अकरावी-बारावीच्या अध्ययन अक्षम व ऑटिस्टिक विद्यार्थ्यांना गणिताबरोबरच आता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि बुक कीिपग व अकाऊंटन्सी या विषयांकरिताही साधा कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’ने घेतला आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेपासूनच हा बदल लागू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांबरोबरच ही सुविधा यापुढे अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. अध्ययन अक्षम व स्वमग्न विद्यार्थ्यांना इच्छा असल्यास कॅल्क्युलेटर वापरता येईल. अर्थात हा कॅल्क्युलेटर विद्यार्थ्यांना स्वत:च आणावा लागेल व हा फक्त साधा (बेसिक) कॅल्क्युलेटर असावा. मोबाइल फोनमधील कॅल्क्युलेटर किंवा तत्सम कॅल्क्युलेटर वापरता येणार नाही, असे मंडळाने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अर्जामध्ये अपंगत्व असल्याची बाब नमूद केली आहे, तसेच ज्यांनी त्यासाठीची आवश्यक प्रमाणपत्रे सादर केली आहेत, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी वेगळे प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. मंडळामार्फत अशा विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकांची यादी सर्व परीक्षा केंद्रांना पाठविली जाईल व या विद्यार्थ्यांना संबंधित विषयांकरिता ही सवलत दिली जाईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची सुविधा देण्याची सूचना परीक्षेच्या केंद्रसंचालकांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी संबंधित केंद्र संचालकांना ही सवलत मिळण्याबाबत विनंती करणे आवश्यक राहील.
तसेच केंद्र संचालकांना सर्व पर्यवेक्षकांना सवलतीबाबत आवश्यक ते निर्देश द्यायचे आहेत. या परिपत्रकाच्या सूचना परीक्षा केंद्रावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

४० ठिकाणी कॉपीची प्रकरणे
बारावीच्या शनिवारपासून सुरू झालेल्या परीक्षेदरम्यान राज्यभरात ४० ठिकाणी कॉपीचे प्रकार आढळून आल्याची माहिती मंडळाने दिली आहे. हे गैरप्रकार वगळता उर्वरित ठिकाणी परीक्षा शांततेत पार पडल्याचे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई, औरंगाबाद, लातूर, कोकण या ठिकाणी परीक्षेदरम्यान एकही गैरप्रकार प्रकार आढळून आला नाही. तर पुण्यात सर्वाधिक १४ कॉपीची प्रकरणे आढळून आली. त्याखालोखाल नागपूरमध्ये (११), अमरावती (७), नाशिक (५) आणि कोल्हापूर (३) अशी कॉपीची प्रकरणे सापडली.  

परीक्षेत लग्नाचा गोंधळ
 परळच्या शिरोडकर विद्यालयात शनिवारी बारावीची परीक्षा सुरू असताना शेजारील सभागृहात सुरू लग्नाचा गोंधळ सुरू असल्याने व्यत्यय निर्माण झाला होता. लग्नाच्या गोंधळामुळे आमची एकाग्रता भंग पावत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तक्रार केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी विद्यालय प्रशासनाची भेट घेऊन परीक्षेच्या वेळी सभागृह लग्नासाठी दिलेच केले याबाबत जाब विचारला. २००९ साली सुद्धा विद्यालाने असा प्रकार केला होता आणि नंतर माफी मागावी लागली होती असे मनविसेचे चेतन पेडणेकर यांनी सांगितले.