|| डॉ. गिरीश कुलकर्णी

‘स्नेहालय’च्या वाटचालीत स्थापनेपासूनच आम्ही काही नैतिक आग्रह आणि आदर्श निष्ठेने जपले. या समाजघटकांना सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक आणि समग्र न्याय, विकासाची समान संधी, विषमता आणि शोषणापासून मुक्तता, स्वयंपूर्ण आणि सन्मान्य जीवन प्राप्त करण्यासाठी ‘स्नेहालय’ एका उत्प्रेरकाची भूमिका करीत आले. सेवा आणि त्यासाठीचे प्रकल्प, हे एक साधन होते. या धडपडीचे साध्य किंवा अंतिम लक्ष्य मात्र वेगळे होते. या समूहाला सक्षम करून, त्यांना आत्मभान देऊन त्यांचे रूपांतर कर्तव्यशील, निव्र्यसनी, जाणीवसंपन्न अशा नागरिकांत करणे, हे या साधनेचे अंतिम ध्येय होते. ध्येय सतत समोर ठेवून काम केल्याने काही प्रेरक आदर्श या समूहातूनच निर्माण झाले.

union finance minister nirmala sitharaman interacted with students at deccan college
निर्मला सीतारामन यांना विद्यार्थिनीने विचारला प्रश्न… ‘तुम्ही कणखर कशा?’
Distribution of Akshata on the eve of Prime Minister Narendra Modis meeting in Wardha
पंतप्रधान मोदींच्या वर्धेतील सभेच्या पूर्वसंध्येला ‘अक्षता’ वाटप; आधी सभास्थळी झाले होते कलश पूजन
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

१९९०च्या दशकातील मराठवाडा आणि गुजरातचा भूकंप, कारगिलची लढाई, ओरिसातील चक्रीवादळ, त्सुनामी, मुंबईतील १९९३ ते २००८ पर्यंतचे सर्व बॉम्बस्फोट आणि हल्ले, महाराष्ट्रातील भीषण दुष्काळ ते काश्मीर खोऱ्यात झालेली अतिवृष्टी, उत्तराखंडमधील केदारनाथमधील हिमप्रपात, मागील वर्षी चेन्नईमध्ये आलेला महापूर अशा विविध ३९ राष्ट्रीय आपत्तीत नगर जिल्ह्य़ातील वेश्यांनी आपले नागरी कर्तव्याचे भान देशात सर्वप्रथम व्यक्त केले. आपली १ ते ३ दिवसांची कमाई दुर्घटनेनंतर त्वरित आणि स्वयंस्फूर्त संकटग्रस्त देशवासीयांसाठी अर्पण केली. चेन्नईच्या पूरग्रस्तांसाठी घटना घडल्यावर ७ तासांतच नगर जिल्ह्य़ातील लालबत्तीतील सर्व स्त्रियांनी १ लाख रुपये गोळा करून दिले. आजवर विविध आपत्तीत या स्त्रियांनी दिलेला सहयोग ३८ लाख रुपयांवर आहे. कधी ‘एक्स्प्रेस रीलीफ फंड’, कधी ‘टाइम्स’, कधी ‘द हिंदू’, तर कधी ‘सकाळ रिलीफ फंड’ला महिलांनी आपली सारी शिल्लक जाणिवेने आणि आनंदाने दिली. अनेकदा नगरचे जिल्हाधिकारी म्हणायचे की, ‘‘आधी मदतीचे आवाहन शासनाला करू तर द्या, मग तुमची मदत द्या. तुमचं लग्न ठरण्याआधीच वरातीचं घोडं हजर असतं.’’ समाजातील संपन्न, सुशिक्षित आणि प्रतिष्ठित वर्गाच्या मेलेल्या संवेदना वेश्यांनी अनेकदा आपल्या जाणीवयुक्त कृतीने जागवल्या. इतर नागरिकांना असणारे हक्क आणि अधिकार आपणास शासनाकडे मागायचे असतील, तर नागरिक म्हणून कर्तव्यपालनात आपण सर्वात पुढेच हवे, ही नैतिकता वेश्यांच्या मनात निर्माण झाली. ‘स्नेहालय’च्या कामाची ही एक फलश्रुतीच.

