विद्यार्थी मित्रांनो!
तुम्ही आता नववीतून दहावीत आलेले आहेत. त्याबद्दल सर्वात आधी तुमचं मनापासून अभिनंदन आणि दहावीच्या या वर्षभरासाठी तुम्हा सर्वाना अनेक शुभेच्छा! मित्रांनो, तुमचं हे दहावीचं र्वष खूप सगळ्या उत्साहाचं, कुतूहलाचं त्याचबरोबर त्रस्त आणि व्यस्त वेळापत्रकाचं असणार आहे. कारण या वर्षांला तुमच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरं तर काय आहे हे दहावीचं र्वष? अभ्यासातले अनेक अडथळे प्रयत्नपूर्वक दूर करत आपल्या ध्येयाकडे होणारी वाटचाल म्हणजे दहावीचं वर्ष. जितके सकारात्मक, प्रामाणिक श्रम तितके उत्कृष्ट फळ याचा प्रत्यय म्हणजे दहावीचं वर्ष. तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतकं का बरं महत्त्व असतं या दहावीच्या वर्षांला? शोधली तर खूप कारणं सापडतील आपल्याला. दहावीचं वर्ष हे आयुष्याला नव्या वळणावर नेण्याचं वर्ष. छोटय़ा पंखातलं बळ अजमावून बघण्याचं वर्ष. शालेय जीवनातील साऱ्या आठवणी अलवार कुपीत बंद करून ठेवण्याचं वर्ष. घरटं सोडून अवकाशात झेप घेण्याच्या तयारीचं वर्ष. तुमच्यासाठी झटणारे आजी- आजोबा, आई- बाबा, काका- काकू, मावशी- आत्या, ताई- दादाच्या अपेक्षांची पूर्तता करणारं हे वर्ष.
आणखी सांगायचं तर तुमच्यातल्या तन्यतेचा, कष्टाळू वृत्तीचा अंदाज घेणारं हे वर्ष. ‘बस् मी सगळं बदलून टाकेन’ या आणि अशा अनेक निश्चयाचं हे वर्ष. अर्थात ज्ञानाच्या एका छोटय़ा दालनातून विस्तीर्ण पसरलेल्या दुसऱ्या, नव्या दालनातल्या प्रवेशाची नांदी म्हणजे दहावीचं वर्ष! म्हणूनच तर महत्त्वाचं वर्ष. शिक्षण क्षेत्रात होणारे अनेक सकारात्मक बदल आणि त्यानुसार विविध क्षेत्रांत निर्माण झालेल्या नानाविध संधी यांचा विचार करता हे वर्ष आपल्याला नवी दृष्टी देणारं, मिळालेलं ज्ञान वापरायला शिकवणारं, नवनवीन आव्हानं देणारं, प्रलोभनं दाखवणारं आणि एकूणच ‘नाकासमोर चालणं झालं जुनं’ अशी जाणीव पुन्हा पुन्हा करून देणारं, वैविध्यपूर्ण असणार आहे. मित्रांनो, तरीसुद्धा घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही तसंच बेफिकीर राहूनही चालणार नाहीच. सगळ्या बदलांना सामोरं जाण्यासाठी अर्थात दहावीच्या अभ्यासासाठी आपल्यात गेट सेट रेडी व्हायचं आहे.
या वर्षभरातले सगळे चढउतार विनातक्रार पार करण्यासाठी आपल्याला सुसज्ज व्हायचं आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिकदृष्टय़ादेखील तुम्ही प्रत्येकाने खूप अभ्यास करायचा हे ठरवलेलं आहेच; परंतु इतके सारे कशासाठी असही तुम्हाला वाटत असेल. जागतिकीकरण आणि त्या अनुषंगाने प्रत्येक क्षेत्रात होणारा बदल पाहता स्वत:चा वेगळा ठसा उमटवण्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहावं लागणार आहे. त्यासाठी बदल स्वीकारण्याची वृत्ती, प्रामाणिक प्रयत्न, योग्य दिशेने होणारी प्रगती, अचूक मार्गदर्शन हे सारं आत्मसात करण्यासाठी आपल्याला आपलं मन आणि शरीर दोन्ही तयार करावं लागेल.
दररोजच्या अभ्यासाचं नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी इ.च्या मदतीने सारं काही सुकर होईल. निराशा, आळस झटकून दहावीचं हे संपूर्ण वर्ष तणावमुक्त राहील. शरीर आणि मनाचं संतुलन राखण्यासाठी केवळ अभ्यास एके अभ्यास न करता खेळ, व्यायाम, मनोरंजन आणि चौरस आहार यांनादेखील रोजच्या वेळापत्रकात स्थान द्या. तुमची प्रत्येक भूमिका विद्यार्थ्यांला साजेशी ठेवा. कोणताही अभ्यास करताना ज्ञानार्जन हा त्यामागील महत्त्वाचा हेतू लक्षात ठेवा. अभ्यास हा धोकंपट्टी करून गुण मिळविण्याचं साधन नसून समृद्ध जीवन जगण्याची ती एक साधना समजा. म्हणूनच अभ्यासात सातत्य ठेवा. तुमच्या पुस्तकातील प्रत्येक धडा, प्रत्येक कविता तुम्हाला काही जीवनमूल्यं देऊन जातात. त्यामुळे वाचन करताना काहींतरी आत्मसात करण्याच्या इराद्यानेच वाचन करा. डोळसपणे वाचा.
मित्रांनो, तुम्ही मोर बघितला असेलच. बंद पिसारा असलेला आणि पिसारा फुलवलेला मोर. दोन्ही सुंदरच दिसतात; तरीसुद्धा पिसारा फुलवलेला मोर आपल्याला अवाक् करतो. हो ना?
