राज्य सरकारच्या शिक्षणविषयक महत्त्वाच्या निर्णयांची जंत्री सादर करणारे पुस्तक म्हणजे कार्यकर्त्यांना प्रचारासाठी पर्वणीच. शिवाय ते बालभारतीकडून प्रकाशित झालेले असल्याने निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या पुस्तकाची मागणी न वाढती तरच आश्चर्य होते. मात्र, मागणी वाढली असली तरी पुस्तकच बाजारातून गायब आहे. ‘असे कोणतेही पुस्तक आमच्याकडे तयारच झाले नाही’, असे सांगत बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवल्याने कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली आहे.
महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून ‘लोकशाही आघाडी शासनाचे शालेय शिक्षणविषयक महत्त्वाचे निर्णय’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. बालभारतीने काही दिवाळी अंकांमध्ये आपल्या प्रकाशनांच्या केलेल्या जाहिरातींमध्ये या पुस्तकाचा उल्लेखही केला आहे. २० रुपये किमतीच्या या पुस्तकाच्या निमित्ताने आयतेच प्रचारसाहित्य उपलब्ध झाले. त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांनी पुस्तकासाठी विक्रेत्यांकडे धाव घेतली. मात्र, हे पुस्तक उपलब्ध नसल्याचे उत्तर विक्रेत्यांकडून देण्यात आले. बाजारात पुस्तक मिळत नाही म्हटल्यावर हाती जाहिरात घेऊन कार्यकर्त्यांची पावले बालभारतीच्या डेपोकडे वळली. मात्र, तिथेही हे पुस्तक उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. आपणच जाहिरात केलेले हे पुस्तक ‘आम्ही तयारच केले नाही,’ असेही उत्तर बालभारतीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
बालभारतीने आपल्या पाठय़ेतर प्रकाशनांची जाहिरात २०१३ मधील काही दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध केली होती. त्यात आदर्श शिक्षकांची आत्मचरित्रे, छत्रपती शिवाजीमहाराज स्मृतिग्रंथ, बालभारती उत्तम संस्कार कथा, शारीरिक शिक्षण शालेय मार्गदर्शिका, विविध भाषांचे शब्दकोश अशा अभ्यासक्रम पूरक पुस्तकांबरोबरच ‘लोकशाही आघाडी शासनाचे शालेय शिक्षणविषयक महत्त्वाचे निर्णय’ या पुस्तकाचाही उल्लेख होता. ही पुस्तके मिळण्यासाठी बालभारतीच्या विभागीय भांडारांचे संपर्क क्रमांकही देण्यात आले. मात्र, आता नेमके हेच पुस्तक उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 27, 2014 5:58 am