अनेक सामाजिक चळवळी-आंदोलनात लालबत्तीतील स्त्रियांचा पुढाकार लक्षणीय राहिला. शनी शिंगणापूर येथे चौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सत्याग्रह केला. पहिल्या सत्याग्रहाच्या वेळी पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया अत्यल्प होत्या. डॉ. दाभोलकर यांनी स्वीकृती दिल्यावर लताक्का, अंजना, सावित्री, गीता अशा ३०-३२ जणींनी उत्साहाने त्यांच्यासोबत सत्याग्रहात भाग घेऊन अटकही करून घेतली. बिहारमधील सीतामढी येथे लोकांनी लालबत्ती जाळून टाकली. त्यात अनेक स्त्रिया आणि बालके होरपळली. काही मुला-मुलींचे आणि तान्ह्य़ा बाळांचे सांगाडे मिळाले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या १३ स्त्रियांनी सीतामढीला जाऊन, तेथे ४ दिवस सत्याग्रह करून निषेध नोंदविला. तेथील विस्थापितांना जिल्ह्य़ात कोपरगाव येथे आणून पुनर्वसन करण्याची योजना स्त्रियांनी बनवली. पण पुढे या स्त्रिया गूढरीत्या बेपत्ता झाल्या. नाशिक जिल्ह्य़ात मालेगाव येथे मोसम पुलाजवळ मोठी लालबत्ती होती. त्यांच्या ताब्यातील मौल्यवान जागा बळकावण्यासाठी स्थानिक मंत्री, काही बिल्डर यांनी पोलीस आणि गुंडटोळ्यांना हाताशी धरून सर्व लालबत्ती पाडली. येथे स्त्रियांसोबत ‘स्नेहालय’ परिवार उभा राहिला. दरोडय़ासह अनेक खोटे गुन्हे वरील अभद्र युतीने आमच्यावर दाखल केले. त्यामुळे सर्व स्त्रियांसह आम्ही नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहाची हवा २ आठवडे खाल्ली. एड्सबाधित स्त्रियांसाठी ‘स्नेहालय’मध्ये बांबूच्या चटया आणि पत्र्यांची देणगी देऊन पहिली एड्सग्रस्तांची वसाहत वेश्यांनीच बांधून दिली. एड्सबाधित स्त्रिया वारल्यावर तिचे अंत्यसंस्कार (आणि गरज नसतानाही नंतरचे निर्थक धार्मिक विधी) वेश्याच वर्गणीद्वारे करायच्या. अनाथ झालेल्या त्यांच्या बालकांचे आईपण समर्थपणे पेलायच्या.

मेधा पाटकर यांच्या नर्मदा खोऱ्यातील शाळांनाही त्यांनी सहयोग दिला. अण्णा हजारे यांच्या माहिती अधिकार ते जनलोकपाल अशा सर्व आंदोलनात लालबत्तीतील महिला सहभागी झाल्या. अण्णांच्या दिल्ली आणि मुंबईतील सर्व आंदोलनात रेल्वेचे रीतसर तिकीट काढून लालबत्तीतील स्त्रिया निदर्शने – उपोषणे करीत आल्या. नगर जिल्ह्य़ातील राजकारणाचे गुन्हेगारीकरण, वाळू तस्करी, नागरी सुविधांचे प्रश्न यावरील चळवळीत या स्त्रिया इतर समाजासोबत आवर्जून सहभागी राहिल्या. महिला आणि बालहक्कांच्या प्रश्नांवर, निर्भया ते कोपर्डी अशा प्रत्येक प्रकरणात जिल्ह्य़ात सर्वप्रथम रस्त्यावर उतरल्या त्या या वेश्याच. पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत नगर तालुक्यातील पिंपळगाव या गावात गाजावाजा न करता १९ मे २०१८ रोजी वेश्यांनी उत्स्फूर्त श्रमदान केले. वेश्या म्हणजे गुन्हेगार -अनैतिक आणि बेकायदेशीर कृत्य करणारा, व्यसनी आणि चंगळवादी वर्ग असा गैरसमज समाजात रूढ होता. या प्रक्रियेतून तो बदलला. इच्छेविरुद्ध, गुन्हेगारी टोळ्यांकडून अल्पवयात देहव्यापारात ढकलल्या जाणाऱ्या या स्त्रिया बहुतांशी दलित, आदिवासी, भटक्याविमुक्त, इतरमागास जाती समूहातून येतात. आर्थिक व सामाजिकदृष्टय़ा मागास भौगोलिक क्षेत्रात त्यांची पाळेमुळे सापडतात. कोणीही स्वेच्छेने लालबत्तीत येत नाही. तसेच स्वेच्छेने येथून बाहेर जाऊही शकत नाही. या बिकट स्थितीत पुन्हा समाजात जाऊन प्रतिष्ठित आणि शोषणमुक्त जीवन जगण्याचा मार्ग सामाजिक जाणिवेच्या आविष्कारामुळे वेश्यांसाठी खुला झाला.

