शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांबाबत सोमवारी शिक्षक परिषदेतर्फे आझाद मैदानात बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात झाली. जोपर्यंत शासन शिक्षकांच्या मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु ठेवण्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.दरम्यान सोमवारी संध्याकाळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची अचानक भेट घेतली व चर्चा केली. मात्र यात काही प्रश्नांबाबत निर्णय न झाल्याने मंगळवारीही आंदोलन सुरूच राहील असे शिक्षक परिषदेचे वेणूनाथ कडू यांनी सांगितले.
परिषदेच्या प्रमुख मागण्या
* अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन सुरु करा.
* अनुदानास पात्र ठरलेल्या शाळा व तुकडय़ाना दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने अनुदान द्या व उर्वरित शाळांची यादी मूल्यांकनानुसार घोषित करा.
* शिक्षकेतरांचा आकृतिबंध तातडीने लागू करा.
* मुल दत्तक घेणाऱ्या महिलांना १८० दिवसाची विशेष रजा द्या.
* महिलांना बालसंगोपन व पुरुषांना पित्रुत्व रजा मिळावी.
* सातवा वेतन आयोग तातडीने लागु करावा.
* स्वंय अर्थसहाय्यित धोरण रद्द करावे.
* रात्र शाळा, आश्रम शाळा, सैनिकी शाळा, अपंग ,तंत्रशिक्षण तस्सम शाळांचे प्रलंबित प्रश्न, मुख्याध्यापकांना बांधकाम व पोषण आहाराच्या जबाबदारीतून मुक्त करा.
* अतिरिक्त शिक्षकांचे तातडीने समायोजन करा व रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी द्या.