दहावी-बारावीनंतर अभ्यासक्रमाची निवड करणे विद्यार्थ्यांना सुकर व्हावे, याकरिता २९ आणि ३० मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत लोकसत्तातर्फे मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन शालेय शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
 गुरुवार, २९ मे आणि शुक्रवार, ३० मे रोजी प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात आयोजित केलेल्या करिअर मार्गदर्शन कार्यशाळेच्या दोन्ही दिवसांच्या प्रवेशिका संपल्या
आहेत.
प्रवेशेच्छु विद्यार्थी आणि पालकांना याच ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांची, शिक्षण संस्थांची माहिती देणाऱ्या शैक्षणिक प्रदर्शनाला उपस्थित राहता येईल.
या कार्यशाळेत करिअर निवडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी, यावर प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी मार्गदर्शन करणार आहेत. तर सॉफ्ट स्किल्सची आवश्यकता आणि ही कौशल्ये कशी आत्मसात करावीत, यावर गौरी खेर विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.
दहावी-बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना कला, विज्ञान, वाणिज्य, तंत्रज्ञान आदी विद्याशाखांमधील विविध अभ्यासक्रमांची तसेच स्पर्धा परीक्षांची माहिती ग्रोथ सेंटरच्या करिअर समुपदेशक मुग्धा शेटय़े आणि स्नेहल महाडिक करून देतील.
कार्यशाळेचा समारोप ज्येष्ठ शिक्षक-प्रशिक्षक अनुराधा गोरे यांच्या उपस्थितीत होणार असून करिअरमधील यश आणि अभ्यासतंत्र या विषयावर त्या विवेचन करतील.