वेश्यांना त्यांच्या जीवनबदलासाठी कोणतेही मानधन किंवा पगार ‘स्नेहालय’ देत नव्हते. उपजीविकेसाठी लालबत्तीबाहेर कष्टाची कामे शोधून प्रतिष्ठा मिळविण्याची आणि समाजात पुन्हा सुस्थापित होण्याची प्रेरणा त्यांना ‘स्नेहालय’मुळे मिळाली. आपल्या आई, बहीण अथवा मुलीने देहव्यापार केलेला जर आपणास आवडणार नसेल तर, दुसऱ्याच्या आया बहिणींनाही तो करावा लागू नये, ही आमची भूमिका होती. आपली मुलगी देहव्यापारात येऊ नये, हीच प्रत्येकीची चिंता असे. त्यासाठी ‘वेश्या म्हणून जगलो, पण वेश्या म्हणून मरणार नाही,’ ही प्रतिज्ञा सर्व कार्यक्रमातून स्त्रिया स्वत:हून करू लागल्या. मागील ३० वर्षांत नगर जिल्ह्य़ातील एकाही वेश्येची मुलगी वेश्या आणि मुलगा दलाल झाला नाही. एचआयव्ही ३ टक्के दिसून येतो. परंतु पारंपरिक गुप्तरोगांपासून सर्व लालबत्ती विभाग १०० टक्के मुक्त झाला. पूजा, सोनम, रोजा, अंबिका, प्रिया, रुकसाना, सुरेखा, जमिला, फरीदा, मुमताज, बानो, भाग्यश्री, सीमा अशा देहव्यापारातून मुक्त झालेल्या ८०० हून अधिक ‘स्नेहालय’कन्या आज परिचारिका, शिक्षिका, पोलीस, संगणकतज्ञ, अभियंत्या, घरेलू उद्योजक बनल्या आहेत. यातील बहुतांश जणींना वयाच्या १२ ते १६ वर्षांच्या दरम्यान ‘स्नेहालय’ने देहाव्यापारातून मुक्त केले होते. असंख्य प्रौढ स्त्रिया देहव्यापार सोडून समाजात पुन्हा स्थिरावल्या. शोभा साळुंके बांधकाम ठेकेदार बनली. सभिहा खान हिने शिरूर (जि. पुणे) येथे स्वत:ची खानावळ सुरू केली. तमाशा आणि कला केंद्रातील स्त्रियांसाठीही ‘स्नेहालय’ने स्वतंत्रपणे काम केले. पायातील चाळ उतरवून शिवकन्या कचरे हिने कोरडगाव, (ता. पाथर्डी ) येथे शेती सुरू केली. जोडीला बचतगट आणि शिक्षणाचे काम सुरू केले. ती स्वत: ट्रक्टर ते ट्रक सर्व चालविते. कोल्हाटी समाजातील मुलींना शिकण्याची संधी मिळावी आणि कलाकेंद्रात पाठवू नये म्हणून १९९२ ते २००६ या काळात केलेल्या प्रबोधनात्मक कामामुळे असंख्य मुला-मुलींना नवजीवन मिळाले. संगीता शेलार हिने मॅक्सिको येथील जागतिक एड्स परिषद गाजवली. संगीता, जया जोगदंड, मीना पाठक, सुमन पांडे आदींनी ‘स्नेहालय’ची लालबत्तीतील कामाची धुरा खांद्यावर घेतली आहे. अशी हजारो प्रेरक उदाहरणे आहेत. अशा प्रेरणादीपांनी लालबत्तीचा अवकाश उजळला आहे.

