मित्रांनो, कालच्या लेखात आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या पेपर-१ चे स्वरूप व त्याची पूर्वतयारी याविषयी माहिती घेतली. आज पेपर-२ चे स्वरूप व त्याची पूर्वतयारी याविषयी चर्चा करणार आहोत. पेपर-१ प्रमाणेच आयोगाने पेपर-२ लाही कोणतेही शीर्षक दिलेले नाही. परंतु, ‘यूपीएससी’च्या पेपर-२ चा प्रभाव लक्षात घेता आपण या पेपरचा उल्लेख या लेखात सीसॅट (C-SAT Civil Service Aptitude Test) असा करणार आहोत. या घटकांची आज आपण क्रमवार चर्चा करणार आहोत.
आकलनक्षमता (Comprehension)- आयोगाने पेपर-२ च्या अभ्यासक्रमात या विषयास पहिले स्थान दिले आहे. या घटकाचा उद्देश हा उमेदवाराची आकलनक्षमता किंवा कौशल्य तपासणे हा आहे.
एखादा उतारा देऊन त्यावरील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधणे असे या घटकाचे स्वरूप असण्याची शक्यता आहे. यामध्ये मराठीतील प्रसिद्ध लेखकांच्या पुस्तकातील किंवा ग्रंथातील उतारा, सध्या चर्चेत असलेले सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक प्रश्न यासंबंधी उतारे येणे अपेक्षित आहे. हे उतारे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांत (Translation) असतील. कारण या उताऱ्यातून विद्यार्थ्यांची भाषिक क्षमतेबरोबरच आकलनक्षमतेचीही कसोटी लागणार आहे.
आयोगाने या पेपरच्या अभ्यासक्रमाच्या सातव्या घटकात मराठीत व इंग्रजी भाषेची आकलनक्षमता किंवा कौशल्य (Marathi and English Language comprehension skill)) चा उल्लेख केला आहे. या घटकातील उताऱ्यांचे भाषांतर विद्यार्थ्यांना उपलब्ध नसेल तर मराठी व इंग्रजी उताऱ्यांवरून भाषिक आकलनक्षमता तपासणे हा या घटकाचा उद्देश असल्याचे दिसून येते.
या दोन्ही घटकांची तयारी करताना उताऱ्याचे सूक्ष्मपणे वाचन करणे गरजेचे ठरते. उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्यावरील प्रश्नांमधील मुख्य शब्द व प्रश्नांचा रोख समजून घेणे आवश्यक आहे. या घटकांतून विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता तसेच आकलनक्षमता जाणण्याचा उद्देश आहे हे लक्षात घेणे गरजेचे ठरते.
आयोगाने पेपर-२ मध्ये दुसऱ्या घटकात आंतरवैयक्तिक कौशल्य व संप्रेषण किंवा संभाषणकौशल्य (Interpersonal skills including communication skills) या विषयाला स्थान दिले आहे. प्रशासनात काम करत असताना संवाद समन्वय महत्त्वाचा असतो. त्यासाठी संभाषणकौशल्य हा घटक महत्त्वाचा ठरतो.
एका प्रकारे या घटकातून उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेण्याचा उद्देश स्पष्ट होतो. या घटकाची तयारी करताना शब्दसामथ्र्य, समानअर्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अनेक शब्दांबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, प्रशासकीय भाषेतील महत्त्वाचे शब्द याकडे विशेष लक्ष द्यावे. उदा. ज्ञापन, अधिसूचना, श्वेतपत्रिका, इ.बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. याशिवाय एखादा लघु उतारा हा चार विधानांच्या स्वरूपात देण्यात येतो व त्या विधानांची क्रमवार पद्धतीने अर्थपूर्णरीत्या जुळणी करणे असे प्रश्नांचे स्वरूप असते. हे प्रश्नही बहुपर्यायी व वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. या प्रश्नांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी लेखनातून संवाद साधण्याची क्षमता किंवा कौशल्य तपासणे हा मुख्य हेतू असतो. त्यावरून चार पर्यायांच्या स्वरूपात विधाने दिली जातात. ही विधाने किंवा पर्याय त्या उताऱ्याशी सुसंगत आहेत की विसंगत आहेत हे पर्यायातून निवडावे लागते.
आयोगाने ‘तार्किक व विश्लेषणात्मक क्षमता’ (Logical reasoning and analytical ability)) या विषयाला तिसरे
स्थान दिले आहे. तर चौथ्या स्थानावर निर्णयक्षमता व समस्यांचे निराकरण किंवा सोडवणूक (Decision making and problem- solving)) हा विषय आहे. हे दोन्ही घटक एकमेकांना पूरक आहेत. या दोन्ही घटकांतही उताऱ्यावरील प्रश्नांना महत्त्वाचे स्थान असते. तसेच दोन किंवा चार विधाने दिलेली असतात व त्या दोन विधानांतील संबंध, कारण व निष्कर्ष अशा स्वरूपाचे असतात. विद्यार्थ्यांनी पर्यायातून योग्य कारण किंवा निष्कर्ष निवडायचे असतात. या घटकात नातेसंबंध, दिशा, कूटप्रश्न (कोडी), संभाव्यता (Probablity) संख्या व अक्षरांचे एकमेकांशी असलेले संबंध, भूमितीय आकृत्या या घटकांवर प्रश्न विचारले जातात.
निर्णयक्षमता व समस्यांशी सोडवणूक या घटकात एखादा प्रसंग किंवा घटना देण्यात येते व त्या प्रसंगी तुम्ही कोणता निर्णय घेता या संदर्भात प्रश्न विचारले जातात. यातून विद्यार्थ्यांची निर्णय घेण्याची क्षमता तपासली जाते.
आयोगाने पाचव्या व सहाव्या स्थानावर अनुक्रमे सामान्य बुद्धिमत्ता चाचणी (General mental ability) व मूलभूत संख्याज्ञान व सामग्रीचे आकलन व उपलब्धता (Basic numeracy Data interpretation sufficiency) या घटकांना स्थान दिले आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या जुन्या अभ्यासक्रमातील बुद्धिमापक चाचणी या घटकाचे स्वरूप वरील दोन घटकांच्या स्वरूपासारखेच आहे. नव्या अभ्यासक्रमात सामग्रीचे आकलन व उपलब्धता या नवीन घटकाचा समावेश केलेला आहे. तक्ते, आलेख, स्तंभालेख, वृत्तालेख यावरून प्रश्न विचारले जातात. या विषयाद्वारे माहितीचे संकलन, व्यवस्था योग्य प्रकारे कशी केली जाते, हे विद्यार्थ्यांना समजावे हा हेतू असतो. आजच्या लेखात पेपर-२ ची पूर्वतयारी व स्वरूप या विषयीची आपण चर्चा केली. आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमात जो बदल केला आहे, त्याने गोंधळून न जाता संयमाने या बदलांचा स्वीकार करून नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक आहे. मागील दोन लेखांमध्ये बदललेल्या अभ्यासक्रमाच्या पूर्वतयारीची चर्चा आपण केली. या अभ्यासक्रमावर संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अभ्यासक्रमाचा प्रभाव स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे पूर्वतयारी करताना यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या मागली दोन वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घेऊन राज्यसेवा पूर्वपरीक्षेची पूर्वतयारी त्या अनुषंगाने करावी, हे श्रेयस्कर ठरेल.  विद्यार्थ्यांना या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा!