मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मंगळवारी तिसरी आणि शेवटची कटऑफ यादी जाहीर केली. मात्र, ही कटऑफ दुसरीच्या तुलनेत काही गुणांनीच खाली आल्याने फार थोडय़ा विद्यार्थ्यांना या यादीने दिलासा मिळाला. त्यामुळे, मनाजोग्या अभ्यासक्रमासाठी अनेक विद्यार्थ्यांची वणवण सुरूच राहण्याची शक्यता आहे.
यंदाच्या बारावीच्या वाढलेल्या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या बहुतांश जागा ‘इनहाऊस’ विद्यार्थ्यांनीच भरल्या गेल्याने अनेक महाविद्यालयांमध्ये बाहेरच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी फारच कमी झाल्या होत्या. त्यामुळे, दुसरी कटऑफ यादीही पहिलीच्या तुलनेत सरासरी दोन ते तीन टक्क्यांनीच घसरली होती. तिसऱ्या यादीतही याचीच पुनरावृत्ती झाल्याने महाविद्यालयांना फारशा विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य झाले नाही.
विद्याविहार येथील एस. के. सोमय्या महाविद्यालयाची बीकॉमसाठीची पहिली कटऑफ ७८.४६% होती. तर तिसऱ्या यादीत केवळ ७४.८० टक्क्यांवर आली आहे. तर दुसऱ्या यादीत केसीची बीएमएम (कॉमर्स) ची ९२.४% वर असलेली कटऑफ अवघ्या ९२ टक्क्यांवर आली आहे. एचआरची बीएमएमची दुसऱ्या यादीत ९३.२३ टक्क्यांवर असलेली कटऑफ अवघ्या ९२.४० टक्क्यांवर आली आहे. तर बीएमएमची (सायन्स) ९२.४०टक्क्यांवरून ९१ टक्क्यांवर आली आहे. याचाच अर्थ महाविद्यालयांना तिसऱ्या यादीतही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देता आलेले नाही.