मागील ५ वर्षांत अनेक आव्हाने उभी राहिली. लालबत्तीच्या मोक्याच्या जागा बळकाविण्यासाठी श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी, अहमदनगर येथे (मालकिणी सोडून) सामान्य वेश्यांवरच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले. औरंगाबादच्या महिलागृहात बळींना डांबल्यावर लालबत्ती विभाग राजरोस जमीनदोस्त करण्यात आले. याबद्दलचे गुन्हेही पोलिसांनी नोंदले नाहीत. त्यामुळे लालबत्तीतील धंदा लॉज, हॉटेल, महामार्ग, झोपडपट्टय़ा आणि घरगुती स्वरूपात सुरू झाले. परिणामी सर्व स्त्रियांचे संघटन, संरक्षण आणि बदलाचे सामूहिक उपाय आव्हानात्मक बनले.

मागील अनुभवातून आम्ही कार्यकर्ते शिकत-बदलत आलो. पुणे येथे स्नेहाधार हा स्त्रियांसाठीचा प्रकल्प सुरू करण्यासाठी बऱ्याच विकासकांकडे आम्ही जमीन मागितली. अखेरीस शारदा गौडा या लालबत्तीतील महिलेने आणि मध्यमवर्गीय सुजाता आणि गजानन रामराव देसाई या सहृदय दाम्पत्याने आपापल्या आयुष्यांची संपूर्ण कमाई असलेल्या २ जागा ‘स्नेहालय’ला सहयोग म्हणून दिल्या. त्यावर प्रकल्प उभे राहिले. मदत शोधण्याऐवजी माणसे जोडण्याला ‘स्नेहालय’ने महत्त्व दिले. दीर्घकाळ जपलेली नाती आणि विश्वासार्हतेचे सहजतेने मिळणारे फळ म्हणजे मदत असते. सरकारी अनुदानाच्या बेभरवशी कुबडय़ा टाळण्यासाठी हा दृष्टिकोन उपयुक्त ठरला. दर्जा आणि गुणवत्ता सतत वाढविण्यासाठी या कामाची दृष्टी असलेली रमाकांत तांबोळी, डॉ. एस. के. हळबे, अनंतराव कुलकर्णी असे ज्येष्ठजन आम्ही अनुसरले. अचानक येणाऱ्या अडचणीत प्रश्नावल्या न विचारता मदत करणारी सहृदय माणसे संस्थेच्या संरक्षक वर्तुळात असावी लागतात. आम्ही अशांना गमतीने ‘अडीनडीचे देव’ म्हणतो. यात प्रवीण बोरा, डॉ. सुहास घुले, भरत कुलकर्णी, जयप्रकाश संचेती, प्रदीप मुळे, श्याम आसावा वकील, राजेंद्र शुक्के, फिरोज तांबटकर, संजय बंदिष्टी, अजित माने आदींचा समावेश होतो. समाजातील वंचितांच्या मूलभूत आणि सर्वमान्य प्रश्नांवर एकत्रितपणे काम करणाऱ्यांचे ‘स्नेहालय’ हे एक कार्यजाळे आहे. हा काही कुठला धर्म, पंथ, पक्ष किंवा विशिष्ठ समान जातीय – धार्मिक पाश्र्वभूमीचा गट नाही. आपले समान आणि विशिष्ट ध्येय दुर्लक्षित होऊ  नये आणि वंचितांसाठीची एकजूट आणि सक्रियता कायम रहावी म्हणून काही पथ्य ‘स्नेहालय’ परिवार सांभाळतो. धर्म आणि राजकारणावर चर्चा आणि वादविवाद आम्ही करीतच नाही. कारण या मुद्दय़ांवर सर्वाची सहमती होणेच शक्य नाही. भारतासाठी काम करीत असताना देशाचे  सामाजिक प्रतिबिंब संस्थेत दिसावे लागते. ‘स्नेहालय’मध्ये विश्वस्त, कार्यकर्ते आणि लाभार्थी यात सर्व जाती-धर्म-लिंग आणि भाषांचा मिलाफ आहे. महत्त्वाचे सर्व निर्णय पदाधिकारी नव्हे, तर ‘स्नेहालय’ परिवार संवाद आणि सहमतीने घेतो. गेली २६ वर्ष ‘स्नेहालय’ विविध क्षेत्रातील समर्पित संस्था आणि कार्यकर्त्यांना पुरस्कारांनी गौरविते. आजवर अशा गौरवीत संस्थांची संख्या ३१० आहेत. माणसांप्रमाणेच संस्थांनीही आपली समृद्धी इतरांना  विश्वस्तभावे वाटायची असते, याची जाण ठेवत आपले असंख्य देणगीदार आणि कार्यकर्ते खुल्या मनाने इतर प्रामाणिक संस्थांशी ‘स्नेहालय’ने जोडले.

