वाढीव शुल्क न भरणाऱ्या पालकांच्या मुलांना वर्गात प्रवेश नाकारून त्यांना पाच तास प्रवेशद्वारावरच रोखून धरणाऱ्या ऐरोलीतील ‘व्हीपीएम इंटरनॅशनल स्कूल’विरोधात तब्बल तीन महिन्यांनंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१८ नोव्हेंबर, २०१३रोजी ही घटना घटली होती. शाळेने पालक-शिक्षक संघटनेच्या (पीटीए) संमतीविना शुल्कवाढ केली होती, असा पालकांचा आरोप होता. त्यामुळे, वाढीव शुल्क भरण्यास शाळेच्या काही पालकांचा विरोध होता. ते जुन्या शुल्करचनेनुसारच शाळेकडे शुल्क भरत होते. शुल्कवाढीला विरोध करणाऱ्या या पालकांच्या पाल्यांना शाळेने सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० या वेळेत प्रवेशद्वारावरच रोखून धरत त्यांना वर्गात प्रवेश नाकारला होता. इतका वेळ बाहेर थांबल्याने अनेक मुलांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मुलांना शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा छळण्याच्या या प्रकाराबद्दल पालकांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
गेले तीन महिने पालकांच्या या तक्रारीची दखल घेतली जात नव्हती. पोलिसांनी तक्रार दाखल करून घ्यावी म्हणून पालक गेले तीन महिने पाठपुरावा करीत होते. शेवटी सहाय्यक पोलिस आयुक्त आर. धुरे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. ए. गावडे यांनी पुढाकार घेऊन पालकांची तक्रार दाखल करून घेतली आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या सोंदुर आणि शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकांनी या प्रकाराची तक्रार राज्य बाल हक्क आयोगाकडेही दाखल केली होती.