महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या ड्राईंग ग्रेड परीक्षेचा अभ्यासक्रम १९७४ पासून पूर्णपणे रुळला आहे. परीक्षेचा घाट पक्का झाला आहे. विद्यार्थ्यांकडून असणाऱ्या अपेक्षांची चौकट ठरून गेली आहे. योग्य तयारीने या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणे सुलभ आहे. जास्तीत जास्त मुला-मुलींनी शालेय वयातच या परीक्षांना बसावे.
ग्रेड परीक्षा प्रवेश
१) एलिमेंटरी (१ ली परीक्षा) व इंटरमिजिएट (२ री परीक्षा) यासाठी शासनमान्य संस्थांतील उमेदवारांना तसेच शासनमान्य नसलेल्या संस्थांतील व खासगी कलाशिक्षण वर्गातील उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
२) कोणत्याही परीक्षार्थीस पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण न होता एकदम दुसऱ्या परीक्षेस बसता येते. मात्र एकाच वर्षी दोन्हीही परीक्षांना बसता येत नाही. एका वर्षांत फक्त एकाच परीक्षेस बसता येते.
३) ग्रेड परीक्षांपैकी कोणतीही विशिष्ट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थ्यांस पुन्हा त्याच परीक्षेस बसता येणार नाही.
४) परीक्षा प्रवेशाचे अर्ज परीक्षा नियंत्रक परस्पर स्वीकारत नाही. ते अर्ज या शासकीय परीक्षेत होणाऱ्या संस्थांमार्फत परीक्षांच्या संबंधित केंद्र चालकांकडे पाठवावे.
परीक्षांचे निकाल
१) प्रत्येक विषयाच्या परीक्षेसाठी उपस्थित राहणे आवश्यक असते. एका विषयालाही ‘अनुपस्थित’ राहिल्यास ‘अनुत्तीर्ण’ करण्यात येते.
२) सहा विषयातील एकूण कामाचा दर्जा विचारात घेऊन अ, ब आणि क ह्य़ा श्रेणीत निकाल जाहीर करण्यात येतो.
३) विषयावर श्रेणी जाहीर केली जात नाही.
४) फेरतपासणी केली जात नाही.
गुणवत्ता क्रम
१) सर्वसाधारण क्रम- प्रत्येक ग्रेड परीक्षेतील उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या पन्नास परीक्षार्थीची यादी गुणवत्ताक्रमानुसार सर्व परीक्षा केंद्रात जाहीर करण्यात येते. सहाही विषयांमधील एकूण गुणवत्तेच्या क्रमानुसार लावलेला हा ‘सर्वसाधारण’ क्रम असतो आणि यामध्ये शासकीय परितोषिकांच्या संबंधातील अटींचा विचार केला जात नाही.
पारितोषिकासाठी गुणवत्ता
प्रत्येक परीक्षेतील सहाही उत्तरपत्रिकांच्या एकूण गुणवत्तेच्या दर्जानुसार तसेच प्रत्येक विषयातील विशेष प्रावीण्याबद्दलही उत्तीर्ण उमेदवारांना शासकीय पारितोषिके दिली जातात. (मात्र काही अटींचे पालन करून)
अ) उत्तीर्ण परीक्षार्थी शासनमान्य माध्यमिक शाळेचा विद्यार्थी हवा.
ब) एलिमेंटरी ड्राईंग ग्रेड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे वय १७ च्या आत आणि इंटरमिजिएटसाठी १८ च्या आत असणे आवश्यक.
खासगी देणगीदारांनी ठेवलेली पारितोषिकेही गुणवत्तेनुसार दिली जातात. सर्व यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र कला संचालनालयातर्फे ‘प्रमाणपत्रे’ देण्यात येतात.
परीक्षांचे नियम, कार्यपद्धती, पारितोषिके वगैरेबाबत सविस्तर माहितीसाठी.
पत्ता :- परीक्षा नियंत्रक,कला संचालनालय,
महाराष्ट्र राज्य, सरज. जी. कला शाळा आवार,
दादाभाई नौरोजी मार्ग,
मुंबई- ४००००१.
– लेखक/ मार्गदर्शक
सुनीती जाधव (आंबिलढोक)
प्राचार्या,
चित्रलीला निकेतन, पुणे 
क्रमश: