पुरेसे विद्यार्थी नसतानाही टीएफडब्ल्यू कोटय़ातील विद्यार्थी

विद्यार्थी मिळत नसल्यामुळे खर्च कसा भागवायचा या चिंतेत असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा ताण तंत्रशिक्षण संचालनालयाने अधिकच वाढवला आहे. पुरेसे विद्यार्थी मिळालेले नसतानाही शैक्षणिक शुल्क माफी मिळणाऱ्या कोटय़ातील (टीएफडब्ल्यू) विद्यार्थी विभागाने केंद्रीय प्रवेश फेरीतून महाविद्यालयाला दिले आहेत. त्यामुळे उत्पन्न नाहीच, अधिकचा खर्च अशी परिस्थिती काही महाविद्यालयांवर आली आहे.

अभियांत्रिकी प्रवेशासाठी टीएफडब्ल्यू (टय़ूशन फी वेवर) योजनेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या कोटय़ात प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क महाविद्यालयांनी माफ करायचे असते. सहा लाख रुपयांखालील उत्पन्न आणि गुणवत्ता अशा निकषांवर या कोटय़ासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. महाविद्यालयाच्या एकूण प्रवेश क्षमतेच्या पाच टक्के प्रवेश या कोटय़ातील विद्यार्थ्यांना द्यायचे असतात. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातूनच महाविद्यालयांना या कोटय़ातील विद्यार्थी दिले जातात. नियमानुसार महाविद्यालयांतील ३० टक्के जागांवर प्रवेश झाले की मगच टीएफडब्ल्यू कोटय़ातील प्रवेशासाठी पात्र असलेले विद्यार्थी महाविद्यालयाला दिले जातात. मात्र यावर्षी पहिल्या प्रवेश फेरीत काही महाविद्यालयांचे प्रवेश तीस टक्क्य़ांपेक्षा कमी झालेले असतानाही त्यांना टीएफडब्ल्यू कोटय़ातील विद्यार्थी देण्यात आले आहेत, अशी तक्रार महाविद्यालयांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थी नाहीत त्यामुळे महाविद्यालय कसे चालवायचे असा प्रश्न पडलेल्या असताना तंत्रशिक्षण विभागाकडून महाविद्यालयांच्या अडचणीत भरच घालण्यात आली आहे.

‘महाविद्यालयातील सुविधा या त्याच्या प्रवेश क्षमतेच्या अनुषंगाने पाहिल्या जातात. तेथे नेमके किती प्रवेश झाले हे पाहिले जात नाही. मात्र ३० टक्के प्रवेशाचा नियम असतानाही टीएफडब्ल्यू कोटय़ातील विद्यार्थी देण्यात आले आहेत,’ असे एका प्राचार्यानी सांगितले. याबाबत तंत्रशिक्षण संचालक डॉ. एस. के. महाजन यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.