ-भय’ अभियानाने उपस्थित केले. शिक्षक प्रशिक्षणे, जाहीर कार्यक्रम, प्रदर्शने व इतर माध्यमांमधून केलेली जाणीव जागृती असे अभियानाचे काम सुरू आहे आणि दिवसेंदिवस शिक्षक व इतर अनेक गटांकडून प्रतिसाद वाढत आहे. ‘स्वयंशिस्त रुजवूया सकारात्मक पद्धतीने’ या आमच्या पुस्तिकेच्या दोन आवृत्त्या निघाल्या आणि इंग्रजी भाषांतरही झाले. अभियानाच्या संयोजन समितीतील गौरी देशमुख, शुभदा जोशी, बीना जोशी, कविता भागवत, संगीता शिंदे आणि गौरी जानवेकर या सगळ्यांबरोबर काम करताना बालकांबद्दलची संवेदनशीलता वाढली.

मुले ‘बेशिस्त’ का वागतात यामागच्या कारणांचा विचार गरजेचा असतो. उदाहरणार्थ मुले मारामाऱ्या करतात तेव्हा त्यांच्या अंगातली ऊर्जा बाहेर पडण्यासाठी शाळेत/घरात पुरेसा वाव आहे का?, त्यांना वावरण्यासाठी पुरेशी मोकळी जागा, खेळण्यासाठी मैदाने आहेत का?, खेळण्यासाठी वा आवडीच्या कामासाठी पुरेसा वेळ दिला जातो का? की त्याला एखादी वर्तनसमस्या आहे? ती कशामुळे उद्भवली असेल? यासारख्या सर्व मुद्दय़ांचा विचार केला पाहिजे. मुलांच्या बेशिस्त वर्तनाची मुळे बहुतेक वेळी कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीत दडलेली असतात. त्याचा विचार न करता उपाययोजना केल्यास ती वरवरची मलमपट्टीच ठरण्याची शक्यता असते. आजकाल मुले चटकन हिंसक होत आहेत, बाल गुन्हेगारीही वाढत आहे असे एक निरीक्षण नोंदवले जाते. त्यात तथ्य आहेच. मात्र मुलांचे असे वागणे हा समाजासमोर धरला गेलेला आरसा आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

शाळेत, घरात आणि आजूबाजूला, त्याबरोबरच राजकीय संस्कृतीमध्ये आणि प्रसारमाध्यमांमधूनही मुले हिंसा आणि हिंसेचे उदात्तीकरण बघत-अनुभवत आहेत. कुटुंबात स्त्रिया-मुलांवर होणाऱ्या, त्याबरोबरच समाजात जात, धर्म, प्रांत यांसारख्या मुद्दय़ांवर घडवल्या जाणाऱ्या हिंसेने आज उग्र रूप धारण केलेले आहे. अशा परिस्थितीत, मुलांनी हिंसा करू नये असे म्हणण्याचा (ते योग्यच असले तरी) नैतिक अधिकार, स्वत: अनेकदा हिंसा करणाऱ्या मोठय़ा माणसांना कसा काय असू शकतो, याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. याचा अर्थ मुले मारामाऱ्या करत असतील तर मोठय़ांनी हस्तक्षेप करू नये, असा अजिबातच नाही. आवश्यक तिथे तो केला पाहिजेच, मात्र हिंसेच्या मूलस्रोतावर, म्हणजेच समाजात असणाऱ्या विषमतांवर काय उपाय करणार, हा प्रश्न मुले आपल्याला विचारू शकत नसली तरी आपणच तो स्वत:ला विचारला पाहिजे.

– मिलिंद चव्हाण

milindc70@gmail.com