अनेकदा प्रतिष्ठा आणि अधिकारांसाठी काम करणारे लोक संस्थांच्या कामात फाजील अडथळे आणतात. त्यामुळे सर्वाची मदत स्वीकारणाऱ्या बऱ्याच संस्था आपल्या कारभारात तावूनसुलाखून माणसे घेतात. अशा संस्था सेवाभाव किंवा कार्यकर्ते कमी झाल्याची कुरकुर करीत असतात. ‘स्नेहालय’चे दरवाजे नेहमीच सताड खुले आहेत. लाभार्थी, माजी विद्यार्थी अशा सर्वानाच संस्थेचे आजीव सदस्यत्व आवर्जून दिले. ज्या संस्थेत खूप माणसे काम करतात, लक्ष देतात आणि जेथे नवनवीन आव्हानात्मक प्रश्न आणि प्रकल्प अंकुरत असतात, तेथेच कार्यकर्त्यांच्या नव्या पिढय़ा जन्मतात असा ‘स्नेहालय’चा विश्वास आहे. संस्थेचा पुण्यातील कारभार शुभांगी कोपरकर, ज्योती एकबोटे, मीरा क्षीरसागर, शशिकांत सातभाई, श्याम पिंपळखरे, विवेक नारळकर अशांची टीम स्वतंत्र आणि समर्थपणे पाहते. बेळगाव येथे नरेश पाटील, आरती उदय कलघटकर, बलराम परमोजी अशांचा संच सक्रिय आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातही माणसे आणि काम आकारते आहे. विकेंद्रित स्वरूपात कामे करताना ‘स्नेहालय’ची कार्यसंस्कृती आणि मूल्यव्यवस्था सर्वत्र सारखीच असते. पारदर्शकता, समावेशकता आणि परिवर्तनशिलता यांमुळे संस्थेचे चैतन्य अक्षय आहे. भविष्यात संस्थेचे माजी विद्यार्थी, लालबत्तीतील पुनर्वसित स्त्रिया- तृतीयपंथी आणि समलैंगिक गटातील कार्यकर्ते- एचआयव्ही बाधित हा गटच ‘स्नेहालय’ची धुरा समर्थपणे सांभाळू शकतो. त्यामुळे त्यांना सक्षम करीत त्यांच्याकडे संस्थेची सूत्र ‘स्नेहालय’ क्रमश: हस्तांतरित करीत आहे. ज्यांच्यासाठी संस्था आणि चळवळ उभी राहिली, त्यांनीच संस्थेचे सुकाणू सांभाळले की, येत्या ५ वर्षांत ‘स्नेहालय’चे वर्तुळ पूर्ण होईल.

girish@snehalaya.org