News Flash

बोगस प्रमाणपत्रांचा छडा लावण्यात विद्यापीठच उदासीन

आपल्या तपासणी यंत्रणेमार्फत बोगस गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रांची शेकडो प्रकरणे दरवर्षी उघड होऊनही पोलिसांच्या तपास यंत्रणेमार्फत या रॅकेटच्या मुळाशी जाण्यात खुद्द मुंबई विद्यापीठ प्रशासनच कमालीचे

| August 19, 2015 02:10 am

आपल्या तपासणी यंत्रणेमार्फत बोगस गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रांची शेकडो प्रकरणे दरवर्षी उघड होऊनही पोलिसांच्या तपास यंत्रणेमार्फत या रॅकेटच्या मुळाशी जाण्यात खुद्द मुंबई विद्यापीठ प्रशासनच कमालीचे उदासीन आहे. बोगस प्रमाणपत्राचे प्रकरण उघडकीस आल्यास कधी शिपायामार्फत तर कधी चक्क पोस्टाने पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याची औपचारिकता विद्यापीठाकडून पाळली जात आहे. खुद्द तक्रारदाराकडूनच दाखविल्या जाणाऱ्या या उदासीनतेमुळे तब्बल १५८ वर्षांची परंपरा असलेल्या या मुंबई विद्यापीठाची खोटी प्रमाणपत्रे बनविण्याचा धंदा राजरोसपणे सुरू आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे कागदपत्रांची तपासणी (व्हेरीफिकेशन) करणारी स्वतंत्र यंत्रणा आहे. अनेकदा बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्याकडे नोकरीला लागलेल्या नव्या नोकरदारांच्या पदव्यांची तपासणी करून घेण्यासाठी विद्यापीठाकडे येतात. १०० ते ४०० रुपयांच्या मोबदल्यात या कागदपत्रांची तपासणी करून दिली जाते. कधीकधी पोलिसांमार्फतही या प्रकारची प्रकरणे तपासणीकरिता आणली जातात. त्यामुळे थोडय़ाफार प्रमाणात का होईना बोगस प्रमाणपत्रांची प्रकरणे विद्यापीठाच्या हाती लागतात. २०१२-१३मध्ये अशी बनावट प्रमाणपत्रांची २५२ प्रकरणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला सापडली. २०१३-१४मध्ये २४२ आणि २०१४-१५मध्ये २७४ प्रकरणांचा छडा लागला होता. तर २०१५-१६च्या जुलैपर्यंत अशी १३६ प्रकरणे सापडल्याची माहिती खुद्द परीक्षा विभागाने विहार दुर्वे यांना माहितीच्या अधिकाराखाली दिली आहे.
अर्थात, इतक्या मोठय़ा प्रमाणावर बनावट प्रमाणपत्रांची प्रकरणे हाताला लागूनही त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यास विद्यापीठाला यश आलेले नाही. कारण, विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारीच या प्रकरणांचा योग्य पाठपुरावा करीत नाहीत. केवळ औपचारिक तक्रार नोंदवून पोलिसांवर हे प्रकरण सोडून दिले जाते.
‘विद्यापीठ आमच्याकडे वेळोवेळी बोगस पदवी प्रकरणांची तक्रार नोंदविते हे खरे आहे. मात्र बऱ्याचदा या तक्रारी केवळ शिपायामार्फत तर कधी फक्त पोस्टाने पोलिसांकडे नोंदविल्या जातात,’ असे वांद्रे-कुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंडलिक निगडे यांनी सांगितले.

..अशी शोधली जातात बनावट प्रमाणपत्रे
पैशाची बनावट नोट जशी ओळखली जाते त्याचप्रमाणे गुणपत्रिका किंवा पदवी प्रमाणपत्रावरही सहा ते सात प्रकारच्या खुणा असतात. या खुणा शोधल्या की प्रमाणपत्र बनावट आहे की खरे हे ओळखता येते. परंतु आम्हाला अनेकदा इतक्या खोलात जावेच लागत नाही. संबंधित प्रमाणपत्र पाहिल्यानंतर किंवा हातात घेतल्यानंतर आम्हाला लगेचच ते लक्षात येते. त्यावरील सह्य़ा, छपाई अशा अनेक बाबींवरूनही ते ओळखता येते, असे विद्यापीठाचे नवे परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 2:10 am

Web Title: university depressed over investigation on bogus certificates
Next Stories
1 ‘प्रवेश व शिक्षण शुल्क कायदा’ संस्थाचालकांच्या भल्यासाठी?
2 वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत हरयाणाचा विपुल गर्ग प्रथम
3 ‘ऑनलाइन’मुळे प्राध्यापक वंचित
Just Now!
X