तेल अविव विद्यापीठासोबत करार; परराष्ट्र संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न
भविष्यात इस्रायलमधील एखादी व्यक्ती तुमच्याशी मराठीत बोलली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तेथे मराठीचे धडे देण्यासाठी राज्य मराठी विकास संस्था, मुंबई विद्यापीठ आणि तेल अविव विद्यापीठ यांच्यात सोमवारी सामंजस्य करार करण्यात आला. तसेच भविष्यात अन्य देशांमध्येही मराठी भाषेसाठी सामंजस्य करार करण्याचा मानस मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी कराराप्रसंगी व्यक्त केला.
इस्रायलमध्ये मराठी भाषक लोक मोठय़ा प्रमाणात आहेत. इस्रायलमध्ये मराठी नियतकालिके प्रसिद्ध होतात. दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो, तसेच मराठी नाटकांचे प्रयोगही आयोजित केले जातात. १९९६ साली जागतिक मराठी संमेलनही इस्रायलमध्ये झाले होते. तरी, इस्रायलमध्ये जन्मलेल्या लोकांच्या पुढच्या पिढय़ा मातृभाषा म्हणून हिब्रूच सांगतात. इस्रायली विद्यापीठांत संस्कृत, हिंदी तसेच मल्याळम भाषा शिकण्याची सोय असली तरी मराठी शिकण्याची सोय उपलब्ध नाही, असे तावडे यांनी स्पष्ट केले. तेल अविव विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाच्या मदतीने मराठीचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. मराठी भाषेचा प्रचार हे राज्य मराठी विकास संस्थेचे उद्दिष्ट असल्यामुळे संस्थेने या प्रकल्पात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

भाषा जपण्याचा आग्रह
भारताबाहेरील भारतीय वंशाच्या लोकांशी सांस्कृतिक वीण घट्ट करून त्यांचा उपयोग परराष्ट्र संबंध मजबूत करण्याकडे केंद्राचा कल आहे. त्याला अनुसरूनच देशोदेशी स्थायिक झालेल्या मराठी भाषिक लोकांमध्ये महाराष्ट्राची भाषा, कला, संस्कृती जिवंत राहावी यासाठी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक तसेच मराठी भाषा विभाग आग्रही आहे. मराठी भाषक लोकांची जास्त वस्ती असलेल्या ठिकाणच्या विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची सोय उपलब्ध केल्यास तेथील मराठी पिढीची महाराष्ट्राशी असलेली नाळ तुटणार नाही, असेही तावडे म्हणाले.