तुमच्यातदेखील असाच एक बंद पिसारा आहे. फक्त त्या बंद पिसाऱ्याला पूर्णत: फुलविण्याची जबाबदारी तुमची. खरं तर १ली ते ९वी तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलेला आहेच. या वर्षी तुमच्यातल्या जास्तीत जास्त क्षमता फुलू द्या. कारण दहावीनंतर आपण एका नव्या प्रवाहात प्रविष्ट होणार आहोत. तिथे सगळेच नवीन आणि या नव्या विश्वात पाऊल ठेवायला तुम्ही तितकेच उत्सुक आहात. कॉलेजात जाण्याचं औत्सुक्य, शालेय जीवनाचा पडाव संपल्याची हुरहुर आणि अभ्यासाचं दडपण अशा खूपशा खट्टय़ा मिठय़ा चवींचं पॅकेज या वर्षी तुमच्याकडे असणार आहे. या सगळ्याचा स्वच्छंद उपभोग घेत आपण हे वर्ष पार पाडणार आहोत.
वरील सर्व बाबींचा सकारात्मक परिणाम साधण्यासाठी विद्यार्थ्यांच्या परिश्रमात पालकांचा वाटा हा बरोबरीचा असायला हवा. अनेक पालकांना दहावीत आलेलं आपलं मूल अचानक मोठं झाल्यासारखं वाटतं आणि त्यांच्या अवाजवी अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलांचे कोवळे खांदे झुकू लागतात. अनेकदा पालकांचाही नाइलाज असतो. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अतिशय वेगानं बदलत जाणारं हे स्पर्धेचं युग. विद्यार्थीदशेतील या एका महत्त्वाच्या वर्षी पालकांनी आपल्या पाल्याची आवड, त्याच्या क्षमता, बुद्धय़ांक, मानसिकता, उपलब्ध सुविधा, कौटुंबिक पाठबळ या सर्व गोष्टींचा प्रामाणिक विचार करून आपल्या पाल्याकडून नक्कीच अपेक्षा ठेवाव्यात. सुविधांचा सुकाळ म्हणजे गुणांची खैरात असाही अर्थ पालकांनी काढू नये. कारण एखादं फूल उमलावं या हेतूनं घातलेली फुंकरदेखील एखादं नाजूक फूल कोमेजून टाकते. ५० टक्के गुण मिळवणारं मूल जर पासष्ट टक्के गुण मिळवत असेल तर ती त्याची मोठी प्रगती समजावी. अशा वेळेस त्याची तुलना ९० टक्के गुण मिळवणाऱ्यांशी कधीही करू नये. पालकांनी आपल्या पाल्याची अभिरुची लक्षात घेऊन शाळा, गृहपाठ, अवांतर वाचन, पाठांतर, मनन-चिंतन, मनोरंजन इ.ना लागणारा वेळ यांची ‘योग्य’ सांगड घालून पाल्याच्या झोपण्याच्या-उठण्याच्या वेळा, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती याचं व्यवस्थापन करावं.
आपल्या पाल्याला विश्वासात घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे आपल्याही मतांचा विचार केला जातोय याचा पाल्यास अभिमानच वाटेल. अन्यथा आपल्या आज्ञा दुसऱ्यावर लादल्यासारखं होईल.
परीक्षांदरम्यान आपल्या पाल्यास वेळ देणं हे पालकांचं महत्त्वाचं काम आहे. त्याचा खूप मोठा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडतो याची शंभर टक्के खात्री बाळगून प्रत्येक पालकानं आपल्या पाल्याच्या तणावमुक्त अभ्यासासाठी अर्थात त्याच्या उज्ज्वल यशासाठी आपला मोलाचा सहभाग देणं क्रमप्राप्त आहे. दहावीला बसणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना अनेक शुभेच्छा!

तुम्हाला यावर्षी उपयोगी पडणारी काही तत्त्वे-
* रोजच्या अभ्यासाचं नियोजन लेखी स्वरूपात तयार ठेवा.
* आजचा अभ्यास आजच पूर्ण करा.
* समजून घेऊन अभ्यास करा.
* मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी गमतीदार कल्पना वापरा.
* कंटाळा आल्यास अभ्यासाचा विषय बदला.
* स्वत:च्या शब्दात मुद्दे मांडा.
* शॉर्टकटस्पासून दूर राहा.
* शिक्षकांच्या तसंच पालकांच्या अनुभवाचा फायदा घ्या.
* वाचन करताना महत्त्वाच्या मुद्दय़ांचं टिपण काढा.
* धोकंपट्टी वाचवण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवून त्यावर स्पष्टीकरण देण्याची सवय ठेवा.
* वेळोवेळी शंकांचं निरसन करून घ्या.
* ओमकार, प्राणायाम, गायत्री मंत्र इ. द्वारे एकाग्रता वाढवून ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
* दिवसभरातील कामांच्या यादीत महत्त्वाची कामं ते कमी महत्त्वाची कामं असा क्रम द्या.
* शाळा, क्लासेसचा वेळ सोडून दर दिवशीच्या अभ्यासाचं नियोजन करा.
* झोपण्यापूर्वी दिवसभराचा आढावा घ्या.
* नियोजनाप्रमाणे काम ही उत्तुंग यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच नियोजन करण्यासाठी योग्य तो वेळ द्या.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

समन्वयक : सी. डी. वडके, विद्याप्रबोधिनी, दादर
उद्याचा विषय : महत्त्व भाषेच्या अभ्यासाचे